डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 15 – पारतंत्र्य आणि धर्म ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्रनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले तो काळ १८८० ते १८८४ च होता. त्यावेळी भारत वेगळ्याच परिस्थितीतून जात होता. सभोवताली अनेक घटना घडत होत्या. चळवळी चालू होत्या. बंगाल मद्रास आणि महाराष्ट्रात राजकीय जागृती होत होती. इंग्रजांनी याचा फायदा घेत आपली राजकीय पकड आपल्या देशावर घट्ट बसवली .त्यांना राजसत्ता मिळाली आणि आपल्याला गुलामगिरी वाट्याला आली होती. या सर्व घडामोडी नरेंद्र च्या संवेदनशील मनाने पाहिल्या होत्या. पण आपल्यावर राज्य करणारे परकीय आहेत याची खंत फक्त मोजक्या सुशिक्षित वर्गालाच होती. हे लोक बुद्धिजीवी होते. लढवय्ये नव्हते. जे खरे देशभक्त होते त्यांना या गुलामगिरीची जाणीव झाली आणि विचार पुढे आला की, आपल्या समाजातली दुर्बलता नष्ट झाली पाहिजे, ते करायचे असेल तर, नव्या पिढीला बलोपासना करून शरीर सुदृढ करायला प्रवृत्त केले पाहिजे. तो मार्ग होता व्यायामाचा .त्यामुळे यासाठी ठिकठिकाणी आखाडे आणि व्यायामशाळा निर्माण झाल्या होत्या. व्यायाम करून शरीर कमावणे हा एक देशभक्तीचा मार्ग आहे असे पुढारी लोकांना वाटत होते.

ते तरुणांना सामर्थ्यसंपन्न होण्याचा संदेश देत होते. याचा परिणाम नरेंद्रवरही झाला. तो पण आखाड्यात जाऊ लागला होता. याच सुमारास हिंदुत्ववादी दृष्टीकोण बाळसे धरत होता. आपण आपल्या धर्माची जाण ठेवली पाहिजे अशा विचाराने नरेंद्र प्रेरित झाला होता. तो वेगवेगळ्या व्यायाम शाळेत, हिंदू महामेळ्यात, आणि व्यक्तींकडे जात असे. या देशाच्या आजवरच्या संस्कृतीचा शिल्पकार असलेला, आणि भविष्याला आकार देऊ पाहणारा समाज केवळ हिंदूंचाच होता. त्यांच्या कार्यक्रमालाही नरेंद्र जाऊ लागला. पण या सुमारास भारतात धर्माची अवस्था अत्यंत शोचनीय, काळजी करण्यासारखी झाली होती. धर्माच्या नावाखाली कितीतरी गोष्टी उघडपणे चालत असत. कशाचेही ज्ञान नाही. संत- सत्पुरुषांच्या शिकवणुकीचा संबंध नाही. बंगालची तर अवस्था इतर  प्रांतांपेक्षा अजूनच वाईट होती. याचे मुख्य कारण होते की दुर्गा आणि काली देवतांच्या उपासने मध्ये पशुहिंसा व्हायची. महत्वाच्या उत्सवांच्या वेळी शेकडो पशुचा बळी दिला जायचा. त्यात सर्व लोक सामील व्हायचे. आनंद साजरा करायचे. आपण खूप पुण्ण्याचे काम करत आहोत असे त्यांना वाटायचे.

याचा सार्वजनिक सामाजिक आविष्कार होता तो म्हणजे, सणाच्या वेळी गटागटाने किंवा मिरवणूक काढून रस्त्यावरून जाताना अत्यंत ओंगळवाणं, बीभत्स, अश्लील अशी गाणी म्हणणे, त्यात प्रतिष्ठित थोरा मोठ्यांनी सहभागी होणे व्हायचे. आपल्या वागण्याचा लहान कोवळ्या वयाच्या मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार पण त्यांच्या मनात यायचा नाही. धर्माच्या क्षेत्रात अज्ञान आणि ही विकृती नरेन्द्रने स्वतच्या डोळ्याने पाहिली. या सर्व पार्श्वभूमीचा परिणाम त्याच्या तरुण मनावर होणारच होता. या वेळी राज्यकर्ते महाविद्यालयात बायबल ची शिकवण देऊ लागले. मिशनरी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करू लागले. आणि रस्त्यारस्त्यात हिंदू धर्माची नालस्ती आणि देवदेवतांची टिंगल करत फिरू लागले. त्याउलट हिंदू चे उज्ज्वल असे तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ तरुणांच्या डोळ्यासमोर सुद्धा पडत नसत. त्यांना आपल्या ग्रंथांचा साधा परिचयही नव्हता होत.नरेंद्रला मात्र लहानपणीच धार्मिक कथा, धार्मिक ग्रंथांचा, कथांचा आई आणि वडिलाकडून परिचय झाला होता.    

आपल्याकडेही आज अशी विकृती आपल्या सण-उत्सवात पाहायला मिळते, आपलंच राज्य असूनसुद्धा. नुसतं गणेश विसर्जन मिरवणूक डोळ्यासमोर आणा. आठवा काय काय पाहायला मिळतं त्यात? आज तर आपण पारतंत्र्यात नाही, कुणाचं आपल्यावर राज्य नाही, आपला धर्म आपल्या हातात आहे. आपल्याला योग्य दिशा दाखवणारे आपणच आहोत. त्या काळात आपला धर्म टाकाऊ आहे आणि पाश्चात्य संस्कृती चांगली आहे असेच लोकांना वाटू लागले होते. नरेन्द्रने या बिघडलेल्या परिस्थितीचा विचार करतच पुढील मार्गक्रमण आखले होते. सामाजिक सुधारणा करण्यासाठीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते.

आताही आजच्या पिढीला आपले वेद, उपनिषदे, धार्मिक ग्रंथ आणि शिकवणूक याची कल्पना नाहीच. वाचन नाही. संस्कार नाहीत. विचारांना दिशा नाही. योग्य अयोग्य काय याचं योग्य दिशादर्शन नाही त्यामुळे मन भरकटतय . पाश्चात्य संस्कृती बरोबर वाटते. आजच्या तरुणांनी आपली संस्कृती कशी आहे याचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments