डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग ३२ – परिव्राजक १० – लोकसंपर्क ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
स्वामीजींच्या लोक संपर्कात सुशिक्षित लोक जास्त असायचे पण त्याचा बरोबर ग्रामीण भागातले लोक सुद्धा असायचे. सुशिक्षित लोकांबरोबर त्यांचा सतत विविध संवाद,चर्चा होत असत. सुशिक्षित तरुणांकडून त्यांना ही अपेक्षा होती की, ‘त्यांनी आपल्या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. एव्हढंच नाही तर भारतीयांनीच भारताचा इतिहास लिहिला पाहिजे. नाहीतर परकीय लोक आपल्या देशाचा इतिहास लिहितात. त्यांना आपली संस्कृती आणि परंपरा यांची काहीही माहिती नसताना तो लिहीत असतात. त्यामुळे त्यांना भारताच्या इतिहासातले बारकावे समजत नाहीत. अशांनी इतिहास लिहिला आणि तो आपण वाचला तर आपली दिशाभूल होते असे त्यांना वाटायचे’.
स्वामीजी राजस्थान सारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या प्रदेशात आले होते, त्यामुळे त्यांना साहजिकच ही तुलना करता आली असणार. आज तर आपल्या राजकीय परिस्थितीमुळे आपल्या इतिहासकडेही राजकीय द्वेषातूनच पाहिलं जातय. ही परिस्थिति इतकी वाईट आहे ही राजकीय स्वार्थापोटी देशाचा इतिहास, देशाभिमान यांचं महत्व राहिलेलं दिसत नाही. त्याकाळात ही गुहेत राहणार्या आध्यात्मिक स्वामीजींनी सामाजिक भान सुद्धा जपलं होतं. त्यांचा मोलाचा सल्ला,उपदेश अशा समाजात जिथं अनुभव येईल, जिथं गरज आहे तिथं तो देत असत.
भारत कृषि प्रधान देश आहे त्यामुळे जास्त संख्या ग्रामीण भागात राहणारी आहे. पण ग्रामीण भागातले खेडूत जास्त शिकले की शहराकडे धाव घेतात. खर तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीकडे हा वर्ग नोकरीला भुलून पाठ फिरवतो. हे स्वामीजींच्या त्या काळात सुद्धा लक्षात आलं होतं. उलट शहरातल्या सुशिक्षित लोकांनी खेड्यात जाऊन तिथल्या शेतकर्यांशी संवाद साधला पाहिजे. उलटा प्रवास झाला पाहिजे. म्हणजे दोन्ही वर्गात आपुलकीचे नाते निर्माण होईल असे स्वामीजींचे मत होते. त्यानुसार ते सहवासात आलेल्या लोकांना मार्गदर्शन करत असत.
आज कोरोना साथीच्या परिस्थितून पुन्हा एकदा हीच गोष्ट सिद्ध झाली आहे. इतके कामगार आणि मजूर, कारागीर असेच खेड्याकडून शहराकडे नोकरीच्या आमिषानेच स्थलांतरित झाले आहेत. त्याचा अशा संकटाच्या वेळी केव्हढा परिणाम व्यवस्थेवर आणि त्यांच्याही जीवनावर पडलेला दिसतोय. आता तर शहराकडून खेड्यात जाऊन तिथली अर्थव्यवस्था भक्कम करण्याची वेळ आली आहे.
स्वामीजींनी अशा खेडूत लोकांबरोबर तरुण लोकांना पण दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तरुणांना संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्याचे काही प्राथमिक धडेही त्यांनी तरुणांना दिले कारण, संस्कृत शिकलं तरच भारताची परंपरा खर्या अर्थाने समजू शकेल असं त्यांना वाटत होतं. शिवाय पाश्चात्य देशात जे जे काही नवे ज्ञान असेल, नवे विचार असतील, त्याचाही परिचय भारतीयांनी करून घेतला पाहिजे. सर्व अभ्यासला शिस्त हवी, माहितीमध्ये रेखीवपणा हवा,नेमकेपणा हवा. कोणत्याही विषयाच्या ज्ञांनाच्या बाबतीत परिपूर्णतेची आस हवी या गोष्टींवर स्वामीजींचा भर होता. हे गुण आपण भारतीयांनी पाश्चात्यांकडून घेतले पाहिजेत असे त्यांना वाटे.
त्यांचे नुसते तात्विक गोष्टींकडे च लक्ष होते असे नाही .इतके लोक भेटायला येत, त्यांना कोणाला कशाची गरज आहे या व्यावहारिक गोष्टींकडेही त्यांचे लक्ष असे. अलवर मुक्कामात एका गरीब ब्राम्हणाला आपल्या मुलाची मौंज करण्याची इच्छा होती पण त्याची तेव्हढी आर्थिक परिस्थिति नव्हती. तेंव्हा स्वामीजींनी लोकांना विनंती केली की सर्वांनी वर्गणी गोळा करून, त्या मुलाची मौंज करावी. सर्वांनी संमती दिली. पण पुढे स्वामीजी जेंव्हा अबुला गेले तेंव्हा त्यांनी तिथल्या अनुयायला पत्र लिहून विचारले की, सांगितलेल्या सर्व गोष्टी चालू आहेत ना आणि त्या ब्राम्हणाच्या मुलाची मौंज झाली का हे ही विचारले.
अशा प्रकारे स्वामीजींनी पुढच्या प्रवासाला गेल्यावर आधीच्या मुक्कामातल्या लोकांशी पत्र संवाद चालू केला. संपर्क ठेवला आणि उपदेश पण करत राहिले. परिव्राजक म्हणून फिरताना ते कुठेही गुंतून पडत नव्हते पण पत्र लिहिणे, संबंधित लोकांचे पत्ते लक्षात ठेवणे, जपून ठेवणे या नव्या व पूरक गोष्टी अनुभावातून त्यांनी स्वीकारल्या होत्या आणि यातूनच मग स्वामीजींनी आपल्या वराहनगरच्या मठातील गुरुबंधूंना संपर्कात राहण्यासाठी पत्र लिहिणे सुरू केले.
अलवरचा निरोप घ्यावा असं त्यांना वाटलं, सात आठवडे झाले होते इथे येऊन. त्यात अनेकांनी अनुयायित्व पत्करल होतं. खूप हितचिंतक जमवले होते. प्रवास पुढे सरकत होता तसे त्यांच्या अडचणी कमी होत होत्या. मोठ्या संख्येने लोक ओळखू लागले होते. पुढे पुढे तर, पुढच्या मुक्कामाला कोणीतरी परिचय पत्र द्यायचे ते बर्याच वेळा आधीच्या मुक्कामातील प्रभावित झालेली व्यक्तीच असायची. सहज ही सोय व्हायची, पण त्यांनी स्वत: कधी अशा सोयीसाठी प्रयत्न केला नव्हता.
अलवर सोडून स्वामीजी आता जयपूरला पोहोचले. यावेळी अलवरचे त्यांचे खूप हितचिंतक लोक त्यांना सोडायला त्यांच्या बरोबर पन्नास साठ किलोमीटर पर्यन्त आले होते. यावरून स्वामीजींच्या सहवासाचा परिणाम कसा होत होता याची कल्पना येते.
क्रमशः…
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈