श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ लक्ष्मी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

कळायला लागल्यापासून मनुष्याला ज्याची गोडी आपसूक लागते किंवा प्रयत्नपूर्वक लावली जाते ती गोष्ट आहे संपत्ती. ( खरं सांगायचं तर पैसा..!). लौकिक व्यवहार  पैशाविना होऊच शकत नाहीत. आज जरी विनारोकड (कॅशलेस) व्यवहार होत असले तरी विनापैसा नक्कीच होत नाहीत.

भगवान विष्णूचे एक सुप्रसिद्ध चित्र आहे. त्यात भगवंत शेषशायी आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चुरत आहेत. पंचमुखी शेष आणि त्याच्यावर मंद स्मित करीत पहुडलेले भगवंत आणि सेवेस साक्षात लक्ष्मी !!! लौकिक अर्थाने या चित्रात बराच विरोधाभास आहे. ज्याची दासी लक्ष्मी आहे तो महालात निजेल, रत्नजडित मंचकावर शयन करेल किंवा आणिक विलास उपभोगेल. दुसरे म्हणजे जी साक्षात लक्ष्मी तिला कोणाचे पाय चेपायची काय गरज आहे ? कोणाची दासी होण्याची काय गरज आहे ? ती अनेक दासींना तिथे नेमू शकते. पण तसे इथे दिसत नाही. लक्ष्मी माता शेषशायी विष्णूचे पाय चुरत असण्या मागच्या अनेक कारणांपैकी एक कारण पुढील प्रमाणे असू शकेलं. भगवान पंचमुखी शेषावर शयन करीत आहेत. ही पाच मुखे म्हणजे पंचेंद्रिये आहेत. ह्या सर्व इंद्रियांवर मालकी गाजविणाराच लक्ष्मीचा खरा धनी होऊ शकतो. सामान्य मनुष्याचे तसे होत नाही. इंद्रियांची मालकी सोडून देऊ, त्याला इंद्रियांचे साधे नियमन करणे सुद्धा जमत नाही. इंद्रियांवर मालकी गाजवायचे बाजूलाच राहाते, ही सर्व इंद्रियेच ह्याला आयुष्यभर गुलाम बनवितात आणि त्याच्या छाताडावर नाचत राहतात आणि पुढे यातच त्याचा अंत होतो. लक्ष्मीने पाय चेपणे तर दूर, लक्ष्मी याच्या वाऱ्यालाही उभी राहात नाही. मनुष्य जे काही चार पैसे जमवितो त्यालाच हा लक्ष्मी मानू लागतो. पण ही काही संपत्ती नव्हे, लक्ष्मी तर बिलकुल नव्हे. हे पैसे म्हणजे  दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त नाममात्र चलन आहे. ह्या कागदाला किंवा नाण्यांना फक्त त्यावरील सहीने मूल्य प्राप्त झालेले असते. वेळ आली तर एका क्षणात त्या चलनी नोटांचे ‘कागद ‘  होतात हे नोटाबंदीच्या वेळी सिद्ध झाले आहे.

लक्ष्मीची बरीच रूपे आहेत. श्रीलक्ष्मीमहात्म्यात याचे यथार्थ वर्णन आले आहे. मनुष्याने ती संपत्ती (लक्ष्मी ) प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. पूर्वी भारतात लोकं व्यापार सुद्धा पैशात करीत नव्हते. अपवाद सोडला तर लोकं सेवा देऊन सेवा घेत असत. आपल्याकडे असलेली वस्तू दुसऱ्याला देऊन दुसऱ्याकडील वस्तू आपण घेत असत. आजच्या भाषेत आपण त्यास commodity tranjaction म्हणू शकतो. 

लक्ष्मी चंचल असते किंवा आहे हे अर्धसत्य आहे. आपल्याला जिथे रहायला आवडते तिथेच आपण रहातो. जिथे आपले मन रमत नाही तिथे आपण पळभर देखील रहात नाही. नाईलाजाने थांबावे लागले तर आपली अस्वस्थता आपल्या चेहऱ्यावर सहज दिसते. ‘पिंडी ते ब्रम्हांडी ‘ हा नियम सर्वांना लागू आहे. त्यामुळे तो लक्ष्मी मातेलाही लागू आहे.

आपण नेहमीच पाहतो की मनुष्याला थोडी सुस्थिती लाभली की त्याची भाषा, राहणीमान लगेच बदलते. मनुष्याची नम्रता अभिमानात परावर्तित होते आणि जसा पैसा वाढत जाईल तसतसा ह्याचा अभिमान चक्रवाढ पद्धतीने वाढत जातो. याने पैशाला राबवून घ्यावे असे अपेक्षित असताना पैसाच ह्याला राबवून घेऊ लागतो. पारंपरिक नीतिनियम ह्याच्या दृष्टीने गौण ठरतात आणि तथाकथित स्टेटस सांभाळणारे नीतिनियम त्याला आवडू लागतात. आणि मग एखाद्या उधळलेल्या घोडयासारखा हा धावू लागतो आणि आपला लगाम तो पैशाच्या हातात देतो.

लक्ष्मी चंचल असते हे अर्धसत्य आहे ते यासाठीच. नीतीने, पुढील दाराने घरात येते ती लक्ष्मी आणि अनितीने येते ती अलक्ष्मी. ती मागील दाराने घरात येते. या दोघी जेव्हा घरात येतात तेव्हा सहकुटुंब सहपरिवार येतात. जिथे अलक्ष्मी आहे तिथे लक्ष्मी राहू शकत नाही. लक्ष्मी स्वतः चंचल नाहीए मात्र मनुष्य स्वतःच्या हव्यासापोटी चंचल, अभिलाषी होतो आणि लक्ष्मी चंचल आहे असे जगाला सांगत सुटतो. 

नीती, न्याय, शांती, भक्ती, विवेक, उदारता, मनाची विशालता, परोपकार ज्या ठिकाणी आढळतात तिथे लक्ष्मी पाणी भरते. सर्व संतमंडळी, तसेच मला ज्ञात असलेली श्री गोंदवलेकर महाराज संस्थान गोंदवले, श्री गजानन महाराज संस्थान शेगांव अशी काही मोजकी उदाहरणे सांगता येतील. 

सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व गुण आत्मसात करुन, वृद्धिंगत करता आले तर माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहील आणि  ती स्वतःच सिद्ध करुन दाखविल की ती चंचल नाही, फक्त त्यासाठी काही मूलभूत पथ्ये पाळली पाहिजेत असे वाटते. शेषशायी होण्याची पाळी आली तरी आपल्या चेहऱ्यावरील स्मित स्वाभाविकपणे टिकले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपले समाधान भंगू नये, नीतिनियम कसोशीने पाळले जावेत. भगवान विष्णू अखिल ब्रम्हांडाचे पालन तटस्थपणे करीत आहेत. असे निःस्वार्थपणे कार्य जो करतो त्याच्यामागे लक्ष्मी स्वतःहून उभी राहते. आज समाजात निःस्वार्थपणे काम करणाऱ्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडत नाही. जो मनुष्य भगवान विष्णूप्रमाणे आपले आयुष्य स्थितप्रज्ञ वृत्तीने जगेल त्याला लक्ष्मी मातेचा अखंडीत सहवास खात्रीने लाभेल यात बिलकुल संदेह नसावा.

आज लक्ष्मीपूजन आहे. आज सर्वजण माता लक्ष्मीचे पूजन करतील. लक्ष्मीपूजन करताना सर्वप्रथम विष्णूचे स्मरण अवश्य करावे. पतीला मान दिला, पतीचे कौतुक केलं की पत्नीला स्वाभाविकपणे आनंद होत असतो….

श्री योगेश्वर भगवान विष्णूच्या चरणी वंदन करतो. श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी वंदन करतो. तसेच. आपल्यावर भगवंत आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम रहावा यासाठी प्रार्थना करतो.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments