सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ व्रतोपासना – १. मानवता ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आज सकाळच्या बातम्या ऐकल्या आणि मनात विचार आले. बातमीच तशी होती. जसे हवामान सांगतात तसे प्रत्येक ठिकाणची प्रदूषण पातळी सांगत होते. आणि हा खूप जास्त धोक्याचा इशारा आहे असेही सांगत होते. आणि असा इशारा मोठ्या सणाच्या नंतर नेहेमीच दिला जातो.
गेले काही दिवस सगळीकडे दीपावली आनंदोत्सव चालू आहे. वर्षातून एकदाच येणारा मोठा सण. सगळे मोठ्या आनंदात साजरा करतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सण साजरे करतो. त्यात वावगे काहीच नाही. मुलांना शाळेला सुट्टी पण असते. आपल्या परंपरा, त्याचे महत्व लक्षात घेणे या दृष्टीने आपले सण फार महत्वाची कामगिरी बजावतात.
पण गेले काही वर्षे आपण जर निरीक्षण केले तर त्यातील गाभा किंवा उद्देश नष्ट होत चाललेला दिसत आहे. हल्ली तर असे सण नकोसे वाटतात. कारण त्यात दिखावाच जास्त वाटतो. आणि समाजाला होणारा त्रास जास्त दिसतो. सगळे सण साजरे करताना विद्यार्थी, आजारी, वृध्द यांचा विचार कुठेही नसतो. आणि तसे कोणी सुचवले तर दार लावा म्हणतात. आणि जास्त त्रास होईल असे करतात.
खरे तर दिवाळीत प्रत्येक दिवशी वेगळ्या निसर्ग देवतेची पूजा असते. ते लक्षात घेऊन आचरणात आणणे आवश्यक आहे. या निमित्ताने काही व्रते मनात आली. व्रत वैकल्ये आपण आचरणात आणतो. त्या त्या पूजा, उपासना, उपास करतो.
व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना इत्यादी साठी
विशिष्ठ नितीनियमांनी करावयाचे आचरण. व्रत हे विशिष्ठ काळासाठी, विशिष्ठ तिथीस, विशिष्ठ महिन्यात, विशिष्ठ वाराला किंवा विशिष्ठ पर्वात आचरले जाते. याचे निरनिराळे प्रकार आहेत. व त्यांचे उद्देश पण वेगवेगळे असतात.
हे उत्तमच आहे. पण त्यात काळानुसार काही बदल करावे असे वाटते. या सणाच्या निमित्ताने एक व्रत जे मी अनेक वर्षे आचरणात आणत आहे. त्याचा विचार व्हावा असे वाटते.
मानवता – याचे महत्व मला एका छोट्या मुलीकडून जास्त पटले. आम्ही शिक्षक शाळेतील मुलांची स्वतःच्या मुलांच्या प्रमाणे काळजी घेत असतो. बरेचदा आमच्या शाळेतील मुले काहीही न खाता शाळेत येतात. त्याला अनेक कारणे असतात. पण आम्ही शिक्षक कित्येकदा स्वतःचा जेवणाचा डबा अशा मुलांना देत असतो. असेच एकदा मी एका मुलीला डबा दिला. तिने तो घेतला आणि त्यातील निम्मा डबा ( भाजी पोळी) एका कागदावर काढून घेतली. आणि डबा परत दिला. तिला जेव्हा विचारले असे का केले? त्यावेळी ती म्हणाली, मी सगळा डबा खाल्ला तर तुम्ही काय खाणार? तिच्या या उत्तराने मला विचार करायला भाग पाडले. स्वतःला भूक लागलेली असताना दुसऱ्याचा विचार करणे किती महत्वाचा संस्कार आहे. यात मला तिच्यातील मानवता जाणवली.
अशी मानवता आपण कुठे कुठे दाखवतो असे म्हणण्यापेक्षा कुठे कुठे विसरत चाललो आहोत याचा विचार सर्वांनीच करावा असे वाटते. कोणताही आनंद साजरा करताना लाखो रुपयांचे फटाके फोडण्या पेक्षा काही गरजवंत लोकांना काही गोष्टी देऊन आनंद मिळवू शकतो. आणि आपल्या प्रमाणे त्यांचीही दिवाळी थोडी फार आनंदी करु शकतो. घरातील काम करणारे यांची दिवाळी तर आपण आनंदी करतोच. पण आज समाजात काही मंडळी अशी आहेत की कोणतेही अनुदान न घेता अनेक अनाथ मुलांचा सांभाळ करतात. त्या मुलांना आपण आनंद देऊ शकतो. त्यांना फराळ, नवीन कपडे दिले तर त्यांच्या चेहेऱ्यावर जो खरा आनंद दिसतो तो आपल्यालाही आनंदी करतो.
खरे तर मानवता हे फार मोठे आणि महत्वाचे व्रत आहे. यावर लिहीण्या सारखे पण खूप आहे. आज फक्त दिवाळीत काय करु शकतो, आपला आनंद मिळवून, प्रदूषण टाळून आपल्या मुलांवर न कळत चांगले संस्कार कसे करु शकतो या विषयी माझे विचार व्यक्त केले आहेत.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈