डॉ. सोनिया कस्तुरे

वर्ष सरते शेवटी…  ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

पाहता पाहता २०२४ संपत आले, नव्हे संपलेच. प्रत्येक नवीन वर्षात अनेक गोष्टी, अनेक घटना घडतात. काही खूप संवेदनशील असतात, तर काही आयुष्यभर आनंद, उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. तर काही, जे घडले, ते घडले नसते तर बरे झाले असते. असे मनाला वाटून जाणाऱ्या असतात. काही आनंद, दुःखाची झालर वा अस्तर लावून येतात. पण चेहऱ्यावर कधीच त्याच्या छटा दिसू दिलेल्या नसतात. पण असे का ?  खरे जगावे, सुखात आनंदी, तर दुःखात थोडी निराशा दाखवण्याचे स्वातंत्र्य आहेच ना आपल्याला.  मनाच्या सगळ्या भावना जशा आहेत, तशा सम्यक पद्धतीने व्यक्त करता येतील अशा व्यक्ती असतातच आपल्याकडे. त्या पारखायला हव्या. मनातली आशा मात्र कायम जीवंत राहायला हवी. थोडा अंधार जास्त आहे पण त्यामुळेच तर उजेडाचे महत्व अधोरेखित होत आहे.

आजपर्यंत समविचारी आपण सगळे सोबत होतो. आजही सोबत आहोत. आणि यापुढेही कायम सोबत राहू. स्त्रीने तिच्या स्त्रीपणाच्या चौकटीतून बाहेर पडताना स्वतःला पुरुषसत्ताक मानसिकतेचे वाहकत्व टाळू शकेल, आणि स्त्री पुरुष दोघांचा मानवतेच्या दिशेने, समतेच्या वाटेने नव्या आधुनिक प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करता येईल ही आशा आहे.

प्रेमाला व्यवहाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे हे खरे आहे. पण विनाअट / निर्हेतू प्रेम नव्याने जन्माला येईलच. ही आशा सोडायची नाही. आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येईल अथवा न येईल, आपण स्वतःवर मनापासून प्रेम करायला शिकूया. खरे जगूया, खरे बोलूया  ! एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेऊया..!

वर्षाचा शेवटचा महिना जसा.. तसा अडचणींचा, वाईट घटनांचा, दुःखाचा शेवटचा महिना असता तर, वेदनांना कायमचा निरोप देता आला असता तर.. वेदनांचे तण उपसून काढता आले असते तर, अगदी मुळापासून खोल मनातून. जसे कॕलेंडर भिंतीवरुन कायमचे हटवतात तसे…! कधीही परत दिसणार नाही असे.. आनंदी क्षणांचे वट वृक्ष झाले असते तर मग समाधानाचा फुलोरा नक्कीच दिर्घकाळ बहरत राहिला असता नाही का.. !

नको असलेलेच जास्त डोके वर काढताना दिसते. जे जे गंधीत ते जणू शापित वाटू लागते. चांगल्या आठवणी आठता येत नाहीत. साठवता येत नाहीत. कुणाला सांगता येत नाहीत. या व्यवहारी जगात चांगल्या आठवणींचा कचराच होताना दिसतो. ते ही दूर दूर निघून जातात. उजाड माळरान मागे ठेवून. असे वाटणे ही तर मनाची अडचण असते. परत मशागत करायला हवी. स्वतःला अंतःपर्यंत सुगंधीत ठेवण्यासाठी.

खरंतर वेदनेचे गाणे करता यावे आणि संवेदनांनी ते गात रहावे. आणि हो आनंदाचा उन्माद होऊ नये एवढं मात्र नक्की करावे.

 ग़म का ख़ज़ाना तेरा भी है, मेरा भी

ये अफ़साना तेरा भी है, मेरा भी

अपने ग़म को गीत बना कर गा लेना

राग़ पुराना तेरा भी है, मेरा भी

© डॉ. सोनिया कस्तुरे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments