☆ विविधा ☆ व्हाट्स ऍप, आजी आणि प्रायव्हसी -सिक्युरिटी ☆ श्री योगेश गोखले ☆ 

ताई आजी आपल्या नातवाची वाटच पहात होती. गेले २ दिवस परीक्षेमुळे तो बिझी होता. व्हाट्स ऍप बंद पडणार असं ४ दिवसापूर्वी तिला कोणीतरी भजनीमंडळात सांगितलं. तेव्हा तिने लक्ष दिलं नाही. पण गेले २-३ दिवस नवीन टर्म्स आणि कंडिशन्स एकसेप्ट नाही केल्या तर व्हाट्स ऍप बंद होणार असे कमीत कमी १० मेसेजेस तिला वेगवेगळ्या ग्रुप वर आले.  रोज मंदिरात, संध्याकाळी कट्ट्यावर दुसरा विषय नाही गेले दोन दिवस. आणि मग मात्र तिला पटलं की आता व्हाट्स ऍप खरंच बंद होणार. मोबाईल च्या बाबतीत हुकमी एक्का म्हणजे नातू. पंच्याहत्तरीला ५ वर्षांपूर्वी त्यानेच तर बाबांच्या मागे लागून तिला स्मार्ट फोन घेवून दिला होता. संसार, माहेर, नातवंड यांच्या ग्रुप वर तिला एड करून दिलं. “स्नेहमंडळ” नावानी तिच्या मैत्रिणींचा ग्रुप करून दिला. आणि बघता बघता म्हातारी स्मार्ट आजी झाली. आता तर ती ५ ग्रुप ची ऍडमिन होती. दिवसाचे ३-४ तास बरे जायचे. आणि आता व्हाट्स  अँप बंद होणार. २ दिवसापासून ती बैचैन होती. त्यात हुकमी एक्क्याची नेमकी परीक्षा. बंडू पेपर संपवून आला आणि आजीने त्याच्या ताबा घेतला.

आजी : “बंड्या तुला काही चहा / कॉफी हवंय का? माझं एक काम आहे तुझ्याकडे. ते व्हाट्स ऍप बंद पडणार आहे. ते त्याच्या काय टर्म्स कंडिशन्स आहेत ते मंजूर कर. त्याचे काही पैसे-बैसे असतील तर ऑनलाईन भर. मी तुला लगेच देते आणि वर तुझी १०० रु करणावळ.”

बंड्या : “ते आधीचे १०००० राहिले आहेत.”

आजी : “गप रे मेल्या. या वेळी नक्की देईन पण ते तुझं काय ते डाउनलोड, इन्स्टॉल कर.  तो तुझा “झबलं बर्गर” काय परवानगी मागेल ती देऊन टाक.”

बंड्या :  “आजी, “झबलं बर्गर ” नाही गं, “मार्क झुकेरबर्ग ”

आजी : “हा..तेच ते…तू आधी मला ते काय ते करून दे..माझं व्हाट्स ऍप बंद नाही झालं पाहिजे.”

बंड्या : “पण आजी, तुला काही तुझ्या प्रायव्हसी ची काळजी आहे का नाही.”

आजी : “डोम्बल्याची प्रायव्हसी. अरे लग्न झालं तेव्हा दोन खोल्यांचा संसार. बाहेर मामंजी आणि सासूबाई. अशात सुद्धा ७ वर्षात ४ मुलं झाली. मला नको सांगू त्या प्रायव्हसी चं कौतुक. दे त्याला मान्यता.”

आजीच्या स्पष्टवक्तेपणाने आजची तरुण पिढीही क्लीनबोल्ड झाली. तरी पण स्वतःला सावरून बंड्याने आजीला समजावण्याचा प्रयत्न केला.

बंड्या : “आजी तशी प्रायव्हसी नाही, तुझ्या माहितीची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी. पण तुला नक्की काय होतंय ते कळलंय का? तो तुझा “झबलं बर्गर” तुझे मेसेजेस वाचणार आणि वापरणारही.”

आजी : “मग वाचू देत की, त्यात काय बिघडलं. मी तुझ्या एवढी होते तेव्हा आमच्या वाड्यातल्या कित्येकांची पत्रे तो पोस्टमनच वाचून दाखवायचा. ते सुद्धा जाहीररीत्या. वाड्यातल्या चौकात.  अरे तुझे आजोबा २ वर्ष नोकरीला मुंबई ला आणि मी नगरला एकटीच. महिन्याला मनिऑर्डर यायची. तो पोस्टमन दारातूनच ओरडत यायचा. “वाहिनी या महिन्याला १०० ची आली”. सगळ्या वाड्याला कळायचं. अरे ६ महिन्यांनी १०० चे १५० झाले आणि त्या खडूस मालकांनी भाडं वाढवलं बघ.  अरे तुझ्या बापाच्या वेळेला माझ्या बाबांनी तार केली तर तो शहाणा तारवाला येताना पेढे घेऊन आला. वाड्याच्या चौकात सगळ्यांना बोलावून आनंदाची बातमी दिली. मग आजोबांच्या हातात तार दिली आणि पेढ्याचे ५ रुपये मागितले.

वाचुदे त्या बर्गरला माझी माहिती, काही बिघडत नाही. आणि वाचून काय वाचणार “गुड मॉर्निंग”, “गुड इव्हनिंग”, “गुड नाईट”. फॉरवर्ड केलेल्या कविता, काही  लेख, शुभेच्छा आणि सांत्वन. काय मेला फरक पडतो. उलट त्या तुझ्या “झबलं बर्गर” च्या ज्ञानात जरा भर पडेल.”

आजीला व्हाट्स ऍप हवंच होत. तिच्या कडे सगळ्याची उत्तर होती. तरीपण बंड्याने अजून एक प्रयत्न करायचा ठरवलं.

बंड्या : “आजी तसं नाही. तो तुझी माहिती नुसती  वाचणार नाही.  वापरणार सुद्धा.  म्हणजे विकणार सुद्धा.”

आजी : “विकूदे  विकलीतर.  त्यालाही संसार आहे. बायका, पोरं असतील. मिळाले चार पैसे माझ्या माहितीतून तर मिळूदेत त्या बिचाऱ्या ‘बर्गर” ला. नाहीतरी इतके दिवस व्हाट्स ऍप फुकट देतोय बिचारा. असा माणूस मिळत नाही हो. अरे तो तुझा देव सुद्धा तपश्चर्या केल्याशिवाय आशीर्वाद देत नाही. मिळवले चार पैसे तर कुठे बिघडलं. पण का रे बंड्या तो ती माहिती वापरणार कशी आणि पैसे कसे मिळवणार.?”

बंड्याला परत आशेचा थोडा किरण दिसला.

बंड्या : “हे बघ आजी म्हणजे..आता तू पर्वा निताताई ला शुभेच्छा पाठवल्यास ना डोहाळजेवणाच्या. तो मार्क झुकेरबर्ग आता त्या नीता ताईचा नंबर इन्शुरन्स कंपन्यांना देणार आणि त्या बदल्यात पैसे घेणार.  मग त्या इन्शुरन्स कंपन्या बरोबर १-१.५ वर्षांनी निताताईला “चिल्ड्रेन्स प्लॅन” विकणार. म्हणजे तसा प्रयत्न करणार त्यातून त्यांना पैसे मिळणार. किंवा तू राहुल दादा ला परवा मेसेज केलास ना “घर असावं घरा सारखं..नकोत नुसत्या भिंती…”त्यावरून ते अंदाज लावणार की राहुल दादाने नवीन घर घेतलं आहे. मग राहुलदादाचा नंबर ते बँकांना देणार आणि मग बँका त्याला लोन हवंय का..आमच्या ह्या स्किम आहेत म्हणून फोन करणार. असं गौडबंगाल असतं त्या मागे.”

आजी : “एवढच ना. मग काही प्रॉब्लेम नाही. कोणी काही विकेल रे पण आपल्या गरजा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत ना.  अंथरूण पाहून पाय पसरावेत. किंवा तुझ्या भाषेत उंटांचा मुका घ्यायला जाऊ नये. आणि समजा आले माझ्याकडे काही विकायला तर येवू देत. अरे बोहारीण पण कधी माझ्या वाट्याला गेली नाही. मुकाट मी दिलेल्या कपड्यात मागितलेलं भांड द्यायची. हे काय गंडवतात मला. तू कर रे ते नवीन व्हाट्स ऍप  इन्स्टॉल बिनधास्त कर. माझी जबाबदारी”

आणि बंडया ते FB काय असतं रे? सगळ्या व्हाट्स ऍप च्या त्या मेसेज मध्ये FB चा पण उल्लेख होता म्हणून विचारले.

बंड्या : “अग ते दोघे भाऊ भाऊ आहेत असं समज. FB हा व्हाट्स ऍप सारखा दुसरा कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आहे किंवा तुझ्या भाषेत सोशिअल-मिडिया. आता FB ने व्हाट्स ऍप ला विकत घेतलंय आणि ते म्हणतात की आपण आपापल्याकडची माहिती एकमेकांना शेअर करायची.”

आजी : “भाऊ -भाऊ च ना.  एकाच घरचे तर आहेत. कुठे बिघडलं माहितीची देवाण घेवाण केली तर. द्यावं रे बाबा..मोकळ्या मनाने आणि सढळ हाताने द्यावं.  म्हणजे समोरचा पण विश्वासाने आणि कृतज्ञतेने वापरतो. माझी आई सांगायची मला. असो. पण बंड्या त्या FB वर पण नवीन अकाऊंट काढावं लागतं का ? का अजून एक फोन घ्यावा लागेल??”

बंड्याने पुढचा धोका ओळखला आणि आजीला म्हणाला.

बंड्या : “तुला सांगितलं ना की दोघं, व्हाट्स ऍप आणि FB एकाच घरचे आहेत. एका ठिकाणी अकाउंट असलं की ते दुसरीकडे काढू देत नाहीत. नाहीतर तू बसशील स्वतःशीच बोलत या अकाउंट वरून त्या अकाउंट वर.”

हे मात्र आजीला पटलेलं दिसलं.

आजी : “भलता चलाख आहे रे तुझा “झबलं बर्गर”. हुशार दिसतोय. चांगला खोडा घालून ठेवला. पण मग तुझी ती “स्वीटू” तुला व्हाट्स ऍप वर मेसेज पाठवते आणि तू त्या “स्वीथ्री” बरोबर FB वर कनेक्ट असतोस ते कसं”

बंडया : “आजी माझ्या क्लास ची वेळ झाली, हा प्रश्न तू दीदी ला विचार.”

आणि बंड्या पसार झाला पण आता बहुदा त्यालाही क्लॅरिटी आली होती… व्हाट्स ऍप वरून स्विच व्हायचं का नाही.

होप, हे वाचून तुम्हाला पण येईल.

योगिया From Facebook

                                                                           (श्री योगेश गोखले यांच्या फेसबुक वॉलचे सौजन्याने)
© श्री योगेश गोखले 

ईमेल – [email protected]

मोबा. – ९८८१९ ०२२५२

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments