श्री प्रसाद जोग
🌸 विविधा 🌸
☆ वसंतोत्सव… ☆ श्री प्रसाद जोग ☆
२६ मार्च पासून वसंतोत्सवाला सुरवात झाली आहे.
सहा ऋतूंमधे वसंत ऋतूला ऋतुराज म्हणतात .दहा दिशांना बहरून टाकत येतो तो हा ऋतुंचा राजा. याच्या आगमनाच्या आधीच निसर्गाच्या सुगंधाच्या रूपाने याची चाहूल लागते .आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.
होळीपासून वाढत चाललेल्या गरमीमध्ये, रखरखाटात झाडे,वेली, पशू, पक्षी त्रस्त होऊन गारव शोधत असतात.अश्या या वाढत्या तळपणाऱ्या उन्हात शिशिरात पानझड झालेल्या वृक्षांवर अचानक एके दिवशी कोवळी कोवळी, हिरवीगार पोपटी पालवी फुलते नुसती पालवीच नाही तर पळस रंगाची उधळण करायला लागतो,गुलमोहर फुलतो ,बहावाचे घोस लटकायला लागतात, फुलेही बहरायला लागतात.
दयाळ, कोकीळ, भारद्वाज अश्या पक्षांना वसंत ऋतुत कंठ फुटेल आणि वसंताच्या आगमनाची वर्दी गोड आवाजात द्यायला सुरवात करतील.
या काळात दिवसाचा,उन्हाच्या काहिलीचा काळ मोठा आणि शांततेची थंडाव्याची रात्र लहान झालेली असते. घामाने शरीराला थकवा, सूर्याची प्रखर किरणे भाजून टाकत असतात, या काळात शारीरिक शक्ती क्षीण होते म्हणून सृष्टी आपला जीवनरस आंबे, फणस, काजू,कलिंगड, खरबूज करवंदे, जांभूळ,जाम अश्या सगळ्यातून भरभरून देत असते.
‘वसंत’या शब्दातच काही जादू असावी, कारण वसंत नांव असणाऱ्यांनी वसंतऋतुप्रमाणेच आपली आयुष्ये समृध्द केली आहेत. आपल्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.
साहित्यातले वसंत
वसंत कानेटकर, वसंत काळे (व.पु. काळे), वसंत सबनीस ,वसंत बापट यांनी वसंत फुलविला.
रंगभूमीवरील वसंत
आपल्या अभिनयाने वसंत नटवला वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे , वसंत ठेंगडी यांनी,
संगीतातले वसंत
आपल्या जादुई सुरवटींनी मनामनातले वसंत फुलवले वसंत देसाई,वसंत प्रभू ,वसंत पवार वसंत निनावे,वसंत आजगावकर, वसंत कानेटकर,वसंतकुमार मोहिते आणि वसंत अवसरे असे टोपण नाव घेऊन गाणी लिहिणाऱ्या शान्ता शेळके यांनी.
अशा या ऋतुराज वसंता मुळे कविंना देखील स्फूर्ती येते आणि ते वसंताचा गौरव करताना वेगवेगळी गाणी लिहितात
वसंत ऋतू आला
आला वसंत देही, मज ठाउकेच नाही
उपवनी गात कोकिळा
हृदयी वसंत फुलताना
कुहू कुहू येई साद
साद कोकीळ घालतो कधी वसंत येईल
कोकीळ कुहू कुहू बोले
गा रे कोकिळा गा
मूर्तिमंत भगवंत भेटला दे दे कंठ कोकिळे मला
ऋतुराज आज वनी आला ऋतुराज आज वनीं आला
बसंत की बहार आयी,
(नाट्क> मंदारमाला)
अजूनही खूप गाणी आहेत चला तर मंडळी आपणही वसंतऋतूचे स्वागत करूया त्याचा.आनंद साजरा करताना म्हणूया
चोहीकडून तो वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो
चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित येतो
पक्षी कूजन मधुर ऐकू ये, आसमंत हा गुंगुन जावा
फुलाफुलातून साद उमलते,
वसंत घ्यावा
वसंत घ्यावा
© श्री प्रसाद जोग
सांगली
मो ९४२२०४११५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈