डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग 18 – असतील शिते तर जमतील भुते ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’
नरेंद्र ब्राह्मो समाजाच्या कामात, त्यांच्या मतप्रणालीत आतापर्यंत चांगला मुरला होता. त्यामुळे श्री रामकृष्णांबरोबर पूर्ण वेळ काम करण्याचे अजून त्याचे मन मानत नव्हते. बर्याच दिवसांत नरेंद्र दक्षिणेश्वरला गेला नव्हता. त्यामुळे रामकृष्णांचे मन सुद्धा नरेंद्रला भेटण्यास उत्सुक होते. ब्राह्मो समाजात गेलं तर, नरेंद्र तिथे नक्की भेटेल असं त्यांना वाटलं आणि ते सरळ संध्याकाळी उपासनेच्या वेळी ब्राह्मो समाजात गेले. त्यावेळी आचार्य, वेदिवरून धर्मोपदेश देत होते. त्यांच्या ईश्वरीय गोष्टी ऐकून रामकृष्ण सरळ वेदीजवळ जाऊन पोहोचले, याचा अंदाज नरेंद्रला होताच. लगेच तोही त्यांच्या पाठोपाठ वेदीजवळ गेला आणि त्यांना सावरू लागला. यावेळी आचार्य, आसनावरून उठले नाहीत आणि रामकृष्णान्शी बोलले देखील नाहीत. साधा शिष्टाचार सुद्धा पाळला नाही. नरेन्द्रनी, कसेतरी श्री रामकृष्णांना सभागृहाबाहेर काढून, त्यांना दक्षिणेश्वरला रवाना केले. त्यांचा आपल्यासाठी असा झालेला अपमान नरेंद्रला सहन झाला नाही. या जाणिवेने क्षुब्ध आणि व्यथित होऊन नरेन्द्रने त्या दिवसापासून ब्राह्मो समाजाचे काम सोडले ते कायमचेच.
नरेंद्र बी.ए.ला शिकत असतानाच विश्वनाथ बाबूंनी त्यांचे मित्र, निमईचरण बसू यांच्याकडे कायद्याच्या शिक्षणाची सोय केली होती. त्याच्या जीवनात स्थैर्य यावं, म्हणून त्यांचा प्रयत्न चालला होता. घरी नेहमी पाहुणे रावळे, येणारे जाणारे, नातेवाईक यांची वर्दळ असे. त्यामुळे नरेंद्र अभ्यासाला आजीकडे जात असे. साधे अंथरूण, आवश्यक पुस्तके, एक तंबोरा एव्हढेच त्याचे सामान असे. एकांतवास, ध्यानधारणा, कठोर शारीरिक नियम असा ब्रम्हचार्याचा दिनक्रम असे. काही वेळा तर श्रीरामकृष्ण सुद्धा तिथे येऊन साधनेसंबंधी उपदेश देऊन जात असत. काही नातेवाईक आणि मित्रांना हे वागणे आवडत नसे. सर्वजण आध्यात्मिकतेपासून नरेंद्रला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असत. मात्र तरीही नरेंद्र चे मित्रांना भेटणे सुरू असे.
एकदा असेच वराहनगर मध्ये मित्राकडे सर्व जमले होते. गप्पागाणी यात सर्व दंग झाले असताना, अचानक घाबरलेल्या अवस्थेत एकाने येऊन, नरेंद्रच्या वडिलांची हृदयक्रिया बंद पडून ते गेल्याची बातमी दिली. या बातमीने सगळ्या झगमगाटात सुद्धा नरेंद्रला सगळीकडे अंधार दिसू लागला. ताबडतोब तो घरी आला. ते दृश्य पाहून, पितृशोकाने नरेंद्रचे वज्रदृढ हृदय वितळून अश्रुंच्या धारा लागल्या.
आता भविष्यकाळ कसा असेल? आता दर महिन्याचा हजारो रूपयांचा खर्च कसा चालवायचा? भुवनेश्वरी देवींना आकाश फाटल्यासारखं झालं. संसारासंबंधी नेहमी उदासीन असलेल्या नरेंद्रला दारिद्र्याच्या कल्पनेने गांगरून जायला झालं. अनुकूल अवस्थेत अगदी जवळची म्हणवणारी, प्रतिकूल अवस्था येताच जवळचीच मंडळी पारखी होऊ लागली. विपन्नावस्थेत कुणी साथ देत नाहीत ही जगाचीच रीत. नरेन्द्रनाथाच्या तीक्ष्ण बुद्धीला सर्व उमजलं आणि समजलं सुद्धा. हे बसणारे चटके ते नेटाने आणि धैर्याने सहन करू लागले होते.
एकीकडे वकिलीची परीक्षा देत होते. दुसरीकडे कामधंदा, नोकरी शोधत होते. तीन चार महीने असेच गेले. घरात धान्याचा कण नसल्याने एखाद्या दिवशी सर्वांना उपाशीच झोपावे लागे. जवळच्या मित्रांना त्याने हे कळू दिलं नव्हतं. कधी अन्न आहे पण सर्वांना पुरेसे नाही. असे पाहून नरेंद्रनाथ, “आज मला एकाने जेवायला खूप आग्रह केला आहे, तेंव्हा, मी आज घरी जेवणार नाही” असे खोटेच भुवनेश्वरी देवींना सांगून कडकडीत उपास करत असे.
अशा लागोपाठ उपवासांनी तर एकदा ग्लानी येऊन निपचीतच पडले. काही जवळचे मित्र आर्थिक मदत करायला पुढे येत, त्यांची मदत ते सविनय परत करत असत. पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा स्वीकारायची हे त्यांना असह्य होत असे. कधी कधी मित्र त्याला घरी जेवायला बोलावण्याचा प्रयत्न करीत. तेंव्हा कामाचा बहाणा करून नरेंद्र टाळत असे. नाहीतर कधी खोटा खोटा आव आणत जेवायला जात असे तेंव्हा त्यांच्या मनात कालवाकालव होऊन, डोळ्यासमोर, भुकेने कोमेजलेली आपली लहान लहान भावंडे दिसत.
तारुण्यात पाय ठेवत असतानाच भाग्यचक्र अचानक पालटल्यामुळे, पितृछत्र गेल्याने नरेन्द्रनाथ कुटुंबाचा पालनपोषणाचा भार सांभाळत असतानाच आणखी एक अरिष्ट आलं. नातेवाइकांनी कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा डाव रचून कोर्टात फिर्याद दाखल केली.
एक दिवस सकाळच्या प्रहरी उठता उठता भगवंताचे नाव घेऊन नरेंद्र अंथरुणातून उठत असताना, आईने ऐकले आणि त्वेषाने संतपून त्यांना म्हणाली, “ चूप रहा कार्ट्या, लहानपणापासून केवळ भगवान आणि भगवान. फार छान केलं भगवानानं?” हे शब्द ऐकून नरेन्द्रनाथाच्या व्यथित मनाला घरे पडली. तसच भाग्य फिरताच, वडिलांच्या जुन्या मित्रांचं वागणं पाहून नरेंद्र अचंभीत झाला. जगाच्या ह्या शोचनीय कृतघ्नतेचे बीभत्स रूप पाहून त्याचं मन बंडखोर होऊन उठलं.
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈