डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

खेत्री म्हणजेच खेतडीहून स्वामीजी पुन्हा अजमेरला आले. श्री हरविलास सारडा यांच्याकडून तीन चार दिवसांनी ते बेबार इथं गेले असता, शामजी कृष्ण वर्मा अजमेरहून कामानिमित्त बेबारला आले होते, तेंव्हा ते स्वामीजींना बरोबर घेऊनच आले. हरविलास यांनी शामजींना स्वामीजींचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि त्यांची देशभक्ती याबद्दल सर्व सांगितलं होतं. शामजींच्या घरी स्वामीजी पंधरा दिवस राहिले होते. तिथे स्वामीजींचा शामजींबरोबर धार्मिक आणि तत्वज्ञानवर संवाद होत असे. हरविलास यांचे राजस्थानमध्ये समाज सुधारणेचे मोठे काम होते तर, राजकीय क्षेत्रातल्या सर्वात जहाल क्रांतिकारकांच्या चळवळीला मदत करणारे पंडित शामजी कृष्ण वर्मा. (आपल्याला शामजी कृष्ण वर्मा हे व्यक्तिमत्व  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रात आपल्याला भेटले आहे.) या दोघांची भेट आणि झालेली वैचारिक देवाण घेवाण आश्चर्यकारकच आहे.

यानंतर स्वामीजी अबुच्या मार्गाने निघाले असता त्यांना तिथे ब्रम्हानंद आणि तुरीयानंद भेटले. यावेळी स्वामीजी फार उदास होऊन त्यांना म्हणाले, “ राजस्थान मधले लोकांचे दारिद्र्य पाहून माझे अंतकरण फाटून गेले आहे. त्यामुळे मला धड रात्री नीट झोप पण लागत नाही”. आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु वाहू लागले. ते जरी खेत्रीला राजवाड्यात राहिले होते, तरी त्यांचा गावातील लोकांचा संपर्क आला होता. रोज कुठे ना कुठे खेडेगावात पण प्रवास झाला होता. तेंव्हा ग्रामीण भागातल्या लोकांचे दर्शन झाले होते. शेतकरी आणि झोपड्यातून राहणारी मुलेबाळे त्यांनी पहिली होती. अंगावर पुरेसे कपडे नाहीत, पोट खपाटीला गेलेलं, चेहरे निस्तेज हे दारिद्र्याचं दृश्य त्यांच्या अंतकरणाला भिडलं होतच. राजा अजीतसिंग यांच्याशी बोलताना सामान्य माणसापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल. शिक्षण हे दारिद्र्य कमी करण्यास कसं उपयोगी पडेल यावर चर्चा होत असत आणि एखादा छोटासा संस्थानिक आपल्या प्रजेचा कल्याणकारी विचार करेल तर हजारो माणसांचं जीवन तरी सुखी होईल हे स्वामीजींना समजत होतं म्हणून ते तशी दृष्टी देण्याचा प्रयत्न संस्थांनीकांच्या भेटीत सगळीकडेच करत होते.

राजस्थान मधला प्रवास आटोपता घेऊन स्वामीजी आता गुजरातेत अहमदाबादला आले. काही दिवस भिक्षा मागून मिळेल तिथे राहिले नंतर, उपन्यायाधीश श्री बालशंकर उमियाशंकर यांच्याकडे राहिले, जैन साधूंची भेट घेतली. त्यांच्या बरोबर जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. पुढे लिमडी संस्थानला ते आले. लिमडीचे राजे, श्री ठाकुर जसवंतसिंग स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्न झाले. स्वामीजींना त्यांनी राजवाड्यातच काही दिवस ठेऊन घेतलं, ठाकुर जसवंतसिंग इंग्लंड आणि अमेरिकेचा प्रवास करून आले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांना आधुनिकतेचा स्पर्श झाला होताच. पण तरी सुद्धा भारताच्या सनातन धर्माचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे स्वामीजींचे विचार त्यांना पटले होते. वेदान्त विचारांचा प्रसार करण्यासाठी स्वामीजींनी पाश्चात्य देशात जावे ही कल्पना त्यांनीच प्रथम स्वामीजींना सुचवली असं म्हणतात. लिमडीहून जुनागडला जाताना ठाकुरांनी स्वामीजींना परिचय पत्र दिले.

भावनगर व सिहोरला राहून ते जुनागड इथं आले. इथल्या वास्तव्यात ते जुनागड संस्थानचे दिवाण श्री हरीदास बिहारीदास देसाई यांच्याकडे राहिले होते. इथला परिसर स्वामीजींच्या विचारांना अनुकूल होता. काही शतकांपूर्वी नरसी मेहता हे संत इथे होऊन गेले होते. शहरापासून जवळच गिरनार पर्वताचा पायथा इथं होता. तिथे जाण्याच्या मार्गावरच अनेक टेकड्यांवर पसरलेली हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांची मंदिरे होती. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोकाने लिहिलेला प्राचीन शिलालेख दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत होता. त्यावर, प्रजेला सन्मार्गाने जाण्याचे आवाहन करणारी वचने कोरली होती. धर्म वचनांचा असा नम्रतेने पुरस्कार करणारा सम्राट अशोक खरं तर भारताचा एक वारसाच होता आणि हा इतिहास आपण कसा विसरून गेलो आहोत याची तिथल्या लोकांना स्वामीजींनी आपल्या विवेचनातून जाणीव करून दिली होती.

दिवाण साहेब स्वामीजींबरोबर अनेकांच्या भेटी आणि चर्चा घडवून आणत होतेच. हे संवाद मध्यरात्री पर्यन्त रंगत. स्वामीजींनी इथे, येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याचा युरोप वर झालेला परिणाम तिथली संस्कृती राफेलची चित्रकला, धर्मोपदेशक, त्यांच्या संघटना, यामागे कशी येशू ख्रिस्ताची प्रेरणा आहे हे लोकांना समजून संगितले. युरोपमध्ये झालेली धर्मयुद्धे सांगितली. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीतली तत्वे कशी युरोप मध्ये पोहोचली आहेत हे सांगीतले. मध्य आणि पश्चिम आशियाचा इतिहास सांगितला आणि जगत अध्यात्म विचारात आपल्या भारतीय संस्कृतीचा कसा महत्वाचा आणि फार मोठा वाटा आहे हे पण सांगीतले. स्वदेशीचा अभिमान आणि श्रीरामकृष्ण यांचा परिचयही तिथल्या सुशिक्षित लोकांना करून दिला. सर्वंकष विचार करणार्‍या अशा व्यक्तीचा सहवास लाभला आणि भेट झाली यात जुनागड च्या लोकांना धन्यता न वाटली तरच नवल होतं.

इथून स्वामीजी वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन आले. भूज, कच्छ, वेरावळ आणि वेरावळ पासून जवळच असलेला, प्राचीन इतिहासाशी नातं सांगणारं प्रभासपट्टण इथे गेले. तेंव्हा त्यांनी गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले सोमनाथचे भग्न मंदिर पाहिले. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले छोटे मंदिर पाहिले.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी खंबीर धोरण स्वीकारून उभं केलेलं सोमनाथ मंदिर आज आपल्याला दिसतं.

प्रभास पट्टणहून स्वामीजी पोरबंदरला आले. हे ही एक संस्थान होते. तिथले प्रशासक श्री शंकर पांडुरंग पंडित यांच्या नावाने स्वामीजींना जुनागडहून परिचय पत्र दिल्याने स्वामीजी त्यांच्याकडे उतरले होते. हे पंडित वेदवाङ्ग्मयाचे अधिकारी व्यक्ति होते. त्यावेळी त्यांचे वेदांचे भाषांतराचे काम चालू होते. स्वामीजींची ओळख झाल्यावर सुरूवातीला त्यांनी स्वामीजींची कठीण भागाचे भाषांतर करण्यासाठी मदत घेतली. पण  नंतर स्वामीजी या कामात खूप रमले. भाषांतरासाठी मदत म्हणून ते तिथे राहिले.

शंकर पांडुरंग पंडित हे मोठे विद्वान होते. युरोपातील अनेक देशात ते प्रवास करून आले होते. त्यांना फ्रेंच आणि जर्मन भाषा येत होत्या. त्यांचं स्वतच मोठं ग्रंथालय होतं. याचं आकर्षण स्वामीजींना वाटलं होतं. पंडितांनी स्वामीजींना पहिल्या भेटीत सांगितलं होतं की, कितीही दिवस रहा आणि ग्रंथालयाचा हवा तेव्हढा वापर करा. या ओढीने स्वामीजी पुन्हा पोरबंदरला येऊन भाषांतरा साठी राहिले आणि त्यांची वेदांचा अभ्यास करण्याची फार दिवसांची इच्छा पण पूर्ण झाली.

स्वामीजींचे विचार अनेक वेळा ऐकल्यानंतर पंडित त्यांना म्हणाले होते, “स्वामीजी, आपल्या देशात तुमच्या विचारांचं चीज होणार नाही. तुम्ही पाश्चात्य देशात गेलं पाहिजे. भारतीय परंपरा आणि संस्कृती जाणण्याची जिज्ञासा असणारी माणसं तिकडं आहेत. तुम्ही तिथं जाऊन आपल्या धर्मातली सनातन तत्व स्पष्ट केलीत तर, त्याचा प्रभाव पाश्चात्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फ्रेंच भाषेचा अभ्यास केलात तर युरोप मध्येही खूप उपयोग होईल. यावर स्वामीजी म्हणाले, “मी एक संन्यासी आहे, माझ्या दृष्टीनं पूर्व काय आणि पश्चिम काय दोन्ही सारखी आहेत. तशी वेळ आली तर मी पश्चिमेकडे जाईन”. 

आधुनिक दृष्टी असलेल्या, जग पाहिलेल्या आणि हिंदुधर्माचा उत्तम व्यासंग असणार्‍या पंडितांची ओळख आणि भेट आणि वेदांचं भाषांतर करण्याची कष्टाची का असेना मिळालेली संधी यामुळे इथला स्वामीजींचा प्रवास फलदायी झालेला दिसतो. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments