सौ कुंदा कुलकर्णी

?  विविधा ?

☆ वाळवणाचा सोहळा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

आमच्या पिढीनं पुरेपूर अनुभवला हा आनंदाचा सोहळा.

उन्हाळ्यात घरोघरी रंगायचा हा सोहळा.

कडकडीत उन्हात वाळवून ठेवलेले पदार्थ म्हणजे वाळवण.  हे वर्षभराचं तोंडीलावणं असायचं.

“बबर्जी फाजील झाले की स्वयंपाक बिघडतो” ह्या म्हणीला गुंडाळून ठेवून चार पिढ्यांनी एकत्र येऊन केलेले हे पदार्थ अवीट गोडीचे असत. पूर्वी अचानक पाहुणे येत अशावेळी” पान संजगतं ” असं आई म्हणायची. पूर्वी ठराविक मोसमात ठरावीक भाज्या मिळायच्या. त्यावेळी वाळवणाचे पदार्थ जेवणाची लज्जत वाढवायचे. सणावाराला हे तळण असल्याशिवाय नैवेद्य पुराच होऊ शकत नसे.

शकुनाच्या सांडग्यांनी सुरुवात व्हायची. उद्या कोणाकडे हे त्याच दिवशी ठरायचे. गव्हाच्या शेवया, कुरडया, बाजरीचे सांडगे, खारवड्या, पापड्या, तांदळाच्या सालपापड्या, खीच्चे, पापड, उडीद डाळीचे पापड, बटाटा चिप्स , वेफर्स कच्चा किंवा उकडून केलेला कीस, चकल्या, साबुदाण्याचे चीप्स, सांडगे, पापड्या, मूग डाळीचे सांडगे, वड्या, शिन्नी चे सांडगे, मिश्र डाळींचे सांडगे , कोहळा भेंडी कलिंगड यांचे सांडगे ” मिळून साऱ्याजणी” करत असत. वाळवण म्हणजे एक प्रकारचे गेट-टुगेदर असायचे. घरातील कर्त्या  बाई चे नियोजन, आजीचे सुपरव्हिजन असे. लग्नाळू किंवा नवी नवरी शिकाऊ उमेदवार असत. बच्चे कंपनी “हे दे  ते दे,” अशी हरहुन्नरी कामे करत. पुरुष मंडळी परीक्षक असत.

लग्न, मुंज असे मंगल कार्य ठरले की वाळवणाला वेगळे मांगल्य  यायचे. सवाष्णींना बोलावून सुरुवात व्हायची. आई वडील व सासू-सासरे असलेली मुलगी मानाने बोलावून तिला रवा मैद्याचा” गणपती” बनवायला सांगत. त्याला सगळ्यांनी हळद-कुंकू अक्षता घालत.मगच इतर कामांना सुरुवात व्हायची. गव्हले, मालत्या, बोटवे, नखुले, काकडीच्या बिया असे शकुना चे पदार्थ तयार करायचे. हातावरच्या शेवया निगुतीने केल्या जायच्या. रुखवतासाठी शेवयांच्या तिपेडी वेण्या, रंगीत गव्हले, कुरडईच्या पिठाचे द्राक्षाचे घोस, गुलाब फुले वगैरे सुगरणीचे पदार्थ तयार होत.

हे सारं करताना गप्पाटप्पा, गाणी, कोडी यातून  हास्य विनोद निर्माण होत. एकमेकींच्या सुखदुःखाचे वाटप होई. नवीन काही शिकायला मिळे.

आता सगळे विकत मिळते पण घरी केल्याचा आनंद व पुरवठा वेगळाच असतो.

उगारच्या चाळीतील अंगणात खाट टाकून त्यावर स्वच्छ पांढरे धोतर अंथरून घातलेले सांडगे, पापड , सांगलीला वेलणकर वाड्यात महिनाभर रंगलेला शेवयांचा सोहळा, सातारला तळवलकर वाड्यात अंगणात खेळीमेळीने केलेले वाळवण सारे सारे आठवले की मन भरून येते.

वाळवण वाळवण

वर्षभराची साठवण

उरली फक्त आठवण

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments