श्री हेमंत तांबे 

🔅 विविधा 🔅

☆ वयाने तरुण व विचारांनी म्हातारा भारत… ☆ श्री हेमंत तांबे 

🌹 *वयानं तरुण व विचारांनी म्हातारा भारत हे चित्र आपण बदलू शकतो 🌹

🌷 गोष्ट अशी आहे, चीनमध्ये एक कृतिशील विचारवंत लाओत्से ऐंशी वर्षांचा म्हाताराच जन्माला आला. डोक्याचे केस चक्क पिकलेले आणि चेहऱ्यावर सुरकुत्या ! हा लाओत्से म्हणजे आपल्या कडील बुध्द म्हणू शकता ! पण लाओत्सेचे विचार आजही मार्गदर्शक आहेत !! तरूण आहेत !!! त्याच्या जन्माची गोष्ट अविश्वसनीय आहे, कोणीही विश्वास ठेवणार नाही, माझाही नाही……. पण आपण प्रतिकात्मक रित्या असा विचार करू शकतो……… कारण भारतीयांची मानसिकता तपासली तर या चीनी गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो.

🌷 बहुतांश भारतीय म्हातारेच जन्माला येतात, मी वयानं म्हणत नाही, तर दृष्टीनं विचारानं आचारानं ! माणसाचं शरीर जवान मर्द असू शकतं, पण मन भूतकाळात रमुन म्हातारं झालेलं असू शकतं !

🌷 आपल्याला सर्वत्र तरुण दृष्टिस पडतील, पण तरुणाईसाठी मुलभूत गोष्टींची वानवा तुम्हाला दिसेल. मी युवक त्यालाच म्हणेन ज्याची ओढ भविष्याकडे असेल. Young is that one, who is future oriented and old is that one who is past orinted ! कोणत्याही वयस्कर व्यक्तीला भेटा, तो भूतकाळातील आठवणीत रमलेला दिसेल. तो पुढे म्हणजे भविष्यात पाहणार नाही, कारण त्याला मृत्यू दिसत असतो. जवान मात्र भविष्यात पाहील, कारण त्याला मृत्युची भिती नसते, काही अदम्य करण्याची इच्छा असते ! आपण रशिया, अमेरिका किंवा इतर प्रगत राष्ट्रांतील युवक पाहा. ते अंतरिक्षात यात्रा करण्याची इच्छा ठेवतात. आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगून आहेत आणि भारतीय तरुण पहा भविष्याची कोणती कल्पना, योजना, Utopia नाही….. गेल्या दहा वर्षात चित्र बदलू लागलंय मात्र तरुणांची संख्या आणि त्यांची भविष्या बाबत वास्तव स्वप्नं यांचं प्रमाण अत्यंत व्यस्त आहे ! आपण भविष्यासाठी जगतो, भविष्यासाठी स्वप्नं रंगवतो….. पण जर भविष्यासाठी स्वप्न नसेल तर भविष्य अंधकारमय आहे, निश्चित समजा !

🌷 आपण भुतकाळात फार रमतो, भुतकाळ संपन्न होता हे सांगणारी पुस्तकं वाचतो, भुतकाळातील हिरो आपले आदर्श असतात. थोडक्यात आपला इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहावा इतका सुंदर होता, या आठवणीतच रममाण आपण असतो. आणि यात अयोग्य काहीच नाही……… पण त्यातील समृद्ध वारशाची चर्चाच करायची, की तो अंगिकारून पुढं जायचं ? यावर आपण गप्प असतो !

🌷 लक्षात घ्या. आपण कार चालवत आहात, कारला तीन आरसे पाठी दिसायला असतात. आता जर कार पुढं न्यायची असेल, तर तुम्ही पूर्णवेळ आरशात पाहू शकत नाही, त्यानं अपघात होईल ! भुतकाळात झालेल्या चुका पाहायच्या व त्या पुन्हा होऊ नये म्हणून बोध घेऊन पुढंच जायचं, त्या चुकांचा कोळसा उगाळत बसलात तर हात काळे होतील !….. भारताचा दोन हजार वर्षांचा इतिहास असा पाठी पाहून पुढं चालण्याचा आहे, म्हणून अपघात जास्त झाले. गेल्या दोन हजार वर्षांत आपण अनेक खड्ड्यात पडलो. यशाची उत्तुंग शिखरं आपण पादाक्रांत केली नाहीत ! गुलामी, गरिबी, हीनता, कुरुपता, दिनता, अस्वस्थता पाहिली आहे !….. आजही आपल्यातील अत्यल्प तरुण भविष्यातील उत्तुंग शिखरं चढण्याची आकांक्षा बाळगतात….. मी भुतकाळ व भविष्या बद्दल फार लिहित नाही, पण एक धारणा आपण मनाशी पक्की केली आहे……… सत्ययुग होऊन गेलंय आता कलियुग आहे, कोणतीही चांगली गोष्ट घडू शकणार नाही !…. *ही महामुर्खांची मानसिकता आहे !!*

🌷 राम, कृष्ण, नानक, महावीर, बुध्द, कबिर, छ शिवाजी, म राणा जे चांगले होते ते होऊन गेले, आता होणार नाहीत. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण भविष्यात चांगले महानुभाव तयार करत नाही, तोपर्यंत भुतकाळात असे महानुभाव होऊन गेले हे पटवून देणं कठीण जाईल. जोपर्यंत आपण भविष्यात नवनवीन श्रेष्ठता निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत भुतकाळातील श्रेष्ठता काल्पनिकच वाटणार कारण, आपली चांगल्याच्या निर्मितीची परंपरा आपण खंडित केली !

🌷 जोपर्यंत आपण भविष्यातील कृष्ण राम तयार करत नाही, तोपर्यंत राम कृष्ण हे काल्पनिकच वाटणार….. कारण चांगला मुलगाच साक्ष देऊ शकतो, की माझा बाप चांगला होता ! जर आपण भविष्यात लाचार, दरिद्री, कंगाल, भिक्षांदेही असू तर कोणीही मान्य करणार नाही, भारतात सोन्याचा धूर निघत होता !………… आपण फक्त गुंड, बदमाश, चोर, लुटारू निर्माण केले तर छ शिवाजी, छ संभाजी, महाराणा प्रताप वगैरे विभुती इथं निर्माण झाल्या यावर कोण विश्वास ठेवील ? सद्यस्थितीतील तरुणाईनं दररोज नवनवीन प्रगतीची शिखरं काबिज केली नाहीत, तर आपण या महान विभुतींचे वारसदार आहोत, यावर कोण विश्वास ठेवील ?……. आपल्यातूनच जर बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे, अभय बंग, आंबेडकर, फुले, शाहू, धोंडो कर्वे, आगरकर, कर्मयोगी पाटील, विनोबा, स्वातंत्र्यवीर, विठ्ठल रामजी शिंदे, स्वामीनाथन, विलासराव साळुंखे वगैरे वगैरे कर्मयोगी तयार झाले, हे कशाच्या आधारावर आपण म्हणू शकतो ?

🌷 आज परिस्थिती बदलतेय, ध्येय धोरणं inclusive केली जात आहेत. विश्वगुरूची स्वप्नं आपल्याला दाखवली जाताहेत. प्रगतीचे मार्ग निष्कंटक केले जात आहेत, अशावेळी दूरदृष्टीनं भविष्याचा वेध घेऊन तरुणाईनं श्रेष्ठ ध्येयाप्रत पोचण्यासाठी सर्वस्व डावावर लावणं आवश्यक आहे ! टाचणी ते विमान निर्मितीसाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून होतो….. आज परिस्थिती आमुलाग्र बदलली आहे, या बदललेल्या ecosystem चा फायदा जर तरुणांनी घेतला नाही, तर या तरुणांच्या ह्रासाला तरुणच जबाबदार आहेत, दुसरं कोणी नव्हे !

🌷 आज नाही तर उद्या संपूर्ण जग आपली खिल्ली उडवणार आहे, या जगद्गुरु विषयावरून….. जेव्हा कोणी म्हणेल मी श्रीमंत होतो, तेव्हा समजून जा तो गरीब आहे, जेव्हा कोणी म्हणेल मी ज्ञानी होतो, तेव्हा समजून जा, तो अज्ञानाच्या खाईत लोटला गेला आहे, जेव्हा कोणी म्हणेल आमची शान होती, तेव्हा समजून जायचं, ती शान आता मातीमोल झाली आहे !

🌷 भुतकाळात डोकावून पाहणं योग्य असलं, तरी भुतकाळ डोक्यात साठवणं धोकादायक आहे. कारण जगणं वर्तमानात असतं !

🌷 एका गोष्टीत आपण most productive आहोत आणि ती गोष्ट म्हणजे reproduction ! आपली लोकसंख्या आपण अमर्याद वाढवली. अमेरिकेला फक्त ४०० वर्षांचा इतिहास आहे आणि भारताला किमान १२–१५ हजार वर्षांचा इतिहास आहे. मग अमेरिका एवढी समृद्ध कशी झाली ? दुनियेतील अनेक देशांमध्ये भिकारी आहेत, पण एक पूर्ण देश भिकारी म्हणून १९७२ साली जगापुढे उभा कसा राहिला ?

🌷 मी युवा त्याला म्हणतो, जो भविष्याकडे उन्मुक्त आहे आणि वयस्कर म्हातारा म्हणजे ज्याला भुतकाळाप्रती प्रेम आहे, याला वयाचं बंधन नाही. आपण एक हजार वर्षे गुलाम होतो आणि केव्हाही परत गुलाम होऊ शकतो. म्हातारा मृत्यूला घाबरतो, तर जवान मृत्युला अंगावर घेतो. म्हातारा म्हणतो जे होतं ते माझ्या भाग्यात आहे, युवा किंवा जवान म्हणेल मी माझ्या मनगटाच्या जोरावर भाग्य लिहिन. म्हातारा म्हणतो जे होतंय ते देव करतोय, जवान म्हणेल मी जे करीन त्याला ईश्वरीय आशीर्वाद असेल. जवान संघर्ष तर म्हातारा अल्पसंतुष्ट……. ही अल्पसंतुष्टता आपण घालवली नाही, तर दुष्काळ, बेरोजगारी, महामारी, परावलंबित्व यांचीच पूजा आपण करत असतो ! यालाच म्हातारपण म्हणतात !!…… भविष्यासाठी योजना बनवा, अल्पसंतुष्टता सोडून द्या, एक निर्माणाची असंतोषकारी अभिप्सा आवश्यक आहे, एक सृजनाची आस पाहिजे…. *जेव्हा आपण दुःख, अज्ञान, रोगराई, दिनता, दरिद्रता, दास्यता संपवण्याची शपथ घेतो, तेव्हा भविष्य निर्मितीला सुरूवात होते !*
एक छोटीशी गोष्ट सांगून हे प्रबोधन थांबवतो.

🌷 एकदा जपान मध्ये एका छोट्या राज्यावर एका मोठ्या शत्रूनं आक्रमण केलं. ते सैन्य हद्दीवर येऊन उभं राहिलं… या छोट्या राजाचा सेनापती तरूण, साहसी, लढवय्या होता. तो जाऊन शत्रू सैन्य पाहून आला आणि राजाला म्हणाला महाराज, आपण या शत्रूशी लढून जिंकू शकत नाही, त्यांची खूप मोठी फौज आहे, आपले शिपाई कापले जातील व परत हरणं नशिबात येईल !… राजा सेनापतीला म्हणाला, तु तर जवान आहेस आणि असा म्हाताऱ्या सारखा वागतोस ?… आणि राजा नगरातील एका साधूकडे गेला आणि सर्व परिस्थिती सांगितली. अनेक वेळा राजा त्या साधूचा सल्ला घेत असे……. साधूनं राजाला सल्ला दिला, ताबडतोब त्या सेनापतीला तुरुंगात टाक. त्याची चुक झाल्येय. सेनापती मनानं हरलाय, त्यानं हार मानली आहे. आणि ज्यानं मनानं हार मानली, त्यानं प्रत्यक्षातील हार निश्चित केली !… मी युद्धासाठी निघत आहे!… राजानं सेनापतीला तुरुंगात टाकलं, पण विचार करत होता, या साधूला तर तलवार कशी धरायची हे सुध्दा माहीत नाही आणि हा युध्द कसं करणार ?

🌷 साधूनं तलवार घेतली व सर्व सैनिकांना आदेश देऊन युध्दावर निघाला. सैनिक साशंक होते. वाटेत एक देऊळ होतं. तिथं थांबून तो साधू सैनिकांना म्हणाला, मी देवाला विचारून येतो, युद्ध जिंकणार की नाही ?…. सैनिक म्हणतात, साधू महाराज, आपल्याला देवाची भाषा तर येत नाही….. साधू म्हणतो, मी हे नाणं देवाच्या पायावर ठेऊन वर उडवणार आहे. जर आपल्या राजाचा छाप वर आला, तर आपण युद्ध जिंकणार !…… आणि त्यानं तसं केलं. छाप वर आला…… साधूनं सांगितलं, आपण प्राणपणानं लढलो तर युद्ध जिंकणार आहोत, देवानं कौल दिला आहे !! आता आपण हरायचं असं ठरवलं तरी हरू शकत नाही, चला युद्ध सुरू करा, विजय आपलाच होणार आहे !!!

🌷 युध्द झालं. साधूची सेना प्राणपणानं लढली आणि जिंकली.

युध्दावरून परत येताना वाटेत ते देऊळ लागलं. साधू आपला नगराकडे निघालाय, सैनिक म्हणतात साधू महाराज, देवाचे आभार मानून पुढं जाऊया……..
साधू सांगतो, त्याची काहीच आवश्यकता नाही. नाण्याच्या दोन्ही बाजूला आपल्या राजाचाच शिक्का आहे !

🌷 ते सैनिक जिंकले होते, कारण विचार अंततः वस्तूत रुपांतरीत होतात. विचार घटना बनून जातात.

Sir Arthur Eddington – (Philosopher of science) says, “Things are thoughts and thoughts are things!

🌷 मी भारतीय मनाला युवा, तरूण, रसरशीत, उत्फुल्ल, कृतिशील पाहू इच्छितो. कारण आपण दोन हजार वर्षे म्हाताऱ्या सारखा विचार केला. हे भारतीय जनमानसातील म्हातारपण घालवलं पाहिजे ! विचार वय विसरायला लावतात, चांगला विचार करा, आचार सुधारेल, काम तयार आहे, आपल्या काम करणाऱ्या हातांची आवश्यकता आहे !

 🙏🌹शुभेच्छा ! 🌹🙏

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments