सौ.ज्योत्स्ना तानवडे
संक्षिप्त परिचय
शिक्षण- बी. एस सी. (जियोलॉजी)
साहित्य – ‘अकल्पित’ कथासंग्रह आणि ‘श्रावणसर’ कविता संग्रह प्रकाशित.
विजयन्त, विपुलश्री,दै.केसरी, सत्यवेध, उत्तमकथा, ऋतुपर्ण, आभाळमाया यासारख्या मासिके, दिवाळी अंकात,पेपरमधून कथा, कविता, विविध लेख प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्र सेविका समितीच्या हस्तलिखितात ६-७ वर्षे कथा , कविता लेखन समाविष्ट. अनेक आनलाईन संमेलनात कविता वाचन केले.
सांगली आकाशवाणी वरून अनेक कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण.
‘ओवी ते अंगाई’ या सांस्कृतिक कार्यक्रमास लेखन सहाय्य व सादरीकरण.अंदाजे ७५ प्रयोग केले.
satsangdhara.net या आध्यत्मिक साईटसाठी श्रीमत भागवत पुराण आणि श्रीदेवी भागवत या ग्रंथाचे भावार्थ वाचन केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात(सांगली) कविता सादरीकरण आणि संमेलनाच्या कथासंग्रहात कथा प्रकाशित.
साहित्य भूषण (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक), साहित्य भूषण(नाशिक) चा ‘गोदामाता’ पुरस्कार’ , कथालेखन,कथावाचन, चारोळी पुरस्कार.
? विविधा: वृक्षसखी – सौ.ज्योत्स्ना तानवडे ?
“वसुधा, खूप छान वाटलं बघ तुला अशी पारावर निवांत बसलेली पाहून.अशीच आनंदात रहा. अग,तुझ्यामुळेच माझे आजचे हे रूप आहे. वसुधाने चमकून वर पाहिले. तिच्या डोक्यावरचा गुलमोहर बोलत होता.
“अगदी खरे आहे हे वसुधा,” शेजारचा बहावा बोलला.वसुधा त्याला निरखू लागली. पिवळ्या घोसांनी पूर्ण लगडला होता.ती नाजूक झुंबरे वाऱ्यावर डोलत होती.
तो म्हणत होता,”आमच्या दोघांचे सुरवातीचे रूप आठवते ना? मोठ्या धुमधडाक्यात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण झाले. या दोन खड्ड्यात माझी आणि या गुलमोहराची स्थापना झाली. हार-तुरे- फोटो- भाषणे- गर्दी सगळे सोपस्कार झाले.पण पुढे काय? पुढे कोणी आमच्याकडे फिरकले सुध्दा नाही.आमच्या बाजूच्या रोपांनी सुकून माना टाकल्या. अधून-मधून पडणाऱ्या पावसाने आम्ही कशीबशी तग धरून होतो. तेव्हा तू आमच्या मदतीला धावलीस. आमची किती काळजी घेतलीस. म्हणूनच आज आम्हाला दोघांनाही हे देखणे रूप प्राप्त झाले आहे.”
वसुधाला सर्व आठवत होते. मुळातच वसुधा म्हणजे झाडाझुडपांची, फळाफुलांची प्रचंड आवड असणारी एक निसर्ग वेडी होती. तिने आपल्या बंगल्याच्या दारापुढची बाग लहान मुलाला जपावे तशी सांभाळलेली होती. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे,फळझाडे नीट आखणी करून लावली होती. योग्य खत-पाणी, वेळच्यावेळी छाटणी करून त्यांना छान आकार दिला होता. ती बागेला खूप जपत असे. त्यातच वृक्षारोपणात गेटजवळ लावलेल्या दोन रोपांनी तिचे लक्ष वेधून घेतले. त्यांची परवड बघून तिला खूप वाईट वाटले.ती त्या रोपांची पण आता नीट काळजी घेऊ लागली. हळूहळू जोम धरून त्यांनाही बाळसे येऊ लागले.
वसुधाने घरावरील छतावर पडून वाहणारे पावसाचे पाणी एका मोठ्या टाकीत साठवायला सुरुवात केली.त्यातून वाहणारे जास्तीचे पाणी बोअर जवळ पाझरखड्डा करून त्यात सोडले.बागेच्या पाण्याची सोय झाली. बागेच्या एका कोपर्यात खड्डा काढून त्यात घरातला ओला कचरा, बागेतले गवत, पालापाचोळा टाकायला सुरुवात केली. छान खत तयार होऊ लागले. घरचे खतपाणी मिळाल्याने झाडे फुलाफळांनी लगडली. दारापुढची गुलमोहर बहवा जोडी सुद्धा लाल पिवळ्या फुलांनी बहरून रंगांची उधळण करू लागली. वसुधाने या दोन्ही झाडांना छोटे-छोटे पार बांधले. येणारे-जाणारे त्यावर विसावू लागले.वसुधाच्या बागेत वेगवेगळे पक्षी, फुलपाखरे भिरभिरू लागली.
वसुधाला निसर्गाची खूप ओढ होती.त्यामुळे वायु प्रदूषण, जल प्रदूषण, वृक्षतोड, लागणारे वणवे यांच्या बातम्यांनी तिला खूप वाईट वाटे. निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो मग आपण त्याची तितकीच जपणूक केली पाहिजे. प्रत्येकाने घराबरोबरच घराबाहेरचा परिसर स्वच्छ राखला पाहिजे. आपल्या मुला-बाळां प्रमाणेच झाडांची, नदी-नाल्यांची, प्राणिमात्रांची काळजी घेतली पाहिजे. ते सुद्धा आपले जिवलग आहेत अशी तिची भावना होती. तिच्या घरा पुढील रस्ता वृक्षतोडीमुळे उघडा बोडका रूक्ष झाला होता.त्यामुळेच तिच्या घरापुढची सुंदर फुललेली बाग एखाद्या ‘ओअॅसिस’ सारखी होती. येणाऱ्या-जाणाऱ्याचे पाय आपोआप तिथे रेंगाळत. कौतुकाने बाग न्याहाळत. लाल-पिवळ्या वैभवाने बहरलेली दारापुढची जोडगोळी तर रस्त्याचे आकर्षण बनून गेली होती.
अशी ही वृक्षवेडी वसुधा.बागेत छान रमायची. आपले प्रत्येक सुखदुःख त्या झाडांशी बोलायची. त्यांचा सहवास तिला मोठी सोबत वाटायची.’ वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे प्रत्यक्षात जगणाऱ्या वसुधाचा ध्यास प्रत्येकाला लागायला हवा. आता तर पाऊसही पडतो आहे. ओली माती नवीन रोपांच्या प्रतीक्षेत आहे. मग काय मंडळी, कामाला लागू या ना !
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूप छान.निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्व सांगणारा लेख.
आपल्या साहित्य चे स्वागत आहे.