सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ व्रतोपासना – ५. तळपत्या सूर्याची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
उन्हाळा सुरु झाला की मला काही मंडळी आवर्जून आठवतात. त्यांना जणू सूर्य म्हणजे आपला शत्रू वाटतो. आणि कोणत्याही वेळी बाहेर पडले तरी ही मंडळी काय हा सूर्य,किती ते उन अशी सतत तक्रार करत असतात. याला बऱ्याच प्रमाणात मीडिया पण जबाबदार आहे. त्यांच्या प्रॉडक्टच्या जाहिराती मनावर फार परिणाम करतात.
त्या विरुद्ध काही मंडळी सूर्योपासना करतात. त्या विषयी फार आदर वाटतो.
उन्हाळा सुरु झाला की, आपण सहज म्हणतो, ‘ काय हा उन्हाळा. केव्हा संपणार? ‘ पण हा सूर्य तळपलाच नाही तर पुढे पावसाळा कसा येणार? आणि धनधान्य कसे पिकणार? आणि हा सूर्य प्रकाश सगळ्याच जीवसृष्टी साठी आवश्यक असतो. कित्येक कामे सूर्यावर अवलंबून असतात. आपली दिनचर्या जरी घड्याळावर अवलंबून असेल तरी इतर सृष्टी साठी मात्र सूर्य आवश्यक असतो. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सूर्य आवश्यक आहे. त्याच्या शिवाय आपण दिवसाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपल्याला आवश्यक आणि महत्वाचे व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्य प्रकाशात सहज व मोफत मिळते. पृथ्वीवर ज्या भागात काही महिने सूर्य उगवत नाही त्यांना सूर्याचे दर्शन,त्याची उब खूप महत्वाची वाटते.
सूर्याचे अनन्य साधारण महत्व आहे आणि ते सर्वांना माहिती आहे. ज्या वेळी सूर्य जास्त प्रखर असेल त्यावेळी आपण आपले विविध उपयांनी संरक्षण करु शकतो. त्या साठी सूर्याला नावे ठेवणे योग्य नाही. आपण मोठी माणसे जसे वागतो,बोलतो त्याचेच अनुकरण लहान मुले करतात. आपण जर त्यांना सूर्याचे महत्व सांगितले तर त्यांना आपण चांगली दृष्टी, चांगले विचार देऊ शकतो. आपण ज्या निसर्ग देवता मानतो त्यांचे पूजन करतो त्यात सूर्याचे स्थान खूप महत्वाचे आहे. म्हणून सूर्याची कधीही निंदा करू नये.
हे व्रत म्हणून आपण नक्कीच आचरणात आणू शकतो.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈