सुश्री मंजिरी येडूरकर
विविधा
☆ लोक यात्री – तारा भवाळकर… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
यावत् जीवेत् तावत् शिक्षेत |
या वचनाला खरा अर्थ देणाऱ्या, तारा भवाळकर, मराठीतील ख्यातनाम लेखिका!लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रापर्यंतचा सेतुवेधक संदर्भकोश, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक, भारतीय संस्कृती पासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या नामवंत अभ्यासक, मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका, कसदार वक्त्या अशी त्यांची विविध अंगी ओळख महाराष्ट्राला आहे.
तारा भवाळकर यांना स्त्री रचित लोकसाहित्यात करुणेने वेदनेत आयुष्य कंठणारी स्त्री दिसली तर जात्यावरच्या ओव्यातून विद्रोह करणारी, स्पष्ट मत मांडणारी स्त्री दिसली. त्या अभ्यासातून त्यांनी एक कार्यक्रम ‘एक ओवी, एक कथा, एक प्रथा ‘ असा सादर केला आहे. ही तेरा भागांची मालिका यू ट्यूब वर उपलब्ध आहे. त्यांच्या ओघवत्या शैलीत त्या आपल्याला एक ओवी सांगतात आणि मग त्या ओवीमागे एक कथा असते ती सांगतात. त्या कथेच्या अनुषंगाने कोणत्या प्रथा निर्माण झाल्या असतील त्यांचेही त्या अंदाज बांधतात. त्यामुळे कोणत्या मानसिकतेतून ती ओवी रचली गेली असेल याचेही रसभरीत वर्णन ऐकायला मिळते. त्या म्हणतात “ओवी ही पोटातून येते कारण ते सुखदुःखाचे गाणे असते. ओवी हे शुद्ध काव्य आहे. ते कधी रूपकाच्या माध्यमातून तर कधी इतर माध्यमातून येते. विद्रोही ओव्या, बंडखोर ओव्या यांच्या बरोबर सामान्य स्त्रीच्या ओव्यात घरच्यांचे, सगळ्या नात्यांचे कौतुक असते, श्रमाची प्रतिष्ठा असते, माहेरच्या आठवणी असतात. ” या कथांमधून, ओव्यांमधून समाजशास्त्र, मानव वंश शास्त्र, संस्कृतीकरण व काळानुसार संस्कृतीत होणारे बदल या सगळ्याचा अभ्यास करण्याची त्यांची पद्धत आपल्यालाही विचार प्रवृत्त करणारी आहे.
त्यापैकी काही ओव्या व त्यांच्या कथा व प्रथा यांचा उहापोह करण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आहे.
कारंडे यल्लुबई एका पुरुषाची करी नारी
तुझे सत्व मला दाव, माझं संकट तुझ्यावरी
स्त्री प्रधान संस्कृतीत देवतांचे प्रस्थ असल्यामुळे त्यांची देवळे होती. पण शेजारी पुरुष सहचर नव्हता. देवीची उपासना करायची असेल तर पुरुषाला स्त्री रूप घेऊन यावे लागे. यातूनच पोतराजाची प्रथा सुरू झाली. त्या देवता पुरुष देवांचा उपयोग फक्त अपत्य प्राप्ती पुरताच करून घेत. यातून निर्माण झालेली प्रथा म्हणजेच श्री तिरुपती कडून दर वर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला साडी येणे. अर्थात हळू हळू जशी पुरुष प्रधान संस्कृती निर्माण झाली तसे प्रथांमध्ये सुद्धा बदल होत गेले.
जन्मामाजी जन्म केळी बाईचा चांगला
भरतारावाचून गर्भ नारीला राहिला
किंवा
श्रेष्ठ पतिव्रता केळी बाई म्हणू तुला
विना भोग गर्भ मरणाचा ग सोहळा
यामध्ये एक विरोबाची कथा आहे, ज्याचीआई सुरवंता वारुळतून जन्माला आली. तिने शंकराची आराधना करून पुरूषाविना विरोबा या पुत्राला जन्म दिला. यातूनच कालांतराने पतिव्रता या प्रथेचा जन्म झाला. पुरुष अनेक स्त्रियांशी संबंध ठेवू शकतो पण स्त्री मात्र अगदी विधवा झाली तरी दुसऱ्या पुरुषाचा विचार सुध्दा मनात आणू शकत नाही. याची कथा म्हणजे रेणुकेची कथा आहे. यक्ष युगुलाच्या जलक्रीडा पाहून तिचे मन विचलित झाले. त्याची शिक्षा म्हणून परशुरामांनी तिचा शिरच्छेद केला. नंतर तिला जमदग्नी ऋषिनी पुन्हा जिवंत केले पण मातंगिणीचे शिर देऊन. त्यामुळे रेणुका मातंगिण देवता झाली. यातूनच देवाच्या नावाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या सुमंगलांचा जन्म झाला. मग ही,
घरची अस्तुरी जसा कर्दळीचा गाभा
पराया नारीसाठी चोर गल्लीमध्ये उभा
ओवी जन्माला आली.
रुक्मिणी रुसली गेली दिंडिर बनाला
अबीर बुक्क्याची गर्दी तिला सोसना
किंवा
दळता दळता म्हाळसा दमली, म्हणून देवाने बाणाईला आणली
किंवा
रुसली रुक्मिणी, ती कां दिंडीर बना गेली
राधा – कृष्णाच्या मांडीवर तिने मंदिर देखली
अशा विठ्ठलाशी संबंधित ओव्या आहेत. देवाने कितीही स्त्रियांना आसरा दिला तरी त्याचं देवत्व कमी होणार नाही याची काळजी घेणाऱ्या गोष्टी आहेत. त्यातली एक वृंदेची. ही विवाहित असूनही देव तिचा स्विकार करतो. पण लोकांनी केलेल्या आरोपांमुळे तिने धरणीचा आश्रय घेतला. ते पाहून देव धावले, तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिचे फक्त केस हातात आले. हीच तुळस, देवाला प्रिय असणारी. त्यामुळे वारकरी डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठला कडे जातात. तसेच तुळशीचे
लग्न देवाशी लावतात. या प्रथा निर्माण झाल्या. विठ्ठलाच्या कपाळावर पिंड आहे, त्यामुळे तो शैवांचा देव आहे, तो विष्णूचा अवतार मानला गेला त्यामुळे वैष्णवांचा ही आहे. असे हरिहर विठ्ठलामध्ये आहेत.
अशा अनेक ओव्या, कथा व प्रथा आपल्याला या तेरा भागांमध्ये ऐकायला मिळतात. गोष्ट सांगणे ही सुध्दा एक कला आहे. ती तारा भवाळकर यांना चांगली अवगत आहे. गोष्ट सांगताना त्या त्यातले बारकावे सांगतात. अशा प्रथा का पडल्या, याचे विवेचन ही करतात. संस्कृतीत कसे बदल होत गेले, स्त्री प्रधान संस्कृती मधून पुरुष प्रधान संस्कृती कशी जन्माला आली, हे ही जाताजाता स्पष्ट करतात. ओघवती भाषा, प्रत्येक गोष्टीला दाखले देण्याची सवय, गोष्ट ज्या काळातील आहे, त्या काळाचे, परिसराचे, सामाजिक परिस्थितीचे, स्त्रियांच्या भूमिकेचे स्पष्टीकरण यामुळे प्रत्येक भाग श्रवणीय झाला आहे.
बघा, तुम्हीही ऐका. ज्ञान व मनोरंजन दोन्हींचा मिलाफ असणारा मेवा आहे.
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈