सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ व्रतोपासना – ४. घराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
जरा वेगळे वाटते ना? पण आपण स्वतःशी थोडा विचार केला तर किंवा काही लोकांचे बोलणे ऐकले तर आपल्याला लक्षात येते, की घराला सहज नावे ठेवली जातात. किंवा काही मंडळी इतरांच्या घराशी आपल्या घराची तुलना करतात आणि घरी बोलावण्याचे टाळतात.
आज आपण हा विचार करु या. आपण जेथे राहतो त्या घरात आपल्याला कसे वाटते. या घराने आपल्याला काय काय दिले? आपली किती सुख दुःखे आपल्या बरोबर अनुभवली आहेत? आपल्याला किती संरक्षण, आधार दिला आहे. लहान मुलांना तर स्वतःचे घर खूप प्रिय असते. लहान मुले वैश्विक शक्तीशी जोडलेली असतात. घरातील चांगली ऊर्जा त्यांना समजते. आपल्याला घर निर्जीव वाटत असेल तरी त्यालाही भावना असतात. ते आपल्याशी बोलते. जसे आपण नवी खरेदी केली की आपल्याला आनंद होतो तसेच घरही प्रसन्न होते. घराची स्वच्छता केली, रंग दिला किंवा घरातील वस्तूंच्या जागा बदलल्या तरी आपण म्हणतो घराची ऊर्जा बदलली आहे. घरात छान प्रसन्न वाटत आहे. असे बरेच प्रसंग आपल्याला आठवतील. घराची विविध रुपे आपण अनुभवतो. पण लक्षात घेत नाही. आणि कधी कधी घराची निंदा करतो. अगदी सहज या घराने मला काय दिले? असे वैतागाने म्हणून जातो. त्यावेळी घर नाराज होते. आपले पूर्वज कायम म्हणतात, वास्तू नेहेमी तथास्तू म्हणत असते. म्हणून चांगले बोला आपले पूर्वज फार महत्वाचे सांगत होते. त्यांचे सगळे सांगणे शास्त्रावर आधारित होते. त्यामुळे घराची निंदा करु नये. हे खूप महत्वाचे वाटते. या. साठी पुढील काही संकल्प महत्वाचे वाटतात.
घरासाठी संकल्प
घरात सगळेजण देवाचे करतात. पोथी वाचन अनेक वर्षे सुरु आहे. घरात सुबत्ता आहे. सर्व भौतिक सुविधा आहेत. हे सगळे असले तरी एखादा छोटासा किंतू असतो. आणि सर्व सुखांच्या आड येणारे हेच असते. थोडक्यात म्हणजे सगळे उत्तम आहे, पण….. असे ऐकू येते. आणि हा पण म्हणजे पाणी साठ्यातून जसे पाणी झिरपते तसे असते.
तर या झिरपणाऱ्या पाण्याला/पणला /किंतूला दूर करु या.
या साठी काही गोष्टी करु या.
आपण देवपूजा, पोथी वाचन आरती किंवा अजून काही करत असू तर ते उत्तमच आहे. पण एक असे असते या सगळ्याची ठराविक वेळ असते. त्या वेळी आपले विचार अत्यंत उत्तम, सकारात्मक असतात. पण हे सगळे झाल्यावर नंतर पुन्हा असे विचार कधी करतो? याचा विचार प्रत्येकाने करावा. या गोष्टी आपण दिवसातून एकदा किंवा दोनदा करतो. पण आपण पाणी पिणे, चहा घेणे, जेवणे, झोप घेणे अशा आणि काही आवश्यक गोष्टी वारंवार करतो. मग आपल्या कुटुंबा विषयी असे सकारात्मक विचार (संकल्प) सुद्धा सतत करायला हवेत.
घरातील व्यक्ती एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागणे. आनंदाने संवाद करणे, एकमेकांमचा सर्वांनी स्वीकार करणे या साठी काही संकल्प पुढील पद्धतीने करु या. कोणतीही पद्धत किंवा जमेल त्या पद्धती वापराव्यात.
घरात दर्शनी भागात सर्व सदस्य असतील असा फोटो लावणे. म्हणजे आनंदी फॅमिली फोटो घरात लावावा.
काही सकारात्मक वाक्ये नेहेमी उच्चारावीत. ही वाक्ये पुढील प्रमाणे.
▪️ आमचे घर हे एक पवित्र मंदिर आहे.
▪️ मी व घरातील प्रत्येक व्यक्ती पवित्र व शक्तिशाली वैश्विक शक्तीचा अंश आहेत.
▪️ सगळे सुखी व आनंदी आहेत.
▪️ सगळे एकमेकांना समजून घेत आहेत.
▪️ सगळ्या सदस्यांचे एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
▪️ घरातील प्रत्येकाला त्यांच्या मनाप्रमाणे सुख व समाधान मिळालेले आहे.
▪️ आम्ही सगळे कायम एकमेकांच्या सोबत आहोत.
▪️ अशा घरात व घरातील सदस्यांच्या सोबत मी रहात आहे. त्या साठी देव/निसर्ग शक्ती / वैश्विक शक्ती यांचे मनापासून आभार!
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
९/११/२०२४
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈