सुश्री विभावरी कुलकर्णी
🔅 विविधा 🔅
☆ वस्तू वस्तू जपून ठेव – १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
सकाळी सकाळी रेडिओ लावायची जुनी सवय बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या करते. आज गाणे ऐकले शब्द शब्द जपून ठेव एकीकडे काम चालू होते. आणि इतके अर्थपूर्ण गाणे ऐकत असताना माझ्या मनातील कसे विचार येतात याचे हसू आले. आणि जपून ठेवलेल्या वस्तू आठवायला लागल्या. आणि कुठे कुठे जीव अडकतो याची गंमत वाटली.
परवा सहज कपाट आवरताना जरा पिवळसर पडलेली कॅरीबॅग सापडली. उघडून बघितले तर रेडिओचे लायसन सापडले. आता असे वाटेल हा काय प्रकार आहे? पण पूर्वी ( मी लहान असताना ) रेडिओ साठी परवाना आवश्यक होता. एका वर्षा साठी १/२ रुपये पोस्टात भरून त्या पुस्तकावर तिकीट लावून आणावे लागायचे. आणि घरात टेबल सारखे मोठे रेडिओ असायचे तो नीट ऐकण्यासाठी ३/४ फूट लांबीची व २/३ इंच रुंदीची तांब्याची जाळी असलेली पट्टी घरात लावावी लागायची. आणि छोटा रेडिओ ( ट्रांझिस्टर ) सायकलच्या हॅण्डलला लावून लोक ऐटीत फिरायचे. आणि ज्याच्याकडे लायसन नसेल तो लपवून ट्रांझिस्टर नेत असे.
हे सर्वच रेडिओ मात्र नवनवीन कपडे घालायचे.
त्यात गृहिणीची कलाकुसर व दृष्टी याची जणू परीक्षा व्हायची. काही जणी तर त्यावर स्वहस्ते भरतकाम करायच्या आणि कौतुक मिळवायच्या.
जी सायकल असणे भूषणावह असायचे त्या सायकलला पण लायसन ( परवाना ) लागायचा. त्या साठी वर्षाला १२ रुपये भरावे लागायचे.ते भरले की एक पितळी बिल्ला मिळायचा. तो सायकलच्या मागे किंवा सीटखाली लावला जायचा. आणि हो, तो बिल्ला चोरीला पण जात असे. पोलिस मामा सायकल स्वाराच्या सायकलचे हॅण्डल पकडुन बिल्ला दाखवायला लावायचे. त्या सायकलला मागच्या चाकाजवळ एक मेटल ची बाटली असायची आणि एक पातळ वायर सायकलच्या नळी वरून सरळ पुढे येऊन सायकलचा दिवा ( हेड लाईट ) प्रकाशमान करायची. काय तो थाट असायचा. त्या सायकलचे इतके लाड असायचे की जमेल तितके सजवले जायचे. रोज प्रेमाने अंघोळ घातली जायची. शोभिवंत सीट कव्हर असायचे. कधी कधी त्याला झुरमुळ्या लावल्या जायच्या. सायकलची मूठ पण सजवली जायची. अगदी एखादी मुलगी सजवावी असे वाटायचे. मधून मधून तिचा रंगही बदलला जायचा. आणि हॅण्डल वर एक सुंदर घंटा आगमन वार्ता देण्यासाठी असायची. तिची पण विविध रूपे बघितली आहेत व आवाज ऐकले आहेत. कोणाची सायकल व स्वारी आली आहे हे ती घंटा आपल्या किणकिणत्या, घणघणत्या किंवा ठणठणत्या स्वरात सांगायची.
मग हळूहळू अनेक कंपन्या आल्या आणि सायकलचे स्वरूप बदलत गेले.
सुरुवातीला ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट टि व्ही घेतले होते त्यांना पण लायसन असायचे. नंतर ते बंद झाले. मग टी व्ही सुद्धा नवीन नवीन रुपात आले.
या वस्तूंची प्रगती सांगायची म्हंटले तर प्रत्येकासाठी वेगळे लिहावे लागेल. तर आज या जुन्या वस्तू घरात सापडल्या आणि आपल्या माणसांना सांगावे वाटले.आता या वस्तू अशा आहेत की ठेवल्या तर अडचण आणि फेकल्या तर आठवण मी आपली मधून मधून बाहेर काढते. साफसूफ करते आणि नवीन कॅरीबॅग मध्ये ठेवते. कारण त्यात बालपणीच्या आठवणी आहेत. बाकीच्या आठवणी पुढच्या वेळी बघू..
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
सांगवी, पुणे
📱 – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈