सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – २. अन्नाचा सन्मान ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपण बऱ्याच गोष्टी नकळत करत असतो. त्यात काही चुकीच्या गोष्टी पण आपल्या हातून नकळत घडतात. त्याच जर हेतुपुरस्सर बदलल्या तर ती सवय होऊन जाते. आणि भावी पिढी साठी ते संस्कार बनून जातात. यातील काही आवश्यक गोष्टी विविध कारणांनी मागे पडत चालल्या आहेत. यातील एक गोष्ट म्हणजे अन्नाचा सन्मान

आपल्याही नकळत आपण बरेचदा अन्नाचा अपमान करत असतो. कदाचित ते लक्षात पण येत नाही. इथे मला एक गोष्ट आठवते. एक खूप मोठे कुटुंब असते. घरातील सगळे काम करणारे असतात. रात्री ते एकत्र जेवत असतात. एक दिवस घरात फक्त तांदूळ असतात. त्या घरातील मोठी सून त्या तांदुळाची खिचडी करायला ठेवते. तितक्यात तिची सासू येते. तिला वाटते सून मीठ घालायचे विसरली म्हणून ती त्यात मीठ घालते. असेच घरातील तिन्ही सुनांना वाटून प्रत्येक जण स्वतंत्र पणे मीठ घालून जाते. त्याच वेळी लक्ष्मी व अवदसा या घरात असतात. आणि या घरात कोणी राहायचे या वरून त्यांच्यात वाद होतो. आणि असे ठरते, या कुटुंबातील एकाही व्यक्तीने अन्नाला नावे ठेवली नाही तर त्या घरात लक्ष्मी निवास करेल. आणि कोणी नावे ठेवली तर अवदसा त्या घरात राहील. त्या दोघी घरात एका बाजूला बसून निरीक्षण करत असतात. घरातील सर्व पुरुष मंडळी प्रथम जेवायला बसतात. सासरे पहिला घास घेतात त्याच वेळी भात खारट झाल्याचे लक्षात येते. पण घरातील स्त्रियांचे कष्ट लक्षात घेऊन ते काहीही न बोलता गुपचूप जेवतात. ते बघून त्यांची मुलेही गुपचूप जेवतात. त्यामुळे छोटी मुले, स्त्रिया कोणीही काहीही न बोलता जेवतात. थोडक्यात अन्नाला कोणीही नावे ठेवत नाहीत. म्हणजेच अन्नाचा सन्मान ठेवतात. आणि लक्ष्मी कायमची त्या घरात निवास करते.

अन्नाचा सन्मान हे खूप मोठे व महत्वाचे व्रत आहे. त्या सन्मान करण्यात शेतकरी त्यांचे कष्ट, घरातील स्त्रिया त्यांची कामे या सगळ्यांचा सन्मान असतो. परंतू हल्ली वाया जाणारे अन्न पाहिले की मनाला त्रास होतो. एकीकडे आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो. त्यावर आपला देह पोसला जातो. जेवणाला उदर कर्म न मानता यज्ञ कर्म मानतो. मग अन्न टाकून देताना ही भावना का विसरतो? असा प्रश्न पडतो. एखाद्या कार्यात बघितले तर अन्नाची नासाडी दिसते. आणि त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अन्नासाठी व्याकूळ झालेले लोक दिसतात. आणि अन्न वाया जाणार नाही, या साठी पण कायदे करण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न पडतो.

पुण्यातील एका कार्यालयात मी असा अनुभव घेतला आहे. ताटात कोणी अन्न ठेवून ताट ठेवायला गेले की तेथे उभी आलेली व्यक्ती ते ताट ठेवू देत नाही. ताट रिकामे करून आणा म्हणून ती व्यक्ती सांगते. सावकाश संपवा अशी विनंती केली जाते. सुरुवातीला लोकांना हे आवडले नाही. पण त्या कार्यालयाचा तो नियमच आहे. एकदा समजल्यावर लोक मर्यादेत वाढून घेऊ लागले. एका डायनिंग हॉल मध्ये पण अशी पाटी लावली आहे. ताटातील अन्न संपवल्यास २० रुपये सवलत मिळेल. असे सगळीकडे व्हावे असे वाटते. त्याही पेक्षा आपण ठरवले तर अन्नाचा योग्य सन्मान करु शकतो. आणि आपले बघून पुढची पिढी हेच संस्कार स्वीकारणार आहे.

अन्नाचा सन्मान तर पूर्वी पासूनच आहे. पण पुन्हा त्याला नव्याने उजाळा देण्याची वेळ आली आहे. तर अन्नाचा सन्मान हे व्रत आचरणात आणण्यास कोणाची हरकत नसावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments