☆ विविधा : ललित – अंगण – सुश्री मानसी काणे ☆
रोज रात्री आठ वाजता ‘‘माझ्या अंगणी नांदते नवर्याची बायको ,माझ्या नवर्याची बायको’’अस शीर्षकगीत आपण ऐकतो पण आज शहरात रहाणार्या लोकाना फ्लॅट सिस्टीममुळे अंगण ’माहीत असण थोड दुरापास्त आहे.पण मी ज्या भागात रहाते तिथे अजून अंगण आहे.अंगण ही फार सुंदर गोष्ट आहे.खर तर ही घरासमोरची मोकळी जागा.पण जाईजुईचे वेल,लालभडक जास्वंदी,स्वस्तीक,तगर,शेवंती ,चाफा आणि मंजिर्यानी बहरलेले तुळशीवृंदावन असलेल अंगण डोळ्याना सुखावून जात.इथून आपन प्रसन्न मनान घरात प्रवेश करतो.तुळशीपुढे दारार सुंदर रांगोळी रेखाटली आहे,नुकतच पाण्यान सचैल स्नान करून झाड टवटवीत झाली आहेत.सूर्याचे सोनेरी किरण ऊबदारपणान पाठीवरून हात फिरवत आहेत,दारात टाकलेले तांदुळाचे दाणे चिमण्या पाखर टिपत आहेत,एखादा भारद्वाज चाफ्याच्या झाडावर बसून घुमतो आहे हे दृष्य डोळ्यात साठवून ठेवावस वाटत.
घरात आजी आजोबा असतील अन अंगणात झोपाळा असेल तर नातवंडांसकट त्यांचा मुक्काम झोपाळ्यावरच असतो. सकाळच दूध,अभ्यास,कधी दूधभात भरवण संध्याकाळच शुभंकरोती ,रात्री मांडीवर घेऊन झोके घेत झोपवण सगळ अंगणातच चालू असत.लपाछपी ,लंगडीपळती,गोट्या,विटीदांदू मग लुटूपुटूच क्रिकेट हे सगळ अंगण आनंदान मजेत पहात असत.सायकल ते टू व्हिलर आणि नंतर फोरव्हीलर हा प्रगतीचा प्रवास या अंगणान डोळे भरून पाहिलेला असतो.सोनुड्याच्या मुंजीचा आणि छकुलीच्या लग्नाचा छोटेखानी मांडव याच अंगणात सजलेला असतो.इथूनच घरात येणार्यांच मनापासून स्वागत होत आणि निरोपही इथूनच दिला जातो.या अंगणान खूप रागलोभ पाहिलेले असतात.तसच जुईच्या मांडवाखाली सुगंध अंगावर झेलत काढलेला रुसवा पण पाहिलेला असतो. दिवाळीत आकाशदिवा अन दिव्यांची रोषणाई इथे उजळलेली असते.वर्ष प्रतीपदेची गुढी नव्याकोर्या खणान इथेच सजलेली असते.थंडीत कोवळ्या उन्हात पाठ शेकायला इथच बसावस वाटत.पावसाळ्यात इथूनच पागोळ्यांखालचे मोती ओंजळीत धरता येतात.उन्हाळी पावसातल्या गारा इथच वेचल्या जातात आणि कडक उन्हाळ्यात रात्री अंगणात बाजेवर पडून गार वार्यात चांदण्या मोजण्याची मजाही काही औरच असते.उन्हाळी वाळवण घालण्यासाठी अंगण हव.झळवणीच पाणी गरम करायला घागर ठेवायला अंगण हव.परीक्षेच्या दिवसात पाठांतरासाठी अंगणच हव अन सुटीच्या दिवसात गाण्याच्या भेंड्यांसाठीही अंगणच हव.गड्डा झबू अन भिकार सावकार रंगवण्यासाठी अंगण हव अन चांदोबा, विचित्र विड वाचायसाठीही अंगणच हव.रात्रीच जेवण सर्वानी मिळून करायला अंगण हव अन कोजागिरीच केशरी दूध चंद्राच्या प्रकाशात थंड करायला ठेवायलाही अंगणच हव.
अंगण म्हणजे घराचा आरसा.तिथल्या सुखदु:खाच प्रतिबिंब अंगणातल्या हालचालीत पडत आणि अंगणातल्या आनंदाचा शिडकावा घरावर होतो.म्हणून प्रत्येक घराला छोटस का होईना अंगण हव.नाहीतर ‘‘मैं तुलसी तेरे आँगनकी, अंगणी पारिजात फुलला, माझ्या ग अंगणात। कुणी सांडिला दूधभात। जेविले जगन्नाथ कृष्णबाळ।। ’’ही गाणी कशी म्हणायची? सडा रांगोळी कुठ करायची? वाट कुठे पहायची? घराकडे येणारी सुखाची आनंदाची पायवाट पायरीपर्यंत पोहोचवण्याच हे माध्यम ‘अंगण‘आपल्या आयुष्यात असायलाच हव.गर्दीच्या शहरात सापडत नसेल तर खेड्यात जाऊन पहायला हव .काहीच नाही जमल तर मनाच्या एका कोपयात आज ‘अंगण’निर्माण करायला हव.
© सुश्री मानसी काणे
संपर्क – 02332330599
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
शब्दांच्या रांगोळीचे अंगण छान सजवलेत आहेत.