सौ.सुचित्रा पवार
? विविधा ?
☆ वैभवाचे दिवस भाग – ३ ☆ सुश्री सुचित्रा पवार ☆
आमच्या घराच्या जवळ गावंदर असल्याने आम्हाला निसर्गाचा आनंद भरभरून घेता आला. पिके कापणीला आली की पक्ष्यांची गर्दी व्हायची आणि ते पक्षी आमच्या अंगणातल्या झाडाझुडावर निवांत विश्रांती घ्यायचे. बाजूलाच लगेच शेते असल्याने त्यांची घरटीही आसपासच्या झाडांवर, खोबणीतून ढोलीतून असायची. संध्याकाळी खेळून दमलो की मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर निवांत बसून आकाशातले पाखरांचे थवे न्याहाळत राहायचो. ढगांच्या कापसात वेगवेगळे आकार शोधायचो, कधी हरीण कधी राक्षस कधी देव तर कधी शिवाजीमहाराज दिसायचे. आकाशात तिन्हीसांजेला होणारी रंगांची उधळण आणि तांबूस, केशरी, पिवळ्या, काळ्या नानारंगी छटा पाहून हरकून जायचो; नित्यनेमाचे निसर्गातील हे बदल आमच्या जीवनाचे अविभाज्य भाग होते. आसपासचे पशुपक्षी, फुलपाखरे, झाडेझुडे, दगड धोंडे, ओढे, नाले इतकेच काय दूरवर उन्हात झळझळणारे दाट मृगजळ देखील आमचेच वाटायचे; जवळ जाऊन त्यात हात बुडवावा असं वाटायचं; हे सारे आमचे सखेसोबतीच होते. शाळेत जाताना रमत गमत जाणे येणे आणि मग निसर्गातले हे दररोजचे बदल स्वीकारत अन न्याहाळत त्याच्याशी एकरूप होत जगणे अंगी मुरले होते. शेतातली पिके काढली की मुलांना पतंग उडवायला रान मोकळेच! कितीदा सड घुसून पाय रक्तबंबाळ व्हायचे, काटे टोचून पायात मोडायचे पण आनंदाच्या त्या क्षणांपुढे कोणत्याच वेदना क्षुल्लक होत्या.
निसर्गचक्राप्रमाणे आमचे खेळही बदलत असत, म्हणजे पावसाळ्यातले खेळ वेगळे, उन्हाळ्यातले खेळ वेगळे! पावसाळ्यात चिखलात खेळणे, मातीची भांडी बनवणे असले खेळ खेळत असू पण खरी खेळाची मजा उन्हाळ्यातच यायची. सुट्टी दीर्घकाळ चालायची आणि शाळा, अभ्यास असलं काहीच नसायचं, त्यामुळं सर्व सुट्टीवर आमचाच हक्क होता.आम्हाला उन्हाळ्यात कुठल्या कलासेस अथवा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला बसवले जात नव्हते. त्यामुळं अधून मधून घरी बोलवलं की सांगितलेलं काम करायचं आणि पुन्हा खेळायचं.
जोंधळ्याचे पीक निघून कडब्याच्या गंज्या परड्यात विसावयाच्या. मजबूत टणक गणगटे काढून साठवून ठेवायचे आणि गणगटांनी खेळायचे. प्रत्येकाच्या समसमान गणगट घेऊन चौकोनी किंवा गोल रिंगणात मांडून सपाट दगडाने (याला आम्ही व्हस्टर म्हणायचो)टिपून रिंगणातून बाहेर काढायचे असाच कोईंचा आणि चिंचोक्यांचा डाव असायचा. ओढलेल्या(जिंकलेल्या)कुया अंगणात पुरून ठेवायचो त्यावर ओळखीची खूण ठेवून दुसऱ्या दिवशी पुरून ठेवलेल्या कुया काढून खेळायचो. कधीतरी रात्री अचानक पाऊस यायचा आणि पुरलेल्या कोयी मुजुन जायच्या, थोड्या दिवसांत त्या जागेत आंब्याचे कोवळे तांबूस कोंब वरती यायचे मग लक्षात यायचे, ‘इथं कोयी पुरल्या होत्या !’
याचबरोबर दुपारच्या वेळी सावलीत बसून काचा कवड्या, भातुकली, (भातुकलीच्या खेळात बोळकी, हिंगाचे, पोंड्सचे रिकामे झालेले डबे, टोपणे, सगळं चालायचं भातुकलीचा संसारसेट क्वचितच मिळायचा) गदी गाई, गजगे, बिट्या, जीबली, लपंडाव खेळत असू.
(मुलेही आमच्यासोबतच खेळत, भेदाभेद मुळीच नव्हता, छेडाछेडी किंवा आतासारखं अजून पहिलीत जात नाही तोपर्यंत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असले प्रकार नव्हते.) सर्वचजण सवंगडी निर्मळ निकोप मनाचे होते. कुणाही मुलाची ओळख ‘शेजारचा’ अशी नसायची, ‘माझा भाऊ ‘ अशीच असायची. चुकलं तर मरेस्तोवर मार असायचा, मुलगी ‘मोठी’ झाली की खेळ बंद व्हायचे लगोर, काट्याकोली, विष अमृत, सुरपाट्या गट्टया, आयरे, पत्यांच्या पानाने, विटी (चिन्नी )दांडू, कबड्डीने खेळायची.
आमचे टाइम पास असायचे-एकत्र बसून गप्पा मारणे, ढगांचे आकार, आकाशाचे रंग न्याहाळणे, पक्ष्यांचे, फुलपाखरांचे, वेगवेगळ्या कीटकांचे निरीक्षण करणे, झाडांच्या पानांच्या पिपाण्या करून वाजवणे, कर्दळीच्या बिया पानांच्या सुरळ्या करून त्यावर ठेवून फुंकरीने उडवणे, चिकाडीचे तांबडे तुरे तोडून ते झाडाच्या ढोलीत खोबणीत ठेवून ‘कोंबडे झोपले’ म्हणायचे. बाभळीच्या गोल गोल शेंगा तोडून त्या पैंजण, जोडवी म्हणून पायाला बोटाला बांधून जोरजोरात पाय आपटायचे आणि शेंगा खूळ खूळ वाजवायचो. चिंचेचा कोवळा पाला, कोवळ्या चिंचा ओरबाडून खाणे किंवा त्यात मीठ टाकून दगडावर चेचून खाणे, जुन्या वहितली कोरी पाने काढून त्यांची वही शिवणे, फाटकी पुस्तके चिकटवणे हे असायचे.
तीन टाईम पोटभर जेवायचो, डाळींची किंवा वाळल्या कडधान्यांची आमटी न भाकरी, भाजी क्वचितच, दूध क्वचितच, भात फक्त संध्या काळीच तोही रेशनच्या तांदळाचा.
भाजलेली चवळी, मूग, हरभरे, फुटाणे, चुरमुरे मक्याची कणसे, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, सिजन मध्ये चवळी-मुगाच्या ओल्या शेंगा, ऊस, ज्वारीचे गोड बांड( ज्वारीचे टणक ताट), ज्वारीचा हुरडा, हरभऱ्याचे डहाळे, हिरव्या -पिकल्या चिंचा हे आमचे वरचे खाऊ होते.बिस्कीट, ब्रेड, पाव असले खाऊ आमच्या आसपास ही फिरकत नव्हते, चहाबरोबर कधीतरी शिळी चपातीच कधीतरी पाच-दहा पैशांचा बटर बुडवून खायला मिळायचा.पाहुणे आले तर तेही चपाती उसळ किंवा भजी, वड्याच आणायचे त्यामुळं बेकरी वस्तुंना किंमत नव्हती. उन्हाळ्यात करवंद जांभळं, चोखून खायचे छोटे आंबे रानात -काट्याकुट्यात हिंडून खायचो.कुठल्याही विहिरीचे, हौदाचे पाणी कचरा बाजूला सारून घटाघटा प्यायचे. पाण्याची बाटली, ब्रिसलरी असलं आमच्या गावीही नव्हतं. दुधाच रिकाम पातेलं आणि तुपाची बेरी भाकरीबरोबर खायला ‘तू-मी’ व्हायचं. (आज त्याला कोण विचारत पण नाही)
क्रमशः….
© सुश्री सुचित्रा पवार
तासगाव
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
फार सुंदर आठवणी…..लेख आवडला