डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ११ वाचन – २ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

एखाद्याच्या चरित्राच्या अभ्यासपूर्ण वाचनाने ती व्यक्ती खूप ओळखीची होऊन जाते, कळते.  जवळचीच वाटायला लागते, तसंच, अनेक रुपांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करणार्‍या आणि मृत्युच्या क्षणापर्यंत आपली प्रतिष्ठा जपणार्‍या, नेपोलियन बद्दल विवेकानंदांना वाटत होते. विवेकानंदांच्या दृष्टीने नेपोलियन हा गगनाला भिडणारे उत्तुंग शिखर होते. तरुण वयात केलेल्या या वाचनामुळे नरेन्द्रला नेपोलियन ची भुरळ पडली होती.

तत्वज्ञान आणि ललित वाड:मय यांचा अभ्यास तर नरेंन्द्रने महाविद्यालयात शिकत असताना केला होताच. विद्यार्थी दशेत असताना तर त्याने हर्बर्ट स्पेन्सरचे ग्रंथ वाचून त्यावर आपल्या शंका व्यक्त करणारं एक पत्रच, या जगतविख्यात तत्वज्ञाला पाठवलं, त्यांचं नरेंद्रला उत्तर पण आलं आणि त्याच्या बुद्धी सामर्थ्याबद्दल कौतुक मिश्रित आश्चर्य पण वाटलं त्यांना. एव्हढंच काय कॉलेजला शिकत असताना नरेन्द्रने स्पेन्सर यांच्या ‘शिक्षण: बौद्धिक,नैतिक आणि शारीरिक’ या पुस्तकाचा ‘शिक्षा’ हा बंगाली भाषेत स्वैर अनुवाद केला होता.

नरेंद्रला साहित्याची मुळातच आवड होती. त्याच्याकडे प्रखर प्रज्ञा आणि उज्ज्वल प्रतिभा होती. त्यामुळे वैचारिक ग्रंथांप्रमाणेच त्याला अभिजात साहित्यही आवडत असे. संस्कृत, इंग्रजी आणि बंगाली भाषेतले उत्तम ग्रंथ आणि साहित्यकृती त्याने वाचल्या होत्या.’रामायण’ आणि ‘महाभारत’ यांची बंगाली भाषांतरे वाचली होती. शेक्सपियरची नाटकं, वाचली होती. रोमियो आणि ज्युलिएट, मिडसमर नाईट ड्रीम यांचे संदर्भ त्यांच्या व्याख्यानात येत असत.

अमेरिकेतल्या एका व्याख्यानात त्यांनी मिल्टन चे ‘पॅराडाइज लॉस्ट’वाचले असल्याचा उल्लेख केला होता. त्यातली सॅटानची व्यक्तिरेखा खूप आवडायची कारण ते व्यक्तिमत्व सामर्थ्यशाली दाखवले होते म्हणून. दुर्बलता त्यांना आवडत नसे. साहित्यकृतीत सुद्धा. इंग्रजी कविंमध्ये कवी बायरन आणि वर्डस्वर्थ त्यांचे जास्त आवडते होते.

बंगाली मधले बंकीमचंद्र चटर्जी, दीनबंधु मित्र, यांच्या कादंबर्‍या, ईश्वरचंद्र गुप्त यांच्या कविता, मायकेल मधुसूदन दत्त यांच्या कविता यांचा समग्र अभ्यास केला होता. स्वामी विवेकानंद जेंव्हा जेंव्हा भारतीय अध्यात्मावर भाषणे देत असत, तेंव्हा त्याची तर्कशुद्ध मांडणी आणि लालित्य त्यात दिसत असे. एखाद्या विषयाचा वरवर अभ्यास किंवा वाचन न करता त्याच्या मुळाशी जायचं हा त्यांचा उद्देश असायचा. त्यामुळेच मित्र मंडळींमध्ये जेंव्हा जेंव्हा निरनिराळ्या विषयांवर चर्चा घडून येत असत, तेंव्हा तेंव्हा नरेंद्र युक्तिवाद करताना त्याच्यात ठामपणा आणि आत्मविश्वास असायचा. अशा चर्चेत त्यांच्या पुढे कुणी टिकत नसायचे. प्रतिपक्षाला तो नामोहरमच करून टाके. जेंव्हा तुमच्याकडे त्या विषयाचे समृद्ध ज्ञान असते तेंव्हाच तुमच्याकडे हा आत्मविश्वास येतो. आणि असे ज्ञान वाचनाने, मननाने, योग्य दिशेने विचार केल्याने मिळते. सार्‍या जगाला संदेश देणारे स्वामी विवेकानंद वाचनाने आणि अनुभवाने अतिशय समृद्ध होते. रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटलंच होतं की, “तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंदांकडे वळा” तेंव्हा सर्व वाचक आणि युवा पिढीने पण वाचनाने समृद्ध व्हावे, स्वामी विवेकानंद आणि भारतीय विचार समजून घ्यावेत आणि आयुष्याला दिशा द्यावी.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments