सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ व्रतोपासना – १०. काय काय करावे ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या. त्यात काय करू नये हे विशेषतः सांगितले होते. आज आपण काय करावे यावर लक्ष देऊया. या गोष्टी आपण रोजच आचरणात आणल्या तर त्याचा स्वतः सहित सर्वांनाच फायदा होणार आहे. उपनिषदामध्ये एक थोर वचन आहे. या विश्वातील वस्तुमात्र ईश्वराने व्यापलेले आहे. त्यामुळे त्यागपूर्वक (जीवनावश्यक) भोगाचा स्वीकार करावा. कोणत्याही धनाचा लोभ करू नये हा सिद्धांत म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे. त्याग पूर्वक भोग आणि लोभाचा त्याग यामुळे आपले जीवन समृद्ध बनू शकते. त्यासाठी मनाचे सामर्थ्य वाढवावे लागते. आपल्या बलवंत मनाला अंतर्मुख बनवण्यासाठी व्रते फार महत्त्वाची असतात. व्रत म्हणजे निश्चयाने सतत अखंडपणे करायची कृती. त्यासाठी निष्ठा धैर्य सहनशीलता असे गुण असावे लागतात.
आत्ता पर्यंत आपण सोपी व्रते बघितली. आजही सहज अंगीकार करता येतील अशी व्रते बघू या. यात रोज आचरणात आणण्याची व्रते आहेत.
१) रोज व्यायाम करणे. ज्याला जो जमेल त्याने तशा पद्धतीने करणे. रोज प्राणायाम करणे.
२) रोज ध्यान करणे.
३) चेहेऱ्यावर एक स्मितहास्य कायम असावे. त्यामुळे बघणाऱ्या व्यक्तीला आनंद मिळतोच. पण याचा फायदा आपल्याला जास्त होतो. हसण्या मुळे शरीरात एंडॉरफिन नावाचा अंतस्त्राव स्त्रवू लागतो. तो पेनकिलरचे काम करतो.
४) कायम वर्तमानात रहावे. काल काय झाले हे आठवू नये.आणि उद्या काय होणार याचीही चिंता करु नये.
५) प्रत्येक घटना, व्यक्ती यातील सकारात्मकता शोधून त्याकडे लक्ष द्यावे. आणि सकारात्मक बोलावे.
५) जमेल तेवढे कोणत्याही स्क्रीन पासून लांब रहावे. आवश्यक तेवढाच वापर करावा.
६) सामाजिक संपर्क ठेवावा. त्यामुळे आपली मनस्थिती नक्कीच बदलते.
७) तुलना करण्या पासून लांब रहावे. कोणाचीच कोणाशी अगदी स्वतःची सुद्धा इतर कोणा बरोबर तुलना करू नये.
८) अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी. साधारणपणे अपेक्षा दुसऱ्या व्यक्ती कडून ठेवली जाते. आणि अपेक्षा या शब्दाला जोडून येणारा शब्द बहुतांशी भंग हा असतो. आणि अपेक्षा भंग झाला की त्याच्या बरोबर दुःख, मानसिक ताण येतोच.
९) शक्य तेवढा आनंद द्यावा. आपण जे जे दुसऱ्याला देतो ते आपल्याकडे कित्येक पटींनी परत येते. आनंद हवा असेल तर तो वाटावा. म्हणजे सगळेच आनंदी राहतील.
१०) महत्त्वाचे म्हणजे यातील जमतील तेवढी व्रते अंगीकारण्याचा प्रयत्न करावा.
व्रते वैकल्ये कायमच असतात. फक्त त्या त्या काळानुसार त्यात बदल होत असतो. त्याप्रमाणे आजच्या काळाला अनुकूल व अनुरूप अशी काही व्रते सांगितली आहेत अर्थात हे माझे विचार आहेत. पण त्याचा फायदा मात्र नक्कीच आहे.
व्रतोपासना एक ते दहा वाचल्याबद्दल धन्यवाद!
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈