सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ वसंतोत्सव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
‘कोकीळ कुहू कुहू बोले’ गाण्याचे बोल रेडिओवरून कानावर पडताच वसंत ऋतुची चाहूल मनाला लागली! फाल्गुनातील रंगपंचमीचा रंग उधळत होळीच्या सणाची सांगता होते आणि वेध लागतात ते वसंताचे! सूर्याच्या दाहक किरणांनी सृष्टी पोळली जात असतानाच वसंताचे होणारे आगमन नकळत सृष्टीतील नव्या बदलाची जाणीव करून देते. संध्याकाळी येणारी थंड वाऱ्याची झुळूक वसंताचा निरोप आपल्याला देते! सुकलेल्या झाडांना पालवी येण्याचे दिवस जवळ येतात. पिवळी, करड्या रंगाची, वाळलेली पाने जमिनीवर उतरतात.जणू ती आपल्या आसनावरून- जागेवरून- पायउतार होतात आणि नव्याला जागा करून देतात.कॅशिया, गुलमोहरा सारखी रंगांचे सौंदर्य दाखवणारी झाडे आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर केशरी, जांभळे पिसारे फुलवून उभी असतात. त्याच वेळी आंब्याचा मोहर आपला सुगंध पसरवीत असतो!
आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक ऋतुचे स्वागत आपण सणाने करतो. वसंत ऋतु येतो तेव्हा चैत्रगौरीचा उत्सव सुरू होतो.
पूर्वी अंगणात चैत्रांगण घातले जाई.या चैत्रांगणातून चंद्र, सूर्य, गाई, झोका, कैरी … अशा विविध प्रतीकांची रांगोळी काढली जाई. निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवण्याचा हा उत्सव असतो. चैत्री पाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या तीजेला चैत्र गौरीची
स्थापना करतात. देवीचा उत्सव म्हणून तिला पानाफुलांची सजावट करून झोक्यावर बसवतात. रुचकर कैरीची डाळ, कैरीचं पन्हं आणि खरबूज, कलिंगडासारखी थंड फळे देवीसमोर ठेवली जातात. या सर्व गोष्टींचा एकत्रित आनंद घेता यावा म्हणून चैत्रागौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीये पर्यंत हा सण साजरा केला जातो. हळदीकुंकू सारख्या समारंभात सुगंधित गुलाब पाणी शिंपडून, अत्तर, गुलाब देऊन सुवासिनी वसंताचे स्वागत करतात.
काही ठिकाणी ‘वसंत व्याख्यानमाला’चे कार्यक्रम चालू असतात. अशा व्याख्यानमालां मुळे लोकांना नवीन ज्ञान आणि मनोरंजन मिळत असते. याच काळात गायनाचे कार्यक्रम होत राहतात. कोणत्याही ऋतूत, सण साजरे
करून माणूस आनंद शोधत असतो. आणि त्यानिमित्ताने निसर्गाची जवळीक साधली जाते!
पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या भागात या दिवसात कलिंगड, खरबुजे यासारखी फळे ही थंड म्हणून खाल्ली जातात.फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी अधिक चांगले असते. त्यात वाळा, मोगरा टाकला की पाण्याला एक प्रकारचा सुगंधही येतो.
आपल्या महाराष्ट्रात कोकम, लिंबू, कैरी,वाळा,खस यांची सरबते थंडाव्यासाठी आपण वापरतो. निसर्गाने दिलेले नैसर्गिक पदार्थ या उन्हाळ्याच्या काळात वापरणे हे शरीराला हितकर असते. पुढे येणाऱ्या वर्षा ऋतूत कोणतेही त्रास होऊ नयेत म्हणून शरीराला सज्ज ठेवण्याचे काम नैसर्गिक विटामिन ‘सी’ घेण्यामुळे होत असते!
वसंत ऋतुची खासियत यातच आहे की, हा ऋतू नवीन सृजनाची सुरुवात करून देतो. वसंतोत्सवामुळे नवचैतन्य दिसते. शिशिर आणि हेमंत ऋतूत थंड, निद्रिस्त झालेले वातावरण वसंत ऋतूच्या आगमनाने चैतन्यमय बनते आणि तोच निसर्गाचा खरा ‘वसंतोत्सव’ असतो !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈