डॉ. वि. दा. वासमकर

?  विविधा ?

☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – २  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

(विधीनाट्यांमध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात पूर्वरंग हा परंपरेनुसार धर्मविधीसाठी राखून ठेवलेला असतो त्यात ईश्वरविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक तात्विक व गंभीर विवेचनाचा भाग असतो. आणि उत्तररंगात तद्नुषंगिक आख्यानात लोकरंजन आलेले असते, असे त्या स्पष्ट करतात.) इथून पुढे —

‘लोककलांची आवाहकता’ या लेखामध्ये अलीकडच्या काळात मराठी रंगभूमी लोककलांचा आश्रय घेताना दिसते. असे त्या सुरुवातीलाच म्हणतात. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून दशावतार, गोंधळ, भारूड, जागरण अशा लोकनाट्यविधांचा उपयोग अनेक नवीन नाटकांनी केलेला आहे. याचे कारण सांगताना त्या म्हणतात, -“पश्चिमेचे अनुकरण हे एक कारण आहेच. पण केवळ पश्चिमेच्या एखाद्या नाटकाच्या अनुकरण करणे एवढ्याच एका प्रेरणेने मराठी नागर नाटकात लोकनाट्याचा प्रवेश झाला आहे काय?… आपले एकूणच आधुनिक जीवन हे दिवसेंदिवस तंत्रज्ञानाधीन होत चालले आहे. आधुनिक जीवनाचा निसर्गाशी आणि मातीशी असलेला संबंध तुटत चालला आहे. त्यामुळे भौतिक समृद्धी वाढत असतानाही एका पोकळीची जाणीव होत आहे. अशावेळी मानवी संस्कृती पुन्हा आपली मुळे शोधीत आहे… कलेच्या क्षेत्रातील या प्रेरणेचा आविष्कार पुन्हा नव्याने लोककलांचा शोध घेण्यातून होत आहे. कारण लोककलांमध्ये एक उत्स्फूर्तता असल्याने साक्षात जिवंतपणा असतो… जेथे जेथे समूहमनाशी नाते जोडण्याची तीव्रतेने गरज भासली, तेथे तेथे नागरकलांपेक्षा लोककला प्रभावी ठरलेल्या दिसतात. आजच ब्रेख्टमुळे नागर रंगभूमी लोककलांकडे वळली आहे असे नव्हे”. ताराबाईंच्या या भाष्यातून लोककलांचे महत्त्व आधोरेखित होते. ‘अदाची लावणी आणि नाट्यगीत’ हा आणखी एक महत्त्वाचा लेख या संग्रहात आहे. म्हणजे दरबारातील लावणी किंवा बैठकीची लावणी होय. अदा म्हणजे अभिनय. ही लावणी अभिनयप्रधान असते. तिच्यात अंगप्रत्यंगांचा लयबद्ध अविष्कार असतो. भावनांना चेतवणारे आविष्कार करणे हे या लावणीचे प्राणतत्त्व असते, असे प्रतिपादन करून प्रारंभीच्या सर्व शृंगाररसप्रधान नाट्य गीतांचे स्वरूप पाहिले, अभिनयरूप पाहिले तर बैठकीच्या अदाच्या लावणीचा हा नवा अवतार असल्याचे लक्षात येईल, असे त्या स्पष्ट करतात. अदा करणाऱ्या कलावतीची जागा स्त्रीपार्टी पुरुष नटाने घेतली पण शृंगारप्रधान नाट्यगीताचा आशय, सांगीतिक अविष्कारदृष्ट्या चाली आणि आंगिक अभिनय, मुद्राभिनय हा सर्वच आविष्कार एकसंधपणे पाहिला तर बैठकीच्या लावणीचे हे नवे रूप असल्याचे लक्षात येईल, असे मार्मिक अवलोकन त्या करतात.

तारा भवाळकर या जशा लोकसाहित्यमीमांसक आहेत, तशाच त्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या विचारवंतही आहेत. स्त्रीवादाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील एक म्हणजे ‘मायवाटेचा मागोवा’ हे पुस्तक. हे पुस्तक श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनने 1998 मध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तकात दहा लेखांचा समावेश केला आहे. ‘लोक साहित्याचे पुनराकलन’ हा या संग्रहातील दुसरा लेख. हा लेख त्यांनी स्त्रीवादविषयक चर्चासत्रामध्ये वाचला होता. या लेखाच्या सुरुवातीला ताराबाईंनी स्त्रीवाद म्हणजे काय याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते थोडक्यात असे -आधुनिक जीवनातील अनेक विचारधारांची निर्मिती पाश्चिमात्य जगतात झाली. आणि नंतर त्या जगभर पसरल्या. त्यातीलच एक म्हणजे स्त्रीवाद… स्त्रीकडे पाहण्याचा, तिला वागवण्याचा, तिच्याशी वागण्याचा दृष्टिकोन जगभर एकाच प्रकारचा आहे. आणि तो पुरुषांच्या तुलनेने गौणत्वाचा आहे. विषमतेचा आहे. स्त्री गौण आहे; पुरुषप्रधान आहे; ही भूमिका कुटुंब, समाज, धर्म, राज्य, अर्थ, संस्कृती आदी सर्व क्षेत्रात अनेक वर्षे नांदत आहे. आणि ही विषमता केवळ लिंगाधारित विषमता आहे… स्त्री-पुरुष विषमतेतून खरे तर विषमतेच्या जाणिवेतून, आधुनिक जगात स्त्री विषयक चळवळी सुरू झाल्या. यांतून संघर्षरत असलेल्या स्त्रीच्या जाणिवा अधिक विकसित झाल्यानंतर स्त्रीला स्वतःच्या स्थितीचा आणि म्हणूनच एकूणच मानवी समाजातल्या स्त्री-पुरुष नातेसंबंधाचा पुनर्विचार करण्याची तीव्र गरज भासू लागली… सृजनशील स्त्रीला आपले गौणत्व नेहमीच जाचत होते. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध तिने आवाज उठवायला सुरुवात केली आणि या चळवळीतून सिमॉन द बोव्ह या फ्रान्समधील स्त्रीच्या ‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथाची निर्मिती झाली 1949 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथाचा जगाच्या पाठीवरील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतर झाले. आणि यातून स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला. आपल्याकडेही अनेक विचारवंत स्त्रिया या चळवळीशी निगडित झाल्या. त्यातील एक म्हणजे डॉ. तारा भवाळकर. ताराबाईंनी स्त्रियांच्या भावना त्यांच्या गीतातून, कथातून, किंवा म्हणी – उखाण्यातून कशा प्रकट झाल्या आहेत याचे चित्रण अनेक लेखांमध्ये केले आहे. ‘लोकसाहित्याचे पुनराकलन’ या लेखांमध्येही त्याचा प्रत्यय येतो. त्या लिहितात – 

देवा नारायणा माझी विनंती फार फार |

जन्म बायकांचा नको घालूस वारंवार ||

अशा स्त्री जन्माला नकार देणाऱ्या ओव्या स्त्रीगीतातून अक्षरशः शेकड्याने सापडतात, असे ताराबाई म्हणतात. त्या पुढे म्हणतात, “लोकगीतातून एरव्ही रामाचे कितीही कौतुक केले असले तरी त्याने गर्भवती सीतेचा परित्याग करणे स्त्री मनाला रुचलेलं नाही. तो लोकगीतातील स्त्री मनाला फार मोठी जखम करून गेलेला दिसतो.

सीता पतिव्रता नाही रामाला कळाली |

वनाच्या वाटेवरी चाके रथाची गळाली ||

असे म्हणून पुरुषसत्तेचा प्रतिनिधी असलेल्या रामाची अन्यायी वृत्ती चव्हाट्यावर मांडली आहे. ‘किती चतुर बायका’ हा लेखही स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिला आहे. या लेखामध्ये शंकर-पार्वतीचा एक संवाद उद्धृत केला आहे. या संवादात शंकर आणि पार्वती एकमेकाला कोडी घालत असतात – ऐका हो शंकरा बोलाचा अर्थ करा असे पार्वतीने म्हटल्यावर संशयग्रस्त शंकर विचारतात – ऐकलं ग पार्वती बोलाचे अर्थ किती? कोणाला हात देत होतीस, कोणाला पाय देत होतीस, कोणाच्या मुखाकडे पाहून तू हसत होतीस या ओळींमध्ये शंकराने एका परीने पार्वतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. यावर पार्वती मिश्किलपणे म्हणते- कासाराला हात देत होते, सोनाराला पाय देत होते, आरशाच्या मुखाकडे पाहून मी हसत होते हे उत्तर ऐकत राहताना पार्वतीच्या ओठाच्या कोपऱ्यात हसू दिसायला लागतं. हे उत्तर देणारी पार्वती नक्कीच चतुर आहे; असे ताराबाई म्हणतात.

 सारांश डॉ. तारा भवाळकर यांचे लोकसाहित्य संशोधन विचारात घेतले की, त्यांच्या चिकित्सक, मर्मग्राही दृष्टिकोनाचा सहज प्रत्यय येतो. त्यांच्या विपुल लेखनाचे सार थोडक्यात सांगायचे झाले तर त्या लोक संस्कृतीशी, स्त्रीच्या मानसिकतेशी अंत:करणापासून जोडल्या गेल्या आहेत.

– समाप्त –

लेखक : डॉ. वि. दा. वासमकर

सांगली (महाराष्ट्र)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
jyoti kulkarni

khup chchan lekha.