डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ४ – बालमानस -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मूल जस जसे मोठे होऊ लागते तसतसे कुटुंबात आणि भोवताली घडणार्‍या घटनांचे संस्कार  त्याच्यावर नकळत होत असतात. आजूबाजूला अशा घडणार्‍या अनेक छोट्या मोठ्या घटनांचे निरीक्षण केल्यामुळे, त्यातले बरे-वाईट काय आहे तेही कळायला लागते. लहान-मोठा, गरीब- श्रीमंत, अशा गोष्टीही समजायला लागतात.

अकरा बारा वर्षांच्या नरेंद्रची विचार शक्ति अशाच घटनांतून जागृत होत होती. वडील विश्वनाथ बाबूंकडे अनेक पक्षकार आपली कामे घेऊन येत असत. त्यावेळी हुक्का ओढण्याची प्रथा होती. गरिबांकडे चिलीम असे. घरी पक्षकारांसाठी एका मोठ्या खोलीत वेगवेगळे हुक्के ठेवलेले असत. स्वादांचे नव्हे, निरनिराळ्या जातींच्या पक्षकारांना निरनिराळे हुक्के . नरेंद्रला दिसले की एका जातीच्या पक्षकाराचा हुक्का दुसर्‍या जातीचा मनुष्य वापरत नाही. जातीचा निर्बंध मोडला तर काहीतरी भयंकर घडते आणि ते पाप असते. हे त्याच्या कानावर होतेच. असे काय घडते तरी काय ? असा प्रश्न नरेंद्रला होता. त्याने त्याचे उत्तर प्रत्यक्ष शोधण्याचा प्रयत्न केला.

त्या खोलीत कोणी नसताना त्याने जाऊन एकेक हुक्का ओढायला सुरुवात केली. त्याच्या मनात आले की आता काहीतरी भयंकर घडणार. मग दुसरा हुक्का, तिसरा, चौथा हुक्का झाला, पण भयंकर असे काहीच घडले नाही. तेव्हढ्यात विश्वनाथ खोलीत आले. “अरे तू इथे काय करतोस?” नरेंद्र ने संगितले, “एका जातीचा हुक्का दुसर्‍याने ओढू नये म्हणतात, पण मी तर सगळे ओढून पहिले, मला काहीच झाले नाही”.घडलेल्या प्रसंगाने वडिलांना नरेंद्र च्या जिज्ञासाचे कौतुक वाटले. ते मनातून सुखावले, हां हां असं होय म्हणून आपल्या खोलीत निघून गेले.

असे नरेंद्र ची प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजून घेण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत होती. स्वतंत्र विचार करण्याची शक्ति आणि आपल्याला योग्य वाटेल तेच करण्याची प्रवृत्ती असे विशेष गुण नरेंद्र मध्ये होते. त्याच्या या स्वतंत्र बुद्धीची चुणूक शाळेमध्ये शिक्षकांच्याही  ध्यानात येत असे.

 

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments