सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ वनौषधी संरक्षण…एक आव्हान आणि उपाय – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(ऋग्ण सेवा प्रकल्प तर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला लेख.)
एकदा वाचनात आलेली गोष्ट आठवली. एक ऋषी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवीत असताना, त्यांनी मुलांना सांगितले, आज तुम्हाला सगळ्यांना फिरायला सोडणार आहे. त्याच बरोबर एक काम पण आहे. सर्वत्र फिरत असताना, ज्या ज्या वनस्पतींचा काही उपयोग नाही, अशा घेऊन यायच्या. संध्याकाळी बऱ्याच जणांनी भारेच्या भारे आणले. एक जण मात्र संकोचून बाजूला गप्प उभा राहिला. तो मोकळ्याच हाताने परत आला. त्याच्याबद्दल, बाकीचे ” आळशीपणाचे लक्षण ” असे म्हणू लागले. ऋषींनी सर्वांना उभे केले. जो मोकळा आणि मूक उभा होता त्याला मोठे बक्षीस दिले. बाकीच्यांना आश्चर्य वाटले. गुरुजींनी सांगितले की मी तुम्हाला सांगितले होते की, ” ज्या वनस्पतींचा काही उपयोग नाही त्या घेऊन या “. पण या मुलाला बक्षीस का दिले तर त्याने ओळखले की निरुपयोगी अशी एकही वनस्पती नाही. प्रत्येकाचा काही ना काही उपयोग हा आहेच. नंतर गुरुजींनी निरूपयोगी अशी कोणतीच वनस्पती नाही सगळ्या वनस्पती या औषधी आहेत. आणि उपयुक्तही आहेत.
चरक, सुश्रुता, वाग्भट, शारंगधर चवन अशा अनेक ऋषींनी वनस्पतींच्या पंचांगांचा (मूळ, खोड, पान, फुल, फळ) अभ्यास केला. त्याला त्यांनी शास्त्राचा दर्जा दिला. आयुर्वेद. (यजुर्वेदाचा उपवेद). )आताच्या दृष्टिकोनातून या ऋषींना सुपर स्पेशालिस्ट म्हणायला हरकत नाही.
आपली भारतीय संस्कृती ही निसर्गाधिष्टीत आणि विज्ञानाधिष्ठित अशी आहे. पंच महाशक्तीना माणसांनी देवत्व दिलं. (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) आदरणीय ठरवलं. आपले सण, उत्सव व्रतवैकल्य या सर्व गोष्टी निसर्गाशी संपर्क साधणाऱ्याच आहेत. गुढीपाडव्याला गुढी बरोबर डोलणारा कडुलिंबाचा आणि आंब्याच्या पानाचा ढाळा, वटसावित्रीची वडाच्या झाडाची पूजा, हरतालिकेला वाहिली जाणारी सोळा प्रकारची पत्री, फूलं, शंकराला आवडणारा बेल, दसऱ्याच सोन, म्हणजे आपट्याची पाने आणि गव्हांकूर, यज्ञात वाहिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या समिधा , अशी कितीही उदाहरणं दिली तरी कमीच! अन्न वस्त्र , निवारा या मूलभूत गोष्टीही या वनश्री पासूनच आपल्याला मिळतात. आपल्या संस्कृतीत झाडं , वेली , फुलं देणाऱ्या वनश्री कडे निर्जीव म्हणून पाहिलं जात नाही. तर सजीव म्हणजे भावभावना असलेल्या, असं समजून त्या परिसरात जोपासल्या जायच्या. जोपासना, संगोपन , वर्धन आदरान केलं जायचं. हंगामाप्रमाणे त्या साठविल्या जायच्या. त्यावर संस्कार केले जायचे. ज्यांना आपण देववृक्ष म्हणतो (वड, पिंपळ, औदुंबर, पारिजात, शमी, आणि चिंच) कारण ते वृक्ष 24 तास हवेत ऑक्सिजन सोडतात. ज्यावर आपलं जीवन जगणं अवलंबून आहे. त्याच प्रमाणे ज्याला आपण ‘ पंचवट, ‘ म्हणतो, ते व , पिंपळ, औदुंबर, बेल, आणि पारिजात हे होत. त्यांचे वैशिष्ट्य असे की या वृक्षां मधून ओझोन वायू प्रक्षेपित होतो. जो वातावरणात दुर्मिळ असतो. किती महत्व आहे बरं या वृक्षांच! मोठ्या वृक्षांप्रमाणेच लहान वेली, छोटी झुडपेही तितकीच उपयुक्त व महत्त्वाची आहेत.
प्रत्येकाच्या दारात सन्मानाने डोलत राहणारी व देवाच्या नैवेद्यावर ताठ्यात उभ्या असणाऱ्या तुळशीचे महत्त्व किती सांगावे तितके कमीच! छोटसच रोपट पण छत्तीस रोगांवर उपचार करतं म्हणतात. आपण तर सोडाच, पण ग्रीसमधील ‘ईस्टर्न चर्च, ‘ नावाच्या संप्रदायात ही तुळशीची पूजा करतात. चरक, धनवंतरी, सुश्रुत यांनी, तिचे सौंदर्यवर्धक, त्रिदोषनाशक असं वर्णन केले आहे. कोरफड, शतावरी, अश्वगंधा, जेष्ठमध, गुळवेल, विजयसार, वावडिंग किती औषधी सांगायच्या! सौंदर्यासाठी, पोटासाठी, तापासाठी, अनेक आजारांवर उपाय तर आहेतच पण आजार होऊ नयेत, प्रतिकारशक्ती वाढावी यासाठीही आयुर्वेदात वनौषधींची यादीच सांगितली आहे. या वनौषधींनी आपल्यावरच उपकार केले आहेत असे नाही , तर त्यावर राहणारे, जगणारे कीटक, पशुपक्षी यांनाही जीवन दिले आहे. अत्यंत सूत्रबद्ध अशी निसर्ग साखळी आहे. आपल्यावर उपकार करणाऱ्या, आपल्या जीवनाशी एक अविभाज्य अंग बनलेल्या, या वनस्पती आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशात प्रचंड प्रमाणावर होत्या. सह्याद्री, सातपुडा, हिमालयासारख्या पर्वतराजीत तर जगातील सर्वात जास्त व सर्व रोगांवर उपयुक्त अशा वनस्पतींचे भांडारच आहे म्हणा ना! पण पैशाचा लोभापायी झालेली वृक्षतोड हा फार मोठा शाप त्याला लागलेला आहे.
क्रमशः…
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈