? विविधा ?

?वाढदिवस ☘️ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ 

— कॅलेंडरची पानं वा-याने फडफडली,ती नीट करतांना लक्षांत आलं ..उद्या वाढदिवस आहे आपला..! त्या तारखेभोवती आतां लाल वर्तुळाची खूण करणार माणूसच नाही आता..मग आता वाढदिवसाच अप्रुपही फारस वाटत नाही.

–तरीही नेहमीप्रमाणेच साखर झोपेत असतांनाच माझ्या वाढदिवसाला, अंजलिच्या म्हणजे आमच्या लेकीच्या -“वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ग आई..!”

या फोननेच जाग आली.आणि मग दिवसभर नातवंड, जावई, माझी भावंड,मैत्रीणी,यांची शुभेच्छांची बरसातच सुरू झाली.

यानिमित्तानं झालेल्या संवादाच्या आनंदात हा दिवस संपूच नये,असं वाटत राहील ….एक वर्षानं वय वाढलंय आपलं..ही जाणीवही होत नाहीय….

 — खरं सांगायच तर…आयुष्य गिरक्या घेत पुढं सरकलं तरी प्रत्येक वर्षी या दिवसाच्या वळणावर मनं क्षणंभर विसावतच. धुक्याआड गेलेले चेहरे डोळ्यासमोर येतात. ज्यांच्यामुळेआपण आज आहोत, ज्यांचे हात सदैव आपल्या पाठीवर मायेने फिरतात असं वाटत, ते आपले जन्मदाते आईवडील, त्यांचे स्मरण प्रथम होत.अन् नकळत डोळे पाणवतात. स्मृतींचे पंख फडफडूं लागतात. आतांपर्यंत साजरे झालेले-केलेले घरातील सगळ्यांचेच वाढदिवस, -आम्हा उभयतांचे, मुलीचे, नातवंडांचे, सगळे-सगळेच आनंददायी क्षणं,आठवतात. अन् वाटत खरंच…

जीवन किती गतिमान आहे.बालपण, किशोरवयं, तारुण्यं, प्रौढत्व, त्यातून वृध्दत्वाकडे वाटचाल. हा प्रवास चालू असतो. निसर्गाच्या उत्पत्ती, स्थिती, लय, या तत्वाची जाणीवही असते प्रत्येकाला.! ऋतूमागून ऋतू जातात.

हिरव्या पानांचा रंग पिवळा होऊ लागतो.वयाप्रमाणे स्नेही-सोबती बदलत जातात. जुने मागे पडत जातात.नात्या-गोत्यांच रुंदावलेल वर्तुळ थोडं अंतरावरच राहत.अन् मनांत येत..वर्षांनुवर्ष साजरा होणारा वाढदिवस, आतां केवळ उपचार राहीला आहे का?मग वाढदिवसाचा आनंद विरघळू लागतो.भेटकार्डावरच्या शब्दांची भुरळ पडेनाशी होते. फुलदाणीत ऐटीत विसावलेल्या फुलांकडे पाहून, ती उद्या  कोमेजणार याने मनं कोमेजू लागलं तरं योग्य नाही.आपल्या नाठाळ मनाला समजायलाच हवं..आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण मनाने,बुध्दीने,वयाने परिपक्व होत जातो.आपल्या जगण्याला सकारात्मक दृष्टिकोन देत, कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या घेऊन जगणं आनंदाच करायच हे ठरवायचं ते वाढदिवशीच. या वळणावर क्षणंभर विसावतच मागे वळून पाहिलं अन् उत्सवाचे,आनंदीक्षणं, मनाच्या कुपीत हळूंवारपणे जपून ठेवले.नव्या उमेदीने पुढील आयुष्याची वाटचाल करण्यासाठी पाऊलं उचलतांना आतां मनांत वयाचा हिशोब नाही. याक्षणी मनांत फक्त प्रसन्नता झुळझुळतेय. सगळं धुकं विरुन लख्ख कांहीतरी समोर आल्यासारखी..! 

अन् मी कागदावर लेखणी टेकवली….

© सुश्री शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड- पुणे.

मोबा. ९५९५५५७९०८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments