सौ. अमृता देशपांडे
शिक्षण – B.A . मराठी
नोकरी – EDC, A Semi Govt Financial Institution.
निवृत्ति नंतर मराठी लेखनास सुरवात. अनेक कविता प्रकाशनाच्या मार्गावर, दिवाळी अंकांमधून कथा, कविता प्रकाशित. वाचन लिखाण यांची आवड.
‘स्मृति कलश’ या ज्योती देशपांडे यांच्या पुस्तकाचे शब्दांकन, संपादन.
☆ विविधा ☆ ल्क्ष्मण रेषा☆ सौ. अमृता देशपांडे ☆
प्रभु श्रीराम कस्तुरीमृगामागे गेले, रामाची ‘धाव लक्ष्मणा धाव’ अशी आरोळी ऐकून सीता घाबरली. तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी जाण्यास भाग पाडले. सीतेच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मणाने आश्रमाभोवती आपल्या बाणाच्या टोकाने एका रेषेचे कुंपण घातले आणि त्या बाहेर पाऊल न टाकण्याचा इशारा सीतामाईला देऊन तो रामाच्या आवाजाच्या दिशेने गेला.
पुढे काय झाले, हे आपण सर्वचजण जाणतो. त्याचे कारणही जाणतो. तेव्हापासून हेच कुंपण ‘लक्ष्मणरेषा’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिथे सीतामाई होती, तिचं अपहरण झालं, म्हणून लक्ष्मणरेषा फक्त स्त्रियांसाठीच असते, असा सोयीस्कर अर्थ नोंदवला गेला.
लक्ष्मणरेषा ही एकदाच ओढली गेली आणि तिचे उल्लंघन केल्याने जो अनर्थ घडला, त्यामुळे पुराणातील एक शिकवण किंवा एक इशारा म्हणून ती अजरामर झाली.
लक्ष्मणरेषा म्हणजे आत्मसंयमन, लक्ष्मणरेषा म्हणजे स्वत्वाचे रक्षण, लक्ष्मणरेषा म्हणजे आचारविचारांसाठी एक नियम, लक्ष्मणरेषा म्हणजे चारित्र्य, शील यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक सुरक्षित कवच.
चारित्र्य आणि शील यांचे जतन आचार-विचार, आहार-विहार, याच्या माध्यमातून व्यक्त होते. आचार म्हणजे आपले वागणे,बोलणे, समाजात वावरणे, पोषाख, दुस-याला मान देणे, आदर करणे.
विचार म्हणजे पूर्वकाळातील अनुभव आणि संस्कार यातून आपल्याला झालेले ज्ञान व त्याचा सद्यः परिस्थिती साधलेला समन्वय.
आहार म्हणजे शरीराला आवश्यक, प्रकृतीला अनुरूप असा आणि गरजेपुरताच करावयाचा अन्नपुरवठा.
विहार म्हणजे शरीर व मनाला उत्साह, आनंद, तरतरी देणारा अनुभव. तो व्यायाम असेल, पर्यटन असेल किंवा स्थलपालट असेल.
वरील चारही गोष्टी करत असताना, सृष्टीवर त्या जगन्नियंत्याचे अधिपत्य आहे, हे जाणून कर्म करणे. चांगले- वाईट दोन्ही कर्मे तो पहात आहे, याची जाणीव सतत ठेवणे. हे संस्कार मनावर असावे लागतात. यश, आनंद, समाधान ही चांगल्या कामाची फलश्रुती असते तर वाईट कृतीची शिक्षा ही भोगावीच लागते. हे ध्यानात ठेवून चांगले कर्म करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.
भारतीय संस्कृतीचा हा अलिखित पण अधोरेखित नियम आहे. समाजात वावरताना देहबोली ही महत्त्वाची असते. ही एक अलिखित बोली आहे.ती व्यक्तीच्या व्यवहारातून, चालण्या बोलण्यातून राहणीमानातून, पोषाखावरून, व्यक्त होते. ही संयमाची लक्ष्मणरेषा अतिशय काटेकोरपणे पाळावी लागते. जरासं सुद्धा रेषेबाहेर पडलेलं पाऊल पाय घसरायला कारणीभूत ठरू शकते. हे केवळ नीतीमत्तेच्या संदर्भात नाही तर सर्व बाबतीत आहे.
हा नियम स्त्री-पुरूष, गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, सर्वांना लागू असतो. स्थलकाल, वर्णजाती, याचे परिमाण न राखता, पृथ्वीवरच्या मनुष्याला सर्व समान लागू असतो. प्रत्येकाचे वर्तन, उपजीविकेचे व्यवहार यासाठी ही आहे.
ह्याची जाणीव घराघरातून वडीलधा-यांनी स्वतः सांभाळावी, तरूण वर्गाला करून द्यावी. शिक्षण संस्थांनी याबाबतीतले नियम कडक केले पाहिजेत. अनेक संस्थांनी अशी पावले उचलली आहेतही.
प्रत्येकानेआपल्या मनात लक्ष्मणरेषेचे भान ठेवलेच पाहिजे. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी आपले रक्षण करण्यासाठी आईवडील, भाऊ,दीर, मित्रमैत्रिणी, पोलिस बरोबर असतीलंच असं नाही, पण मनातली लक्ष्मणरेषा आपल्याला संरक्षण नक्कीच देते.
धुंद होऊन जगताना संयम हवा. बोलताना संयम हवा.विचार करताना लक्ष्मणरेषेची जाणीव असावी. लक्ष्मणरेषा प्रत्येकाने आपल्या पुरती सीमित केली तरी खूप आहे.
छोटे-मोठे अनर्थ घडूच नयेत म्हणून लक्ष्मणरेषेचा आदर करावा, स्वतःच्या आणि दुस-यांच्याही.
© सौ. अमृता देशपांडे
पणजी
9822176170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈