श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ वासुदेव ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
डिसेंबर / जानेवारीतील मस्त थंडी. रविवारची सुट्टी. पहाटे चारच्या साखर कारखान्यातला पहिल्या शिफ़्टच्या भोंग्याने हलकीशी जाग आलेली असते. तरीही मस्त पडलेल्या थंडीमुळे आणि सुट्टीमुळे आणखी जरा वेळ झोपावेसे वाटते. बाबांची फिरायला जायची गडबड, त्यांचा मला उठवायचा अयशस्वी प्रयत्न आणि त्याच सुमारास जोरात हार्न वाजवत शेरी नाल्यावरून धडधडत जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस. तशातही अजून चारच तर वाजतायत, मस्त थंडीत पडून राहावंसं वाटण तस सहाजिकच ना ? एव्हान त्या भोंग्यातून सभोवार पसरलेला आणि आता नाकालाही सवय झालेला मळीचा वास, त्या थंडीत अंगावर असलेली मऊ दुलई डोक्यावरून घ्यायला भाग पाडतो. मग परत छानशी डुलकी केव्हा लागते ते कळतच नाही.
थोड्यावेळाने जाग येते ते बाजूच्या गल्लीतून येणा-या गाण्याच्या आवाजाने, एकदम खड्या आवाजात,योग्य लयीत गाणे म्हणत वासुदेव आलेला असतो. काय माहीत पण मला या वासुदेवाचे लहानपणापासुन आकर्षण वाटत आले आहे . त्याची चाहुल लागली की मी लगेच उठून ब्रश करून घरातल्या बाल्कनीत उभा रहायचो
डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायात धोतर कमरेभोवती उपरणे, एका हातात डमरू तर दुसर्या हातात टाळ, काखेेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या तसेच रंगीबेरंगी माळा, कपाळ व कंठावर चंदन किंवा गंधाचे टिळे अशा वेशभूषेत वासुदेव यायचा आणि पाच दहा मिनिटात सभोवतालचे वातावरण मंत्रमुग्ध करून टाकायचा
नाही कुणी जागं झोपलं पहारा
दु:खी जीव तुला देवाचा सहारा
तुझ्यासाठी देव वासुदेव झाला
वासुदेव आला हो वासुदेव आला
या गाण्यांमधून देवादिकांच्या कथा सांगितल्या जात. मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने वासुदेवाच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात.
वासुदेव हरी वासुदेव हरी |
सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी |
सीता सावली माना दान करी वासुदेवा |
श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका ||
वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच होती. या वासुदेवाच्या साहाय्याने शिवाजीने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या आहेत असा इतिहास सांगतो
अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. त्या बायका माणसे सुपातून जोंधळे घालत आणि दान करत. पुरुष माणसे दुंडा पैसा देऊन त्याला नमस्कार करत. वासुदेवही दान पावलं म्हणत अंगणात नाच करी. सारे अंगण जसे काही समाधानाने आनंदून जाई.
आपली कला सादर करून कुणी काही दान, पैसे, धान्य दिल तर हा वासुदेव ते घेऊन आपला पुढे निघायचा
आज हा वासुदेव कदाचित अजूनही सांगली , कोल्हापूर , सातारा किंवा आजूबाजूच्या खेडोपाड्यात येत असेलही पण मुंबईसारख्या शहरात त्याचे दर्शन दुर्मिळच होत चालले आहे
म्हणतात ना
बारा डोळ्यांनी पापं सारी नारायण बगतो
पैशापायी माणूस मरतो, पैशावर जगतो
वासुदेवाची ऐका वानी, जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम रे
पण आज ही कला/ आपला सांस्कृतिक वारसा दुर्मिळ होत चाललाय. अजूनही आशा वाटते की कदाचित या गजबजलेल्या मुंबईतही एका रविवारच्या सकाळी वासुदेव येईल आणि म्हणेल
जागा हो माणसा संधी ही अमोल
तुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोलं
घालतील वैरी अचानक घाला |
वासुदेव आला हो वासुदेव आला….
देवा माझ्या द्वारी या हो
(गाणी संग्रहित)
अमोल
© श्री अमोल अनंत केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com