श्री सुहास रघुनाथ पंडित
🌸 विविधा 🌸
☆ विचारपुष्पातील मधुसंचय… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
स्वामी विवेकानंद यांचे जीवन व कार्य याविषयी सविस्तर माहिती देणारी ‘विचारपुष्प ‘ ही डॉ.नयना कासखेडीकर लिखित लेखमाला नुकतीच समाप्त झाली. सुमारे सव्वावर्षाहून अधिक काळ ही साप्ताहिक लेखमाला चालू होती. स्वामीजींच्या बालपणापासून ते त्यांची जीवनज्योत मालवेपर्यंतचा जीवनपट यात त्यांनी मांडला आहे. अवघ्या एकोणचाळीस वर्षांच्या अल्पायुष्यात असामान्य कार्य करणा-या महामानवाचे कार्य मोजक्या शब्दमर्यादेत लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम सोपे नव्हते.पण सौ.कासखेडीकर यांनी आपल्या अन्य जबाबदार-या पार पाडून ते पूर्ण केले आहे.
डाॅ.नयना कासखेडीकर
स्वामीजींचे बालपण, युवावस्था, त्यांचे मानसिक द्वंद्व, जिज्ञासा, प्रखर बुद्धीमत्ता, विदेशातील कार्य अशा अनेक बाबींवर या लेखमालेतून वाचायला मिळाले. लेखमालेतील सर्वच भागांचा आढावा घेणे शक्य व योग्य नसले तरी स्वामीजींचे काही विचार, वचने ही कधीच विसरता येणार नाहीत. त्यापैकी काहींचा उल्लेख इथे करावासा वाटतो.
जीवनातील ध्येयाविषयी स्वामीजी म्हणतात, “जीवनात आदर्श हवा. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अपयशाला यशामध्ये बदलता येते.”
शिक्षणाविषयी ते म्हणतात
“जे शिक्षण सामान्य लोकांमध्ये चारित्र्य, बल, सेवा, तत्परता आणि साहस निर्माण करु शकत नाही, ते काय कामाचे ? ज्यामुळे सामान्य माणूस स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण.”
कशासाठी वाचायचे?
“वाचनाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन मिळतो, उमेद मिळते. मन संवेदनाशील होते. एकमेकांच्या सुखदुःखाची तीव्रता कळते. शब्दसंग्रह वाढतो.”
स्वामीजींचे संगीताविषयीचे ज्ञानही सखोल होते. ते स्वतः गात असत. ते म्हणत, “संगीत ही सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ज्यांना समजू शकते त्यांच्या दृष्टीने ईश्वराची पूजा करण्याचा तो सर्वोत्कृष्ट प्रकार आहे.”
“परिस्थिती जितकी प्रतिकूल असेल तितकी तुमच्या आंतरिक शक्तींना अधिक जाग येत असते. “हे स्वामीजींचे विधान सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे.
निरासक्त, निःसंग,वैराग्यशीलता आणि विनम्रता हे स्वामीजींचे विशेष गुण. अनेक प्रसंगातून याचे दर्शन घडते.
स्वामीजींची धर्माविषयीची मते तर जाणून घेऊन आचरणात आणणे आवश्यक आहे.कर्मकांडाचा अतिरेक झाल्यामुळेच समाज रचनेत दोष निर्माण झाला आणि त्यामुळेच संस्कृतीचा-ह्रास झाला हे त्यांचे मत परखड असले तरी सत्य आहे. “आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरुन गेलो आहोत हे आपले खरे दारिद्र्यपण आहे. आपल्या ठायी स्वतःच्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील. “स्वामीजींचे हे निरीक्षण आजही खरे ठरत आहे. सर्वधर्मसमभाव हा शब्द आपणा सर्वांनाच माहित आहे. स्वामीजी म्हणतात, “प्रत्येकाने दुस-या धर्मातलं सारभूत तत्व ग्रहण करायचं आहे. त्याचवेळी आपलं वैशिष्ट्यही जपायचं आहे. आणि अखेर स्वतःच्या स्वाभाविक प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास करुन घ्यायचा आहे.”
अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुरेख संगम व्हावा अशी इच्छा बाळगणारे स्वामी विवेकानंद म्हणतात, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे.”
प्रत्येक लेखातून अशी नवीन माहिती, विचार, वचने मिळत गेल्याने संपूर्ण लेखमाला वाचनीय झाली आहे. मालिका संपली असली तरी त्यातील विचार कण वेचावेत तेवढे थोडेच आहेत. हा सारांश नव्हे पण लेखमाला वाचल्यानंतर आपल्याला मिळालेले इतरांनाही द्यावे, म्हणून लिहावेसे वाटले, एवढेच !
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈