डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग 27 – परिव्राजक – ५ . मातृभाषा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
स्वामीजी आणि अखंडांनंद आता वैद्यनाथला पोहोचले होते. कारण ते एक धार्मिक क्षेत्र होत आणि ते अखंडानंदांनी पाहिलं नव्हतं. रस्त्यात लागणारी धार्मिक स्थळांना ते आवर्जून भेट देत असत. तिथे एक ब्राम्ह्समाजी नेते राजनारायण बोस यांची भेट घेतली. स्वामीजी त्यांना ओळखत होते. त्यांचं वय बरच म्हणजे चौसष्ट होतं. पाश्चात्य संस्कृतीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महर्षि देवेन्द्रनाथ टागोर यांना ते गुरु मानत. मिशनर्यांच्या धर्मप्रसाराला पायबंदची चळवळ, विधवाविवाह सारखी सामाजिक सुधारणा चळवळ यात त्यांचा सहभाग होता. बंगाल मध्ये देशभक्तीची जाणीव उत्पन्न होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी एक संस्था पण काढली होती. इंग्रज आपल्या देशावर राज्य करतात ते आपल्या कल्याणसाठी नव्हे तर त्यांच्या देशाचे ऐश्वर्य वाढावे म्हणून, म्हणून त्यांना हुसकावून लावण्यासाठी बळाचा वापर करायला काय हरकत आहे असं त्यांचं मत होतं.
त्यांच्या कुटुंबातच राष्ट्रावादाची परंपरा होती. जगप्रसिद्ध, महायोगी श्री अरविंद घोष यांची आई म्हणजे राजनारायण यांची कन्या होती. क्रांतिकारक कन्हैयालाल दत्त यांच्या बरोबर ऐन तारुण्यात हसत हसत फाशी गेलेला सत्येन्द्रनाथ बोस हा त्यांचा पुतण्या होता. देशभक्तीच्या या परंपरेमुळे त्यांची काही मते ठाम होती. जसे की, आपण आपला पोशाख करावा. आपल्या भाषेतच बोलावे. आपले शिष्टाचार आपण सांभाळावेत. आपण आपले भारतीय खेळच खेळावेत. यावर त्यांचा बारीक कटाक्ष असे. त्यांच्या संस्थेत कोणी एखादा इंग्रजी शब्द वापरला तर त्याला एक पैसा दंड भरावा लागे. त्यांचा हा स्वाभिमान स्वामी विवेकानंदांना माहिती होता म्हणून, इथे त्यांची भेट घेताना स्वामीजींनी अखंडानंदांना आधीच सांगून ठेवले होते की, आपल्याला इंग्रजी येतं हे त्यांना अजिबात कळू द्यायचं नाही.
त्या काळात बंगालमधल्या सुशिक्षितांमध्ये इंग्रजी शब्द वापरण्याची खूप मोठी खोड लागली होती. इतकी की आपल्या मातृभाषेत त्यांना कोणत्याही विषयावर धड विचार प्रकट करता याचे नाहीत आणि धड इंग्रजीत सुद्धा नाहीत. भाषेची दैन्यावस्थाच होती.
त्यामुळे राजनारायण यांच्याबरोबर झालेल्या गप्पांमध्ये स्वामीजींनी एकही इंग्रजी शब्द येऊ दिला नाही. राजनारायण यांना वाटले की ही संन्यासी मुलं, इंग्रजी कुठल येणार त्यांना? अशाच समजुतीत ते होते. या प्रसंगात अखंडानंद आणि स्वामीजींची मस्त करमणूक झाली होती. ही समजूत करून देण्यात आपण यशस्वी झालो असे दोघांनाही वाटले. पुढे स्वामीजींची किर्ति ऐकून राजनारायण यांना स्वामीजींची भेट आठवली आणि आश्चर्य वाटले की, “केव्हढा चमत्कार आहे हा, इतका वेळ ते माझ्याशी बोलले, पण त्यांना इंग्रजी येतं अशी शंका क्षणभर सुद्धा मला आली नाही. खरोखरच हा विलक्षण चतुर माणूस असला पाहिजे.” खरच स्वामीजींचं केव्हढं प्रसंगावधान होतं.निश्चय होता.
धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली त्या राजनारायण यांना स्वामीजींना वैद्यनाथला भेटावसं वाटलं कारण, ब्राह्म समाजात देशभक्तीचे विशेष महत्व नसताना सुद्धा ,राज नारायण ब्राह्म समझी असूनसुद्धा त्यांनी तरुणांमध्ये स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. हेच वेगळेपण स्वामीजींना भावलं होतं. आपल्या प्रवासात अशा व्यक्तींचीही आवर्जून भेट घेणं हा त्यांचा उद्देश असायचाच. प्रवासात अशी अनेक प्रकारची माणसे त्यांना भेटत. नव्हे स्वामीजीच त्यांना आवर्जून भेटत.
समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं किंवा त्यांना किमत देणं हा स्वामीजींचा गुण कसं वागायचं ते शिकवणारा आहे. राजनारायण यांची स्वदेशी बद्दलची आणि मातृभाषेबद्दलची भावना हे राष्ट्र प्रेमाचं उदाहरण आहे. देशाभिमानाचं उदाहरण आहे त्यामुळे स्वामीजींना ते मनापासून आवडलं होतं असं वाटतं.
मातृभाषेची दैन्यावस्था हा विषय तर आताही आहे. आपण रोजचं पाहतोय, ऐकतोय. पु.ल देशपांडे यांनी उपहासाने म्हटलं होतं, ‘आपल्या मदरटंग मध्ये आपल्या फिलिंग चांगल्या एक्स्प्रेस करू शकतो’. हा गमतीचा भाग सोडला, तर आज रोज अनेक वार्तापत्र झडताहेत वाहिन्यांवर. इतकी मोठी आपत्ती आणि इतकी घाई आहे की आंतर्राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेले शब्दच जसेच्या तसे वापरतोय. मराठी भाषा इंग्रजी शब्दांनी समृद्ध झाली आहे असेच म्हणावे लागेल. त्यात लॉक डाउन, हॉटस्पॉट, व्हायरस, सोशल डिस्टन्स या शब्दांनी तर सामान्य लोकांना काहीच कळत नाहीये असं वाटतं काही काही वेळा. ‘लॉकडाउन’ या शब्दाचा नेमका अर्थ समाजाला स्वत:च्या मातृभाषेत उमगत नाहीये. म्हणूनच याही परिस्थितीत ते कळत नसल्याने बाहेर नेहमीप्रमाणेच फिरत आहेत. जागतिक पातळीवरच्या अशा संसर्गजन्य साथीच्या सूचना, माहिती, आपल्या मातृभाषेत सोप्या शब्दात सांगितली, समजून सांगितली, तर निदान कळेल तरी. तरच ते गंभीरपणे या सगळ्याकडे बघतील. मातृभाषा हृदयाची भाषा.
क्रमशः…
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈