सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ६. वृष्टी करणाऱ्या पावसाची निंदा करु नये. ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 उन्हाळ्यातील उकड्याने हैराण झालेले आपण पावसाची वाट बघत असतो. मग येणाऱ्या एखाद्या पावसाच्या सरीने पण आनंदित होतो. पावसाचे स्वागत करतो. वर्षा सहली काढतो. गरम पदार्थांचा आस्वाद घेतो. असे करता करता काही दिवसातच पावसाला कंटाळतो. काहींना तर सुरुवातीचा पाऊस पण नको वाटतो. आणि सुंदर पावसाचे नकोशा पावसात रूपांतर होते. अर्थात पाऊस तोच असतो. पण आपलीच मन:स्थिती बदलत असते. त्यामुळे पावसाची निंदा सुरु होते. आणि पावसाचे तोटे सांगणारे वक्तव्य सुरु होते. तक्रारी सुरु होतात. कपडेच कसे वाळत नाहीत. दमट वास येतो. प्रवास कसा अवघड होतो. पाणी कसे साठते असे विषय चर्चिले जातात. त्यात घरी असणारी मंडळी फारच आघाडीवर असतात. कामावर जाणारे आपला बंदोबस्त ( पावसा पासून सुरक्षित राहण्याचा ) करुन आपले कर्तव्य करुन येतात. पण ज्यांना कुठेही जायचे असते अशी मंडळीच किती हा पाऊस असे म्हणून तक्रार करत असतात. एकूण काय पाऊस यावर सगळीकडे टीका सुरु होते. आणि आपल्यालाच हवासा असणारा आणि आवश्यक असणारा पाऊस आपण विसरतो.

पण आपण एक विचार करुन बघू या. ज्या काही अडचणी पावसामुळे येतात असे वाटते त्या खरंच पावसामुळे आल्या आहेत का? रस्त्यावर पाणी साठणे, खड्डे पडणे, पूर येणे अशी संकटे मानव निर्मित आहेत. या सगळ्यासाठी आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. आणि हे आपण टाळू शकतो. हे पूर्ण आपल्या हातात आहे.

आपण हे लक्षात घ्यायला हवे, निसर्गाला सगळे जग सावरायचे असते. जगवायचे असते. पाऊस हा जीवसृष्टीचा आधार आहे. तो आला नाही तर जीवन अशक्यच आहे. गवत, धनधान्य, भाजीपाला उगवणार नाही. एवढेच नाही तर आपल्याला कोणालाच प्यायला पाणी सुद्धा मिळणार नाही. सगळे चराचर कोमेजून जाईल. म्हणून आपल्या संस्कृतीत वर्षा देवता म्हणतो. ही वर्षा देवता जीवनदायी आहे. म्हणून पूर्वपार तिची पूजा करतो. म्हणून अशा जीवनदायी वृष्टी करणाऱ्या पावसाची निंदा करु नये.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments