श्री उद्धव भयवाळ
विविधा
☆ विवाह समुपदेशन — काळाची गरज… ☆ श्री उद्धव भयवाळ ☆
आपल्या भारतीय विवाह संस्थेला जागतिक पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त आहे. भारतीयांमधील विवाहबंधनाला एक पवित्र नाते मानले जाते. भारतात वैवाहिक संबंध हे केवळ दोन व्यक्तीमधील न मानता दोन कुटुंबातील संबंध असे मानले जातात. पाश्चिमात्य देशासारखे विवाह म्हणजे एक करार ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये नाही. मात्र तंत्रज्ञान आणि आधुनिक समाज व्यवस्था यामुळे नातेसंबंधाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे.
आज इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकवरूनही विवाह जमवला जात आहे. तसेच मॅरेज ब्युरोमार्फत ऑनलाईन स्थळे सुचवण्याचा जमाना आहे; परंतु त्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत, हे वधू-वरांच्या पालकांनी लक्षात घ्यायला हवे. सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढत आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून, पती-पत्नीतील किरकोळ मतभेदांमुळेदेखील जोडपी न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेताना दिसतात. या पार्श्वभूमीवर विवाह समुपदेशन ही काळाची गरज झालेली आहे.
एखादा कौटुंबिक अगर वैवाहिक वाद जेव्हा कोर्टात जातो, तेव्हा त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त होते, तो वाद खासगी राहात नाही. कोर्टासमोर पती-पत्नी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत राहतात. कोर्टात त्याची नोंद होत राहते. आणि नाती इतकी दुभंगतात की, कधीही न जुळणारी बनतात.
घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यास सामाजिक समस्येचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वैवाहिक संबंध दृढ, आपुलकीचे आणि प्रेमाचे ठेवण्यासाठी लग्नापूर्वी विवाहपूर्व समुपदेशन आणि लग्नानंतर पुन्हा समुपदेशन याची गरज भासत आहे. लग्नाआधी एकमेकांतील न दिसलेले गुण-दोष जोडप्यांना लग्न होऊन मधुचंद्रानंतर स्पष्ट दिसू लागतात व जोडीदारास दोषांसोबत स्वीकारण्याची मनाची तयारी नसल्याने संबंध टोकास जातात, कधीही न जुळणारे बनतात. त्यामुळे जोडीदार निवडताना आणि निवडल्यानंतर विवाहपूर्व समुपदेशनसुद्धा आजच्या काळात आवश्यक झाले आहे.
विवाहपूर्व समुपदेशनामुळे जोडीदारांना विवाहापूर्वीच एकमेकांना समजून घेण्यास मदत होते व भविष्यातील गुंतागूंत अथवा मतभेदांना अगोदरच फाटा देता येतो. संस्कारातील अंतर व मतभेद यांचे प्रमाण खालच्या पातळीवर आणण्यात मदत होते. तसेच विवाहापूर्वी वधू-वर आपल्या अपेक्षा एकमेकांसमोर उघड न करता एकमेकांपासून काही अपेक्षा ठेवून असतात व त्या अपेक्षा विवाहानंतर पूर्ण झाल्या नाहीत की नात्यामधील गोडवा संपून वाद-विवाद वाढतात. विवाहपूर्व समुपदेशनामुळे जोडीदारांना एकमेकांकडून विवाहानंतरच्या अपेक्षा, आवड-निवड याबाबत उघडपणे बोलण्यास व्यासपीठ प्राप्त होते.
विवाहानंतरचे समुपदेशन तर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. नवरा-बायकोमधील तुटू पाहणारे नाते योग्य वेळी समुपदेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकजीव होते. फॅमिली कोर्टामध्ये धाव घेण्यापूर्वीही जोडप्यांना काऊन्सेलिंगद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला जातो. विवाह समुपदेशनाच्या माध्यमातून
पती-पत्नीच्या दरम्यानच्या समस्यांचा अभ्यास केला जाऊन त्याबाबत योग्य तो आणि परिणामकारक सल्ला दिला जाऊ शकतो. विवाह समुपदेशनाच्याद्वारे पती-पत्नीमधील भांडणाचे मूळ शोधून तसे प्रसंग टाळण्याबाबत मार्गदर्शन मिळू शकते. मुलांचे संगोपन आणि त्यांच्या भविष्याच्या जबाबदारीची जाणीव जोडप्यांना करून दिली जाते. त्यामुळेही जोडप्यांना घटस्फोट घेण्यापासून परावृत्त करता येणे शक्य होते. विवाहपूर्व समुपदेशनाद्वारे योग्य मार्गदर्शनामुळे मानसिक स्थिती, स्वभाव लक्षात घेऊन योग्य सल्ला दिला जाऊ शकतो. तसेच लग्नानंतरच्या समुपदेशनाने दोन कुटुंबांतील तुटणारे रेशीमबंध पुन्हा साधण्याचे पवित्र कार्य होते.
त्यामुळेच विवाह समुपदेशन ही काळाची गरज आहे, यात शंका नाही.
****
© श्री उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, छत्रपती संभाजीनगर -४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈