श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ वाचावी बहुतांची अंतरे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
केवळ दोन वर्षांचा असलेला प्रणाद त्याच्या आईवडिलांसोबत एका पुस्तक महोत्सवात गेला. तेथील एका स्टॉलवर असणारे आकर्षक छोटे पुस्तक पाहून हे पुस्तक मला पाहिजेच म्हणून त्याने हट्ट धरला आणि मग त्याच्या आईबाबांना ते पुस्तक घ्यावेच लागले. त्या लहानग्याला वाचता येत नव्हते पण पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रांनी त्याला आकर्षित केले. माझ्या मते हा पुस्तकाचा सगळ्यात छोटा ग्राहक असावा आणि हेच पुणे येथे भरलेल्या पुस्तक महोत्सवाचे वेगळेपण आहे असे मला वाटते. आपल्या मुलांना अनेक ठिकाणे दाखवण्यासाठी आपण घेऊन जातो पण पालकांनी आपल्या मुलांना घेऊन या पुस्तक महोत्सवाला जरूर जावे असे मला वाटते आणि अनेक सुज्ञ पालक तसा लाभ आपल्या मुलांना मिळवून देत आहेत.
आजच्या मोबाईलची क्रेझ असलेल्या जमान्यात आपल्या मुलांवर जर वाचनसंस्कार करायचा असेल तर असे हे पुस्तक महोत्सव त्यांना दाखवायलाच हवे. ही आधुनिक पर्यटनाची ठिकाणे समजावीत. अनेक शाळा देखील या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना हा पुस्तक महोत्सव दाखवण्यासाठी घेऊन येताहेत. या पुस्तक महोत्सवात येणाऱ्या रसिकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. आल्याबरोबर त्याचा मोबाईल क्रमांक आणि नाव लिहून घेतले जाते आणि त्याला दोन सुंदर पुस्तकांची भेट दिली जाते. पुस्तक महोत्सवातून हा रसिक वाचक भलेही पुस्तक खरेदी करेल किंवा नाही हे सांगता येणार नाही, पण बाहेर पडताना आपल्या सोबत तो दोन पुस्तके मात्र नक्की घेऊन पडतो आणि सोबतच हृदयात साठवलेले पुस्तक महोत्सवाचे दृश्यही.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात भरलेल्या या महोत्सवात आल्याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आपले स्वागत करतात आणि आपल्या हातात एक पुस्तक देऊन एक परिच्छेद वाचायची विनंती करतात. यातूनच एक नवा आणि चौथा विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. तो म्हणजे ‘ लार्जेस्ट ऑनलाईन अल्बम ऑफ पीपल रिडींग सेम पॅराग्राफ ऑफ मिनिमम ड्युरेशन ऑफ थर्टी सेकंड्स ‘ या अभियानाअंतर्गत तब्बल अकरा हजार पेक्षा जास्त लोकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद वाचला आणि हा एक अनोखा विश्वविक्रम या ठिकाणी नोंदवला गेला. या वाचनात मला सह्भाग देता आला त्याचा आनंद नक्कीच आहे. त्यासोबतच आणखीही तीन विश्वविक्रमांची नोंद या महोत्सवाच्या निमित्ताने झाली. आपल्या पाल्याला गोष्ट सांगण्याच्या उपक्रमात तब्बल ३०६६ पालक सहभागी झाले होते. दुसरा विश्वविक्रम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या १५० विद्यार्थ्यांनी ७५०० पुस्तकांचा वापर करून ‘ भारत ‘ हा शब्द साकारला. आणि तिसरा विश्वविक्रम म्हणजे तब्बल १८ हजार ७६० पुस्तकांच्या साहाय्याने ‘ जयतु भारत ‘ हे प्रेरणादायी शब्द साकारण्यात आले.
साहित्य संमेलनात असतात तसेच अनेक मुलाखतीचे किंवा चर्चासत्राचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले आहेत. अनेक मान्यवर लेखक, शास्त्रज्ञ आणि राजकीय नेते या महोत्सवाला आवर्जून भेट देत आहेत, संबोधित करीत आहेत. हा महोत्सव साकारण्यासाठी राजेश पांडे आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत आणि नियोजन केल्याचे सहजच लक्षात येते. येथे येणाऱ्या रसिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आयोजकांनी घेतल्याचे लक्षात येते. अनेक नामवंत प्रकाशन संस्था यात सहभागी झाल्या आहेत. अनेक मान्यवर संस्थांनी या महोत्सवाच्या आयोजनात सढळ हाताने मदत केली आहे. सर्वांच्या सहभागाचे आणि सहकार्याचे हे एकत्रित फळ आहे. अशा या महोत्सवांकडे केवळ एक उपक्रम म्हणून पाहून चालणार नाही. हा आपला ज्ञान आणि संस्कृतीचा महोत्सव आहे असे म्हणायला हरकत नाही.
या पुस्तक महोत्सवाच्या काळात माझे काही कारणाने पुण्यात येणे झाले आणि पुण्यातील दोन ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. त्यातील पहिली ऐतिहासिक गोष्ट म्हणजे पुण्यात १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर आणि वर उल्लेख केलेला पुस्तक महोत्सव. दुसरी महत्वाची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे अयोध्येत होणाऱ्या राममंदिरातील प्रभू रामचंद्रांसाठी ‘ दोन धागे रामासाठी ‘ हा सौदामिनी हॅन्डलूम येथे अनघा घैसास यांच्या प्रेरणेतून सुरु आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभे राहते आहे. या मंदिरातील मूर्तीसाठी दोन धागे आपणही विणावे, आपलाही खारीचा वाटा त्यात असावा असे प्रत्येकाला वाटल्यास नवल नाही. याच भावनेतून लाखो पुणेकर आणि अन्य प्रांतातील लोकही येथे एकत्र येऊन जाती, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन रामरायासाठी वस्त्र विणत आहेत. हे एक आगळेवेगळे राष्ट्रभक्तीचे, रामभक्तीचे उदाहरण आहे असे म्हणायला हरकत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे २०२३ या वर्षाचा डिसेंबर महिना यानिमित्ताने निश्चितच माझ्याच काय परंतु समस्त पुणेकर आणि पुस्तकप्रेमी मंडळींच्या लक्षात राहील.
आपण विविध महोत्सव साजरे करतो पण हा एकाच छताखाली साजरा होणारा हा पुस्तक महोत्सव अनेक दृष्टींनी आगळावेगळा आहे. या महोत्सवात पुस्तकांचे जवळपास २५० स्टॉल्स आहेत आणि १५ भाषांतील प्रकाशित पुस्तके या ठिकाणी वाचकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. धार्मिक पुस्तकांपासून तर वैज्ञानिक माहिती देणाऱ्या पुस्तकांपर्यंत आणि बालवाचकांपासून महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी विविध पुस्तके या ठिकाणी उपलब्ध आहेत. या ठिकाणी सुमारे दोन लाख पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. या, बघा, खरेदी करा आणि वाचा असं आवाहन जणू ते करीत आहेत. अशा प्रकारचे पुस्तक प्रदर्शन दिल्लीत दरवर्षी होणाऱ्या पुस्तक मेळ्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच होते आहे. या पुस्तक महोत्सवाला वाचकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आबालवृद्ध या महोत्सवाला भेट देत आहेत.
या महोत्सवामुळे अनेक लेखक, कवींची पुस्तके पाहण्याची, वाचण्याची आणि खरेदी करण्याची संधी वाचकांना मिळते आहे. वैचारिक दृष्ट्या समृद्ध व्हायचे असेल तर येथे येऊन ‘ वाचावी बहुतांची अंतरे ‘ असेच म्हणावे लागेल.
© श्री विश्वास देशपांडे,
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈