डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 23 – परिव्राजक –१. केल्याने देशाटण .. ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

तीर्थंभ्रमणाला निघायच्या आधी पण नरेंद्रनाथ आंटपूर, वैद्यनाथ, शिमूलतला इथे कित्येकदा आले होते. उजाडल्यानंतर सूर्य किरणे सर्व दिशांना पसरतात हे सांगायची गरज नसते. तसे स्वामीजी जिथे जिथे जातील तिथे तिथे प्रभाव पाडत असत. असाच अनुभव ते फिरलेल्या प्रत्येक प्रांतात दिसतो. बिहार प्रांत फिरत फिरत ते हिंदू भारतभूमीचं हृदय समजल्या जाणार्‍या काशीला आले. इथे ते संस्कृत भाषेचे पंडित आणि साहित्य व वेदांत पारंगत असलेले सद्गृहस्थ श्री प्रमदादास मित्र यांच्याकडे राहिले. स्वामीजींना त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदरभाव वाटू लागला. पुढे पुढे तर ते वैदिक धर्म आणि तत्वज्ञान याबद्दल काही शंका असली की ते प्रमदादास यांना पत्र लिहून विचारात असत. आपले आजोबा दुर्गाप्रसाद हे संन्यास घेतल्यावर काशीत आले होते. श्रीरामकृष्ण पण इथे येऊन गेले होते. तिथे मद्रासी, पंजाबी, बंगाली, गुजराथी, मराठी हिंदुस्तानी अशी प्रभृती सर्वजण, आचारांची भिन्नता असूनही एकाच उद्देशाने विश्वेश्वराच्या मंदिरात एकत्र येत असत. यात नरेंद्रनाथांना या विविध लोकांमधला ऐक्याचा विशेष गुण भावला. म्हणूनच त्यांना सगळीकडे फिरून भारत जाणून घ्यावसा वाटला होता.

शिवाय इंग्रजांची सत्ता, गुलामी असताना वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी ते इथून निघून कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत अवलोकन करता करता भ्रमण करत होते.

उत्तरेत फिरून झाल्यावर ते शरयू तीरावरच्या अयोध्येला येऊन पोहोचले. काशी आणि अयोध्या ही धर्मक्षेत्र होती. त्यामुळे स्वामीजींचे आध्यात्मिक मन तिथे रमले. ‘अयोध्या’ जिच्या मातीशी सूर्यवंशी राजांच्या गौरवाची स्मृती जोडलेली आहे. शरयू नदीच्या तीरावरून आणि घाटावरील विविध मंदिरातून फिरतांना त्यांच्या डोळ्यासमोर प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्रच उभे राहिले. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ, अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येत आल्याबरोबरच त्यांना लहानपणची रामसीतेची भक्ती, रामायण प्रेम, वीरभक्त श्री हनुमानवरची गाढ श्रद्धा आणि आईच्या तोंडून ऐकलेल्या रामाच्या कथा सारे सारे आठवले असणारच. काही दिवस इथे त्यांनी रामायत संन्याशांच्या समवेत श्रीरामनामसंकीर्तनात घालवून पुढे ते ऑगस्ट१८८८ मध्ये लखनौ- आगरा मार्गाने पायी पायी चालत वृंदावनच्या दिशेने निघाले.    

लखनौला त्यांनी बागा, मशिदी, नबाबाचे प्रासाद बघितले. आग्र्याला आल्यावर तिथल्या शिल्प सौंदर्याचा जगप्रसिद्ध नमुना ‘ताजमहाल’ मोगलकालीन इमारती, किल्ले पहिले.  मोगल साम्राज्याचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. लखनौ आणि आग्रा या ऐतिहासिक स्थळं सुद्धा  त्यांच्या मनात भरली. कारण ती भारताच्या इतिहासाच्या पर्वाची महत्वाची खूण होती आणि स्वामीजी त्याबद्दल पण जागरूक होते. म्हणून एक वैभवशाली साम्राज्याची स्मृती म्हणून ते पाहत होते.

शिवाची काशी पाहिली, श्रीरामची अयोध्या पाहिली आता भगवान श्री कृष्णाच्या वृंदावनला स्वामीजी  पोहोचले. राधा कृष्णाची लीलाभूमी असलेल्या वृंदावनात, मर्यादित परिसरात असलेले विविध प्रकारचे, भिन्न काळात बांधले गेलेले वास्तूकलेचे, अनेक मंदिरांचे नमुने त्यांना पाहायला मिळाले. वृंदावनला ते बलराम बसुंच्या पूर्वजांनी बांधलेल्या कुंजामध्ये राहिले. तिथे यमुनेच्या वळवंटात असो की भोवताल च्या परीसरात असो सगळीकडेच, श्रीकृष्णाच्या बासरीचा मधुर ध्वनी येतोय असे वाटावे अशा काव्यात्मक आणि भक्तिपूर्ण वातावरण त्यांनी अनुभवले. गोवर्धन पर्वताला त्यांनी प्रदक्षिणा घातली. तेंव्हाच त्यांनी मनाशी संकल्प केला की, कोणाकडेही भिक्षा मागायची नाही. कोणी आपणहून आणून दिले तरच त्या अन्नाचा स्वीकार करायचा. हे बिकट व्रत त्यांनी घेतले. एकदा तर त्यांना पाच दिवस उपाशी राहावे लागले होते. पण इथे त्यांनी दोन वेळा परमेश्वर भक्तीचा ईश्वरी अनुभव घेतला आणि श्रीकृष्णाची भक्ती आणखीनच दृढ झाली.

पुढे ते हरिद्वारला गेले. वाटेत जाता जाता ते हाथरस च्या स्थानकावर बसले असताना, त्यांना थकलेल्या अवस्थेत स्थानकाचे उपप्रमुख असलेले शरदचंद्र गुप्त यांनी पाहिले. आणि, “स्वामीजी आपल्याला भूक लागलेली दिसते आपण माझ्या घरी चलावे” अशी विनंती केली. स्वामीजींनी लगेच हो म्हटले आणि त्यांच्या घरी गेले. स्वामीजींचे व्यक्तिमत्व बघून शरदचंद्र गुप्त आकर्षित झाले होते , त्यांनी स्वामीजींना काही दिवस इथे राहावे असा आग्रह केल्याने ते खरच तिथे राहिले. सर्व बंगाली लोक संध्याकाळी एकत्र जमत. आपला धर्म आणि समाज यावरील सद्यस्थितीबद्दल  स्वामीजी बोलत. आपल्या मधुर आवाजात गीतं म्हणत. येणारे सर्व बंगाली मोहित होऊन जात. त्यांच्यातील भांडणे जाऊन एकोपा निर्माण झाला. 

एकदा चिंतेत असताना शरदचंद्रांनी स्वामीजींना पाहिलं आणि विचारलं, “आपण एव्हढे कसल्या विचारात आहात?” स्वामीजी म्हणाले, “मला खूप काम करायचं आहे. पण माझी शक्ती कमी. काम मोठं आहे. मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायच आहे. तीचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे. सगळा समाज भुकेकंगाल आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. अध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे”. अशा प्रकारचे संवाद होत होते. चर्चा होत होत्या. काही दिवसांनी  स्वामीजी तिथून निघतो म्हटल्यावर, शरदचंद्र जाऊ नका म्हणून विनवणी करू लागले आणि ‘मला आपला शिष्य करून घ्या’ असेही म्हणू लागले. तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमच्या मागोमाग येईन हा त्यांचा दृढ निश्चय ऐकून, “शेवटी तुम्ही माझ्याबरोबर येण्याचा आग्रहच धरता आहात तर घ्या हे भिक्षा पात्र आणि स्थानकातले जे हमाल आहेत त्यांच्या दरात जाऊन भिक्षा मागून आणा” असे स्वामीजी म्हटल्याबरोबर, शरदचंद्र तडक उठले आणि भिक्षा पात्र घेऊन सर्वांकडून भिक्षा मागून आणली. स्वामीजी अत्यंत खुश झाले. त्यांनी शरदचंद्रांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. असे शरदचंद्र गुप्त हे स्वामीजींचे पहिले शिष्य झाले, आणि मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन, नोकरीचा राजीनामा देऊन, स्वामीजीं बरोबर ते हाथरस सोडून हृषीकेशला आले. त्यांचे नाव स्वामी सदानंद असे ठेवण्यात आले. असा सुरू होता स्वामीजींचा प्रवास .

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments