डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग १२- संगीत -१ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
महाविद्यालयात शिकत असताना गंभीर विषयावरील ग्रंथ वाचनाच्या खालोखाल नरेंद्रच्या आयुष्यात स्थान होतं ते संगीताला. तो स्वत: संगीताचा आनंद घेत असे आणि इतरांनाही तो तेव्हढ्याच मुक्तपणे देत असे. अनेक वेळा मित्र जेंव्हा आग्रह करत असत तेंव्हा, नरेंद्र लगेच प्रतिसाद देत असे. त्याचा सूर लागला की सगळीकडे निस्तब्ध शांतता पसरून त्या स्वरमाधुर्यात सगळेजण डुंबून जात.
विश्वनाथबाबूंनी नरेंद्रचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास रायपूरच्या वास्तव्यातच सुरू केला होता. त्याला अनेक भाषेतली गीतं शिकवली होती. त्यांनी नरेंद्रला, ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा, ठुमरी, बंगाली कीर्तन शामसंगीत व बाउल संगीत हे लोकसंगीताचे प्रकार पण शिकविले. नरेंद्रची ही तयारी करून घेतल्यावर त्यांनी कलकत्त्याला परतल्यावर, पुढे योग्य गुरूंकडे रियाझ आणि धडे घेण्यासाठी व्यवस्था केली होती. आई भुवनेश्वरीदेवीं चा आवाज पण चांगला होता. आई वडिलांच्या सान्निध्यात तसे संगीताचे संस्कार नरेंन्द्रवर लहानपणापासूनच होत होते. लहानपणी आपली आज्जी रायमणीच्या घरात त्याचा कधी कधी रियाझ चालत असे. दत्त घराण्याला संगीताचं वरदान लाभल होतं. सन्यासी झालेले नरेंद्रचे आजोबा दुर्गाप्रसाद उत्तम गायक होते. त्यांचा वारसा विश्वनाथबाबू चालवत होतेच. ते दर आठवड्याला गुणीजनांना बोलवून त्यांच्या बैठका भरवायचे, सर्वदूर प्रवासात संगीतातले नवनवीन प्रकार ऐकून व पाहून आल्यावर तसे संगीत, गायकांना ऐकवायचे. असे म्हणतात की, ‘ठुमरी’ प्रकार बंगाल मध्ये विश्वनाथ बाबूंनीच परिचित करून दिला.
तीव्र बुद्धिमत्तेबरोबर रसिकता आणि अभिजात अभिरुची हे गुण असल्यानेच युवावस्थेत येता येताच नरेंद्रने गायन वादन कौशल्य आत्मसात केले होते आणि कुटुंबातही याची ख्याती पसरु लागली. त्याच्या धीरगंभीर आणि सुरेल आवाजाने लोक आकर्षित होत. “स्वरांच्या माध्यमातून त्यातील सौंदर्याच्या आविष्कारा बरोबरच रसिक श्रोत्यांच्या मनात विशिष्ट भाव निर्माण झाला पाहिजे. श्रोत्यांची आणि स्वत: गायकाची अशी भावसमाधी लागणे, गायनाचे सूर थांबल्यावरही तिचा परिणाम श्रोत्यांच्या मनात रेंगाळत राहणे आणि त्यांचे मन एका उदात्त वातावरणात पोहोचणे हे संगीताचे खरे उद्दीष्ट आहे” असे नरेंद्रचे मत होते. त्यांचा हा व्यासंग केवळ मैफिली पुरताच मर्यादित नव्हता.
श्री रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र ची पहिली भेट झाली त्याचं कारण, नरेंद्रचं गाणं हेच होतं. नरेंद्रचं संगीत हेच या दोघांच्या मधल्या अतूट संबंधांचा सेतू होता.
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈