श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ वटपौर्णिमा अर्थात ‘वैश्विक पर्यावरण दिन’ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
।श्रीराम। आपण हिंदू लोकं उत्सवप्रिय आहोत. आपल्या संस्कृतीतील सर्व सण विज्ञानाधिष्ठीत आहेत. सर्व सण कौटुंबिक वातावरण उबदार करणारे आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करणारे आहेत. हिंदूंचा कोणताही सण घेतला तरी त्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामाजिक आशयच प्रगट होत असतो हे आपल्या लगेच लक्षात येईल. आपले सर्व सण सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव शिकवतात. ‘ज्याला कृष्णाचा ‘काला’ समजला त्याला वेगळी ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकविण्याची बिलकुल गरज नाही’ असे एक वचन प्रसिद्ध आहे.
चुकून कुणाला पाय लागला तर नुसते ‘क्षमस्व’ किंवा आजच्या नवीन पिढीच्या आंग्लमिश्रित भाषेत तोंडदेखलं ‘सॉरी’ म्हणणारी आपली संस्कृती नाही तर अतीव नम्रतेने ‘नमस्कार’ करणारी आपली संस्कृती आहे. अशा प्रकारचा व्यवहार अथवा परंपरा आपल्याला इतरत धर्मात अथवा उपासना पद्धतीत बघायला मिळत नाही. इतक्या सूक्ष्म स्तरावर समोरील मनुष्याच्या भावभावनांचा विचार करणारी दुसरी संस्कृती ह्या भूतलावर नक्कीच नसेल. असे असूनही परकियांपेक्षा आपले लोकच आपल्या धर्मावर जास्त टीका करतात, याचे नवल वाटते. टीका करणे आपण एक वेळ समजू शकतो, पण आज कोणताही हिंदू सण आला की त्याला विरोध करणारे एकवटतात आणि हिंदू धर्म कसा विज्ञानविरोधी आहे, अंधश्रद्धाळू आहे, बुरसटलेल्या विचारांचा आहे असे सांगण्याची तथाकथित बुद्धिजीवी लोकांची अहमहिका सुरु होते.जेष्ठ पौर्णिमेला जिवंत वडाची पूजा करणे ही अंधश्रद्धा मानणारी तथाकथित पुढारलेली ( ‘अतिप्रागतिक वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी’ ) मंडळी २५ डिसेंबरला मात्र कृत्रिम ‘ख्रिसमस ट्री’ बनविताना आणि आकाशातून ‘सांताक्लाज’ नावाचा कोणी ‘देवदूत’ येईल या आशेने त्याच्या येण्याची वाट पाहतांना मात्र आपल्या दृष्टीस पडतात. अशा वेळी त्यांच्या (अ)वैज्ञानिक दृष्टिकोनाची कीव येते.
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आपल्याकडे आहे. याला वटपौर्णिमा असेही म्हणतात. सुवासिनींनी वडाची पूजा करावी, दिवसभर उपवास करावा आणि एकूणच त्या दिवशी ‘व्रत’ धरावे अशी अपेक्षा असते. चातुर्मासाच्या पुस्तकात सत्यवान आणि सावित्रीची कथा देखील आहे. कहाणीत सांगितल्याप्रमाणे सत्यवानाचा मृत्यू होतो. सावित्रीला हे समजल्यावर ती यमाकडे जाते आणि आपल्या पतीला जीवनदान मिळवून परत स्वगृही घेऊन येते अशा अर्थाची ही कथा आहे. ज्या झाडाखाली सत्यवान जिवंत होतो ते झाड वडाचे होते, म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. भाविकांनी ती कहाणी अवश्य वाचावी.
“सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||”
वरील प्रार्थना वटपोर्णिमे संदर्भात आहे. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त ( साधारण हजार वर्षे) असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.
आजच्या काळात आपल्याला या व्रताचा आणि त्या कहाणीचा वेगळ्या प्रकारे विचार करता येईल. त्याआधी वड या झाडाचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत. वडाचे बीज अतिसूक्ष्म असते, पण त्यातून निर्माण होणारा वृक्ष हा अतिविशाल असतो. वड ही अधिकाधिक प्राणवायु देणार वृक्ष आहे, त्याचे आयुष्य साधारणपणे हजार ते अकराशे वर्ष असते. वैशाख वणव्यातून बाहेर पडून धरती पावसासाठी आसुसलेली असते. दोन ऋतूंमधील संधिकाल असल्यामुळे वातावरण प्रकृतिला त्रासदायक असते. काही ठिकाणी कमीअधिक प्रमाणात पाऊस सुद्धा झालेला असतो. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी मनुष्याला अधिक प्राणवायुची (शुद्ध वातावरणाची) गरज असते आणि ती पुरवण्याची क्षमता फक्त वडात आहे. मनुष्याने या निमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात जावे, प्राणवायू अव्याहतपणे पुरविणाऱ्या वनस्पतींच्या सान्निध्यात यावे हा ह्या व्रताचा मूळ उद्देश!. वडाला पारंब्या असतात त्यामुळे त्याचा विस्तार प्रचंड होतो. विस्तार जरी प्रचंड झाला तरी तो कधी पडत नाही कारण तो वृक्ष आपल्या पारंब्यांच्या आधारावर जमिनीवर दिमाखात उभा राहतो. वड, पिंपळ या सारख्या मोठ्या वृक्षांची लागवड मुद्दाम गावाबाहेर केली जाते. वडाच्या मुळाबाजूच्या मातीत देखील प्राणवायू आणि नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध करून दाखविले आहे. नायट्रोजनयुक्त माती खत म्हणून उपयुक्त असते. वडाच्या प्रारंब्यांपासून बनविलेले तेल केसांसाठी उपयुक्त आहे. ‘पुसंवन’ विधीमध्ये देखील वडाच्या कोवळ्या अंकुराचा उपयोग केला जातो. वडाच्या पारंब्यांचा कितीही विस्तार झाला तरी मूळ खोड कायम सतेज आणि मुख्य आधारस्तंभाच्या स्वरुपात तसेच राहते. वडाची मूळं जमिनीत खूप खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कायम राखली जाते. वडाचे आणिक बरेच उपयुक्त गुणधर्म आहेत जे खास स्त्रियांसाठी गुणकारक आहेत, जिज्ञासू वाचकांनी ते अभ्यासू मंडळींकडून जाणून घ्यावेत.
श्रीगोंदवलेकर महाराजांचे एक वचन आहे. ‘आजपर्यंत हिंदू धर्म टिकला तो घरातील स्त्रियांमुळेच’. पण आज मात्र हिंदूधर्माच्या सण आणि परंपरांवर घाला घातला जात आहे आणि आपल्या सुशिक्षित माता भगिनी त्यास बळी पडत आहेत. आपल्याला पुन्हा हिंदू धर्माला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर आपल्या सर्व सणांचा आजच्या काळानुरूप अर्थ लावावा लागेल आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करुन येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत ते योग्य मार्गाने पोहचवावे लागेल. नवीन पिढी कुशाग्र आहे त्यांना अनेक प्रश्न पडतात, त्यांची सयुक्तिक उत्तरे आपल्याला देता आली पाहिजेत अन्यथा येणारी पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही.
खरंतर ‘वटपौर्णिमा’ हाच *वैश्विक पर्यावरण दिन आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.* सध्या आपण ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. वटपूजनाचा मूळ उद्देश हा आहे की सर्वांना वृक्षांचे महत्व कळावे, वन (वृक्ष) साक्षरता वाढावी. आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांची काळजी आपण ज्या आत्मीयतेने काळजी घेतो तितक्याच किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक आत्मीयतेने आपण वृक्षांचे, वनांचे, वन्यजीवांचे पर्यायाने एकूणच वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे असे हा सण आपल्याला सांगतो. आजची एकूणच पर्यावरणाची स्थिती बघितली, तर वृक्षसंवर्धन अमूल्य आहे याची आपणा सर्वांना निश्चितच जाणीव आहे. ही जाणीव मात्र आपल्याला जागतिक तापमान वाढायला लागल्यानंतर झालेली आहे. हे सर्व *’तहान लागल्यावर विहिरी खणण्यासारखे’ आपण करीत आहोत. आपल्या पूर्वसूरींना मात्र खूप आधीपासून याची जाणीव होती. आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसतानाही ही ‘जाणीव’ त्यांनी प्रयत्नपूर्वक समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविली आणि श्रद्धेने तिचे पालन केले जाईल असे बघितले, नव्हे ती जाणीव समाजमनात उजवली,रुजवली. आज एखादी नवीन प्रणाली आत्मसात करुन ती आपल्या घरात रुजविणे किती जिकरीचे आहे, याची आपल्याला नक्कीच कल्पना आहे. म्हणून भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे दर १५ किमी. वर बोली भाषा बदलते, अशा ठिकाणी वृक्षसंवर्धन करण्यासाठी एखाद्या ‘कहाणी’चा पूर्वसूरींनी आधार घेतला असेल तर ते सयुक्तिकच मानले पाहिजे. त्यांनी ही संकल्पना तत्कालीन समाजात रुजवली, संवर्धित केली आणि आज सुद्धा हे व्रत केले जात आहे याबद्दल आपण आपल्या पूर्वजांचे ऋणी असले पाहिजे.
ज्याप्रमाणे घरातील जेष्ठांना सर्वात आधी नमस्कार केला जातो त्याचप्रमाणे जंगलातील जेष्ठ अशा वडाचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन होणे अपेक्षितच आहे. म्हणून ‘वडाचेच पूजन का?’ हा प्रश्नच गैर आहे असे वाटते. पूर्वी व्रतवैकल्ये प्रामुख्याने महिला करीत असत त्यामुळे हे व्रत महिलांकडे आले असावे. उपवास हा यातील गौण मुद्दा आहे. स्त्रीला धरित्रीची उपमा दिली जाते. स्त्री हीच जन्मदात्री आहे. निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे ती म्हणजे मातृत्व अर्थात नवनिर्मिती करण्याची क्षमता, प्रजनन क्षमता!!!
स्त्री नैसर्गिक गुणानेच सहनशील आणि संयमित आहे. आपल्याकडे कोणतेही देवकार्य, देव पूजन स्त्रीला सोबत घेतल्याशिवाय केले जात नाही. दुर्दैवाने पत्नी हयात नसेल तर सुपारी सोबत घेऊन विधी केले जातात. तसेच आपल्या संस्कृतीत ‘स्त्री’ला लक्ष्मी मानली जाते. स्त्री जशी ‘कोमल’ ह्रदयी आहे तशी ती वेळप्रसंगी ‘दुर्गा’ही होऊ शकते. जन्म देणे आणि संगोपन करणे ही कला स्त्रीला (मादी) निसर्गानेच बहाल केली आहे. चार मुलं एकत्र येऊन आईला सांभाळू शकत नाहीत पण एक आई मात्र चार मुलांना आज सुद्धा सांभाळते. स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते. त्यामुळे स्त्रियांनी हे व्रत केले तर सर्व कुटुंब ते सहज स्वीकारेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन होईल असाही सुप्त उद्देश त्यामागे असावा असे वाटते. कोणत्याही गोष्टीचे ‘मर्म’ न घेता नुसतेच कर्म केले गेले तर योग्य तो लाभ होऊ शकत नाही.
हिंदुधर्म पुनर्जन्म मानणारा आहे. वडाची वाढणारी प्रत्येक पारंबी ही मनुष्याचा नवीन जन्म सूचित करणारी आहे असे मानले तर सात जन्माचे रहस्य आणि वटपूजा आणिक स्पष्ट होईल. गीतेत भगवंतांनी सांगितले आहे की आत्मा मरत नाही तर तो वस्त्र बदलावे, त्याप्रमाणे फक्त शरीर (योनी) बदलत असतो. नरदेह प्राप्त झाल्याशिवाय आत्म्यास मुक्ती लाभत नाही. पारंब्या कितीही वाढल्या तरी वड आपले मूळ खोड विसरत नाही. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याने कितीही वेळा जन्म घेतला आणि तरीही तो आपल्या मूळ स्वरूप असलेल्या ‘आत्मारामा’स विसरला नाही तर त्याला ‘स्व’रूपाची नक्कीच ओळख होईल. आत्मारामाची ओळख करून घेण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. मनुष्य योनीत जन्मास येऊनच रामाने देवत्व प्राप्त केले. त्यामुळे आजच्या शुभदिनी प्रत्येक जोडप्याने असा दृढनिश्चय करावा की आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी आमचे ध्येय एकच असेल ते म्हणजे ‘आत्मारामाची भेट’ !!!
ज्या काळातील ही कथा आहे. त्या काळातील मनुष्याचे आयुर्मान विचारात घेतले तर ते सरासरी १४० वर्षाचे होईल आणि वडाच्या झाडाचे एकूण आयुर्मान आपण १००० वर्षे पकडले तर सात जन्म पुरेल इतके होईल. वटवृक्षाप्रमाणे आपला वंश किमान ७ जन्म अर्थात हजार वर्षे तरी टिकावा किंवा त्याचा वडाच्या पारंब्यांप्रमाणे वंशविस्तार व्हावा म्हणून हे व्रत !! कोणत्याही सजीवास आपला वंश वाढावा असे वाटणे नैसर्गिकच आहे, नाही का ?
पूर्वी लग्न ही ‘संस्कार’ म्हणून केली जात असतं. वंशविस्तार आणि समाजधारणा हा लग्नसंस्काराचा प्रधान हेतू होता. तसेच तत्कालीन व्यवस्थेत मुलीला आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्या काळी पतीलाच देव अथवा गुरू मानले जाई. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाण्याचा मूलभूत अधिकार पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील होता. पतिसेवा हाच स्त्रीयांचा धर्म मानला जाई. भगवान दत्तात्रेयांच्या आईची अर्थात माता अनुसयेची कथा आपणा सर्वांना ज्ञात आहे. देवत्व प्राप्त करणे हे गुरुशिवाय शक्य नाही. म्हणून असा गुरू (आवडीचा पती) मला पुढील सात जन्म तरी मिळावा अशी प्रामाणिक इच्छा असणे गैरलागू कसे होऊ शकते? आपण कोठे प्रवासास निघालो तर सोबतीला आपण आपल्या विश्वासाचा मनुष्य बरोबर घेतो. कारण आपला प्रवास सुखाचा व्हावा अशी आपली त्यामागील भावना असते. इथे आपल्याला ‘मनुष्यत्व ते देवत्व’ असा प्रवास करायचा आहे अर्थात ‘आनंताचा’ प्रवास करायचा असेल तर आपण निवडलेला आपल्या आवडीचा सोबती प्रवास संपेपर्यंत अर्थात जिवाशिवाचे मिलन होईपर्यंत सोबत रहावा असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. वडाभोवती सूत गुंडाळण्यामागे पुर्वजांची संकल्पना अशी होती की वटवृक्षाला शिवाचे प्रतिक मानले जाते, वडाचे खोड सछिद्र असते त्यामुळे त्यास सूताने गुंडाळत फेरी मारणे हे जिवाशिवाचे मिलन झाल्याचे प्रतीक मानले जाई. भगवान शंकराचे मानसिक सामर्थ्य आणि शारीरिक क्षमता आपणांस प्राप्त व्हाव्यात ही भावना सुद्धा त्यामागे आहे. म्हणूनच पुर्वी पतीपत्नी दोघेही वडाला सूत गुंडाळत आणि प्रदक्षिणा घालत असत. प्रदक्षिणा घालणे हे मोटर फिरवण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्रस्थानी असलेल्या वडाची सर्व ऊर्जा प्रदक्षिणा घालणाऱ्यास अनायासे मिळत असते.
आज विवाहामागील ‘संस्कार’ लुप्त होत चालला असून ती आज एक प्रकारची व्यवस्था किंवा सर्वमान्य तडजोड ठरते आहे की काय याची भीती वाटू लागली आहे. सध्याचे कुटुंबातील वातावरण, एकूण सहजीवन आणि वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण बघितले तर ही भीती खरी आहे असे वाटू लागते. आज विभक्त कुटुंब पद्धती रुजू पहात आहे. बदलत्या काळानुसार काही प्रमाणात ते अपरिहार्यही झाले आहे. म्हणून आज वटपौर्णिमा साजरी करीत असताना फक्त महिलांनीच याचा विचार न करता संपूर्ण कुटुंबानी आणि एकूण समाजाने याचा विचार करावा असे वाटते. व्यावहारिक अडचण असल्यामुळे दूर गेलेली कुटुंब या निमित्ताने एकत्र यावीत आणि वडाच्या पारंब्याप्रमाणे एकमेकांना आधार देत परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करून आपले कुटुंब भक्कम आणि उबदार करण्याचा प्रयत्न केला जावा असे या सुचवावेसे वाटते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने विश्वमान्य असलेली आपली ‘कुटुंब व्यवस्था’ अधिक सक्षम आणि सुसंस्कारित करण्याचा संकल्प आजच्या मंगलदिनी आपण सर्वांनी करावा अशी मनीषा व्यक्त करतो. आपल्या ‘कुटुंबरुपी’ वडाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आपल्या कुटुंबाचा समाजातील प्रत्येक घटकाला आधार वाटावा असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, यातूनच हिंदू धर्माचा वटवृक्ष बहरेल यात तीळमात्र शंका नाही.
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। श्रीराम।
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈