डॉ. वि. दा. वासमकर
विविधा
☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – १ ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆
मराठीमध्ये लोकसाहित्य संशोधकांची एक मोठी परंपरा आहे. साने गुरुजी, डॉ. सरोजिनी बाबर, कमलाबाई देशपांडे, दुर्गा भागवत, ना. गो. नांदापूरकर, रा. चि. ढेरे, प्रभाकर मांडे, गं. ना. मोरजे, विश्वनाथ शिंदे इ. लोकसाहित्यमीमांसकांनी मराठी लोकसाहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. या लोकसाहित्यमीमांसकांमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लोकसाहित्य संशोधनाचे मौलिक योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि दिल्ली येथे होऊ घातलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा समावेश होतो.
डॉ. तारा भवाळकर ह्या मराठी विषयाच्या निष्णात प्राध्यापक असून; एक मर्मग्राही लोकसाहित्यसंशोधक म्हणून मराठी साहित्यविश्वाला परिचित आहेत. त्यांनी लोकसाहित्याचे संकलन आणि चिकित्सा तर केली आहेच; शिवाय नाट्य रंगभूमीवरील त्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकसाहित्य आणि रंगभूमीबरोबरच त्या स्त्रीवादी साहित्य चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी ललित आणि समीक्षणात्मक लेखनही केले आहे. या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या विपुल लेखनात दिसून येते. हे लेखन पुढील काही ग्रंथांमध्ये समाविष्ट झाले आहे. ते ग्रंथ असे – ‘लोकसंचित’, ‘लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा’, ‘लोकसाहित्य : वाङ्मय प्रवाह’, ‘मायवाटेचा मागोवा’, ‘महामाया’, ‘लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा’, ‘लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा’, ‘लोकपरंपरेतील सीता’, ‘यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा’, ‘लोकनागर रंगभूमी’, ‘मराठी नाटक : नव्या दिशा नवी वळणे’, ‘मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद’, ‘मिथक आणि नाटक’, ‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’, ‘आकलन आणि आस्वाद’ ‘निरगाठ सुरगाठ’, ‘प्रियतमा’, ‘. मरणात खरोखर जग जगते’, ‘माझिये जातीचे’, ’बोरीबाभळी’, ‘स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’, ‘स्नेहरंग’’, ‘मधुशाळा’ (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या पुस्तकाचे मराठीतील पहिले भाषांतर) अशा विविध विषयांवरील सुमारे चाळीस ग्रंथ ताराबाईंच्या विपुल आणि मर्मग्राही लेखनाचे दर्शन घडवितात. ताराबाईंच्या या विपुल लेखनाचा विचार करणे या छोट्याशा लेखात शक्य नाही म्हणून त्यांच्या काही लोकसाहित्यविषयक ग्रंथांचा येथे थोडक्यात विचार करू.
‘लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा’ हा तारा भवाळकर यांचा ग्रंथ स्नेहवर्धन प्रकाशनने २००९मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथात ताराबाईंनी लोकसाहित्याच्या अभ्यासाची तात्त्विक मांडणी करणारे अठरा लेख समाविष्ट केले आहेत. ‘लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा’ या पहिल्याच लेखात ताराबाईंनी लोकसाहित्य म्हणजे काय याची चर्चा केली आहे. Folklore या इंग्रजी शब्दाच्या आशयाची व्याप्ती त्यांनी सविस्तर स्पष्ट केली आहे. ‘लोकसाहित्य’ या सामासिक शब्दाची फोड करताना आणि त्याचा अर्थ स्पष्ट करताना ‘साहित्य’ हा शब्द ‘साधन’-वाचक आहे असे ताराबाई म्हणतात. आणि ‘लोक’ या शब्दाचा अर्थ त्या पुढीलप्रमाणे स्पष्ट करतात- “लोक म्हणजे केवळ ग्रामीण लोक नव्हेत की जुन्या काळातील लोक नव्हेत तर ‘लोकशाही’ या शब्दातील ‘लोक’ (people) या पदाला जवळचा असा आशय व्यक्त करणारा ‘लोक’ हा शब्द आहे” असे त्या म्हणतात. म्हणजेच सांस्कृतिकदृष्ट्या विशिष्ट मानसिक जडणघडणीचा समावेश ज्या समाजात किंवा ज्या समूहामध्ये आढळतो, असा मानवसमूह म्हणजे ‘लोक’! लोक हा शब्द नेहमीच समूहवाचक असतो. या अर्थाने लोकशाहीतील ‘लोक’ हा शब्दही समूहवाचक आहे असे त्यांचे मत आहे. लोकसाहित्याची अशी व्याख्या देऊन; ताराबाईंनी दुर्गा भागवत, दत्तो वामन पोतदार, हिंदीतील वासुदेव शरण अग्रवाल, पंडित कृष्णदेव उपाध्याय, रा. चि. ढेरे, यांच्या व्याख्या देऊन त्यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. लोकसाहित्य या शब्दात लोकगीते, लोककथा, म्हणी, उखाणे, कोडी ही शाब्द लोकसाहित्याची अंगे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. लोकसाहित्य ही प्रवाही घटना असते; अबोध समूह मनाच्या (collective unconscious) प्रेरणेतून लोकसाहित्य घडते, असेही त्या स्पष्ट करतात. भारतातील अनेक विद्यापीठातून लोकसाहित्याचे स्वतंत्र अभ्यासविभाग सुरू झालेले आहेत ही समाधानाची गोष्ट आहे, असे या लेखाच्या शेवटी त्या म्हणतात. लोकसाहित्याशी अन्य ज्ञानशाखांचा संबंध कसा येतो हे त्यांनी ‘लोकसाहित्य आणि ज्ञान शाखा’ हे शीर्षक असलेल्या तीन लेखांमधून स्पष्ट केले आहे. त्यामध्ये मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र व भाषाविज्ञान यांचे महत्त्वाचे योगदान असून; इतिहास, पुरातत्त्वशास्त्र आणि भूगोल यांचेही लोकसाहित्याशी जवळचे नाते असते असे त्या म्हणतात. लोकसाहित्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी घनिष्ठ नाते असते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. कृषिनिष्ठ भारतीय जीवनातील सणवार व धर्मव्रते निसर्गसंबद्ध कसे आहेत हे त्या दाखवून देतात. लोकजीवनातील यात्रा उत्सवही निसर्गाशी संबद्धच असतात असे सांगून यात्रांमध्ये लोकसंस्कृतीच्या व लोकजीवनाच्या अनेक पैलूंचा अविष्कार होतो; देवतांविषयीचा आदर व्यक्त होतो. बहुरूपी, गोंधळी, भुत्ये, वासुदेव असे अनेक लोक कलावंत यात्रा जत्रात आपल्या कलेचे प्रदर्शन करतात लोक जीवनातील या सर्व अविष्कारालाच बहुदा धर्म हे नाव दिले जाते. नागपंचमीची नागपूजा, बैलपोळ्याला बैलाची पूजा, मंगळागौरीची पूजा, नवान्नपौर्णिमा, गौरी-गणपतीची पूजा, आणि वटसावित्रीची पूजा इत्यादी पूजा व्रते हे सगळे धर्म म्हणून ओळखले जातात मात ताराबाईंच्या मते हे सर्व लोकधर्मच आहेत आणि या लोकसंस्कृतीमध्ये धर्माचे रूप निसर्ग धर्माचे आहे असे त्या म्हणतात. या लोक धर्मामध्ये मोक्षाची मागणी नसते तर ऐहिक जीवनाविषयीच्याच मागणी करणारे हे लोकधर्म असतात. असे त्या प्रतिपादन करतात. ताराबाईंच्या या विवेचनातून प्रस्थापित धर्मापेक्षा लोकधर्माला महत्त्व दिलेले दिसून येते. ‘नाट्यात्मक लोकाविष्कारांची काही उदाहरणे’ या लेखामध्ये वारकरी, नारदीय, आणि रामदासी संप्रदायांच्या कीर्तनपद्धतीचा व विवाह विधींचा ताराबाईंनी परामर्श घेतला आहे. अशा रीतीने लोकसाहित्यविषयक तात्त्विक भूमिका मांडल्यानंतर या ग्रंथाच्या शेवटी साने गुरुजींच्या लोकसाहित्याच्या संकलनविषयक कार्याची ताराबाईंनी ओळख करून दिली आहे.
‘लोकसंचित’ हा ताराबाईंचा आणखी एक महत्त्वाचा लोकसाहित्यविषयक ग्रंथ. पुण्याच्या राजहंस प्रकाशनने हा ग्रंथ डिसेंबर 1989 मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथात वीस लेख समाविष्ट झाले आहेत. या ग्रंथातही सुरुवातीला लोकसाहित्यविषयक तात्त्विक भूमिका आली आहे. ‘लोकनाट्यातील धार्मिकता आणि लौकिकता’ या पहिल्याच लेखात ‘लोकनाट्य’ ही संकल्पना स्पष्ट करताना तमाशा, खंडोबाचे जागरण, गोंधळ, कोकणातले नमन, दशावतारी खेळ यांचा विचार करून हे सर्व एकाच गटात बसणार नाहीत असे त्या म्हणतात तमाशा हा प्रकार प्रयोगविधांपेक्षा भिन्न आहे आणि आजच्या तमाशात धार्मिकतेचा अंश इतका पुसट झाला आहे की तो शोधूनच काढावा लागतो, असे त्या म्हणतात. मात्र दशावतारी खेळ, खंडोबाचे जागरण, गोंधळ इत्यादी विधिनाट्यांमधून धार्मिकतेचा प्रत्यय येतो असे त्या सूचित करतात. कारण या विधीनाट्यांमध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात पूर्वरंग हा परंपरेनुसार धर्मविधीसाठी राखून ठेवलेला असतो त्यात ईश्वरविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक तात्विक व गंभीर विवेचनाचा भाग असतो. आणि उत्तररंगात तद्नुषंगिक आख्यानात लोकरंजन आलेले असते, असे त्या स्पष्ट करतात.
– क्रमशः भाग पहिला
लेखक : डॉ. वि. दा. वासमकर
सांगली (महाराष्ट्र)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈