डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५१ – दानशूर जॉन डी रॉकफेलर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मॅडम कॅल्व्हे  स्वामी विवेकानंद यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे पुढचे आयुष्य बदलून गेलेले दिसते .कुठल्याही अडीअडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी, दु:खाच्या वेळी माणसाला योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आधार वाटतो आणि त्यातून तो सावरायला मदत होते, बाहेर पडायला मदत होते. एव्हढच काय, सर्व काही चांगलं असताना सुद्धा योग्य दिशा तर हवीच ना? तशी योग्य मार्गदर्शन करणारी, योग्य माणसंही आपल्याला माहिती हवीत. आजच्या काळात ती असायलाही हवीत.  

स्वामीजी शिकागो मध्ये इतर ठिकाणी ही फिरत होते. त्यांच्या संपर्कात वेगवेगळी माणसे येत होती. एव्हाना परिषदेपासून त्यांची चांगलीच प्रसिद्धी झाली होती.स्वामीजींच्या भेटीतून आपल्याला चांगले तत्वज्ञान समजू शकते, त्यांच्या चांगल्या विचारांनी योग्य दिशा मिळू शकते असा विश्वास तिथल्या लोकांमध्ये निर्माण झाला होता.जे जे त्यांना भेटत, त्यांच्या विचारात बदल होत असे.

अशीच एका धनवंताची भेट स्वामीजिंबरोबर झाली. ते होते जॉन डी. रॉकफेलर.( जन्म-८ जुलै १८३९ मृत्यू २३ मे १९३७) मोठे व्यावसायिक होते. तेलसम्राट म्हणून ओळखले जात होते.

रॉकफेलर घराणे हे  प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपतींचे दानशूर घराणे. आधुनिक खनिज तेल उद्योगाचा विकास करण्याचा, त्याचप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावर परोपकारी व जनहितकारक कृत्ये करण्याचे श्रेय या उद्योगसमूहाला जाते. विशेषत: अमेरिकन वैद्यकशास्त्राला आधुनिकीकरणाचा साज देण्याचे कर्तृत्व या घराण्याचे आहे. जॉन हे या घराण्यातील पहिले उद्योगपती, Standard Oil उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेलउद्योगाचा संस्थापक. शिक्षण पूर्ण केल्यावर १८५९ मध्ये क्लार्क यांच्या भागीदारीत दलालीचा धंदा सुरू केला. १८५९ मध्ये अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया च्या टायटसव्हील मध्ये जगातली पहिली तेल विहीर खोदली गेली. १८६३ मध्ये जॉन यांनी ‘अँड्रूज, क्लार्क अँड कंपनी’ स्थापन करून तेलशुद्धीकरण उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी ‘रॉकफेलर अँड अँड्रूज कंपनी’ स्थापन केली. १८८२ मध्ये ‘Standard Oil Trust’ या मोठ्या उत्पादनसंस्थेची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या नियंत्रणाखाली अमेरिकेतील ९५% तेलउद्योग, लोहधातुकाच्या खाणी, लाकूड कारखाने, वाहतूक उद्योग यांसारखे अनेक उद्योग होते.

जॉन यांनी १८९५ च्या सुमारास Standard Oil Company चे दैनंदिन व्यवस्थापन आपल्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास प्रारंभ केला होता. तेलउद्योगातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यापैकी बराचसा भाग बाजूला काढून तो लोहधातुकाच्या खाणी व न्यूयॉर्कमधील व्यापारी बँकिंग व्यवसाय या दोन अतिशय विकासक्षम उद्योगांकडे त्यांनी वळविले. मोठ्या प्रमाणावरील लोकोपकारविषयक कार्ये, हे जॉन यांच्या जीवनातील दुसरे मोठे वैशिष्ट्य होते. त्यामुळे ते तेलउद्योगापेक्षा या कार्याबद्दल अधिक ख्यातकीर्त झाले होते. हे किती विशेष म्हटले पाहिजे. आपल्याजवळील अफाट संपत्तीचा काही भाग जनकल्याणार्थ खर्च करणे आवश्यक आहे; नव्हे, ते आपले कर्तव्यच आहे, अशी त्यांची भावना होती. केवळ आपल्या वारसदारांना सर्व संपत्ती मिळणे इष्ट नसल्याचे त्यांचे ठाम मत होते. म्हणून त्यांनी अमेरिकेतील वैद्यकशास्त्र, शिक्षण तसेच संशोधन यांचा विकास व उन्नती यांकरिता लक्षावधी डॉलर खर्च केले. अनेक धर्मादाय संस्था उभारून त्यांचे संचालन सुयोग्य विश्वस्तांच्या हाती ठेवले व त्यांच्या दैनंदिन कार्यवाहीसाठी लोककल्याणाची तळमळ व आस्था असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमले. अशा संस्थांद्वारा जॉन यांनी सुमारे साठ कोटी डॉलर रकमेचा विनियोग केला. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमधील अतिशय हलाखीची शैक्षणिक अवस्था सुधारण्यासाठी ‘जनरल एज्युकेशन बोर्ड’ हे मंडळ व ‘शिकागो विद्यापीठ’ या दोन्ही संस्था त्यांच्या प्रचंड देणग्यांमधून स्थापन झाल्या.पुढेही शिकागो विद्यापीठास त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत सुमारे आठ कोटी डॉलर देणगीरूपाने दिले.

जॉन यांनी १९०२ मध्ये स्थापन केलेल्या ‘General Education Board’ या शैक्षणिक मंडळाचा अमेरिकेतील शिक्षणाचा वंश, धर्म, जात, लिंग यांचा विचार न करता विकास करणे हे उद्दिष्ट होते. १९५२ अखेर या मंडळाने आर्थिक अडचणीमुळे आपले कार्य थांबविले. पन्नास वर्षांच्या कालखंडात महाविद्यालये व विद्यापीठे, वैद्यकीय शाळा, शैक्षणिक संशोधन प्रकल्प व शिष्यवृत्त्या अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी मंडळाने पैसे खर्च केले. १९०१ मध्ये रॉकफेलर वैद्यकीय संशोधन संस्था न्यूयॉर्कमध्ये स्थापण्यात आली. आरोग्यशास्त्र, शस्त्रक्रिया, वैद्यक व तदनुषंगिक शास्त्रे यांच्या संशोधन कार्यात मदत, रोगांचे स्वरूप, कारणे व निवारण या कार्यात मदत व संशोधन आणि यांविषयी झालेल्या व होणाऱ्या संशोधनाचा व ज्ञानाचा सार्वजनिक कल्याणार्थ प्रसार करणे अशी या संस्थेची उद्दिष्टे होती. पुढे याच संस्थेचे रॉकफेलर विद्यापीठामध्ये रूपांतर करण्यात आले. जगातील मानवजातीच्या कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉकफेलर प्रतिष्ठान या लोकोपकारी संघटनेची १४ मे १९१३ रोजी स्थापना करण्यात आली.

जॉन यांचे सुरूवातीचे दिवस –

खरं तर जॉन अमेरिकेतल्या न्यूयॉर्क जवळील रिचफोर्ड या खेड्यात राहणारा सर्व सामान्य कुटुंबातला मुलगा होता. वडीलही पोटापाण्यासाठी साधं काहीतरी काम करायचे, जॉन मोठा झाल्यावर गावच्या बाजारात भाजी, अंडी असे विकू लागला.मग पुस्तकाच्या दुकानात काम करू लागला. थोडे पैसे साठवून पेनसिल्वेनिया मध्ये जाऊन नगरपालिकेच्या रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरविण्याच काम करू लागला. इथे थोड स्थैर्य मिळालं. इतर गावातही रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरवण्याचे काम प्रयत्न करून मिळवलं. यातून तेलाचं महत्व ओळखून जॉन बरेच काही शिकला होता आणि भविष्यात ज्याच्याकडे तेल त्याचेच हे जग हे त्याने ओळखले. मग ऑइल रिफायनरीत पैसे गुंतवले. तेल विहीरींचे पीक आले. आणि बुडीत तेलविहीर कंपनी रॉक फेलर ने लिलावात विकत घेतली. ती म्हणजेच स्टँडर्ड ऑइल. आता जॉन च्या हातात सगळ आलं. तेलाच्या ऑर्डर मिळत होत्या. त्याला रिफायनारीची जोड दिली. तेल साठवण्यासाठी पत्र्याचे डबे लागत त्याचाही कारखाना स्वत:च घातला. एका राज्यातून हे डबे वाहतूक करायला स्वत:चे  टँकर्स बनवले. पुढे रेल्वे वॅगन ची गरज होती तेही तयार केले आणि त्या वॅगन, ने आण करण्यासाठी स्वत:चा रेल्वे मार्गही टाकला . इतकी मेहनत करून आपल साम्राज्य त्याने उभ केलं होत. सदैव सैनिका पुढेच जायचे या चालीवर …..  हा जॉन पुढे पुढे जातच होता, प्रगती करत होता.  

 एव्हढं माहिती करून देण्याचं कारण म्हणजे इतका हा प्रगती केलेला, श्रीमंत झालेला माणूस एका हिंदू तत्वज्ञानाच्या संपर्कात आल्यावर त्याचे मन कसे परिवर्तन होऊ शकते त्याचं हे उदाहरण आहे. तेही परदेशात हे विशेष.

रॉकफेलर यांचे एक व्यावसायिक सहकारी मित्र होते, त्यांच्याकडे स्वामीजी राहत असताना ते जॉन यांना आग्रह करीत की, ‘एकदा स्वामी विवेकानंदांना तुम्ही भेटा’. पण जॉन स्वाभिमानी होते, त्यांना कुणी सुचवलेले मान्य होत नसे. पण एकदा अचानक त्यांच्या मनात आले विवेकानंदांना भेटायचे आणि म्हणून, ते स्वामीजींना भेटायला त्या सहकार्‍याकडे पोहोचले. कुठलाही शिष्टाचार न पाळता जॉन सरळ विवेकानंद यांच्या खोलीत गेले. स्वामीजी त्यांच्या खोलीत योग अवस्थेत बसले होते. त्यांनी मान सुद्धा वर केली नाही. पाहिले नाही. जॉन बघतच राहिले. थोडा वेळ गेल्यानंतर, स्वामीजी म्हणाले, “तुम्हाला जी संपत्ती मिळाली आहे, ती तुमची नाही. तुम्ही केवळ एक माध्यम आहात. तुम्ही लोकांचं भलं करावं. इतरांना सहाय्य करण्याची, त्यांचं कल्याण करण्याची संधी तुम्हाला मिळावी, म्हणून ईश्वराने ही संपत्ती तुम्हाला दिली आहे”. हे ऐकून मनातून दुखावलेले रॉकफेलर तडक घरी आले ते हा विषय डोक्यात घेऊनच. एक आठवड्याने पुन्हा ते स्वामी विवेकानंद यांना भेटायला गेले. तेंव्हाही स्वामीजी योग अवस्थेतच बसलेले होते. रॉकफेलर यांनी एक कागद स्वामीजींपुढे टाकला. त्यावर, आपण एका सार्वजनिक संस्थेला भरघोस देणगी देण्याचे ठरविले आहे असे लिहिले होते.आणि म्हणाले,आता यामुळे तुमचे समाधान होईल आणि त्यासाठी तुम्ही माझे आभार मानायला हवेत. विवेकानंद यांनी कागदावरून शांतपणे नजर फिरवली पण वर पाहिले नाही आणि म्हणाले, “ठीक, यासाठी तुम्ही मला धन्यवाद द्यायला हवेत”. मनस्वी असलेले रॉकफेलर यांची ही पहिली मोठी देणगी होती. विशेष म्हणजे, १८९५ पासून त्यांच्या गाजलेल्या कल्याणकारी निधींचा प्रारंभ झाला. म्हणजे एका क्षणी स्वामीजींच्या भेटीत लोकांसाठी आर्थिक सहाय्य करावं या सूचनेचा राग आलेले रॉकफेलर यांनी आता कल्याणकारी निधिला सुरुवात केली हा मोठा बदलच होता. पुढे त्यांच्या मानव सेवा कार्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, “मानवी जीवनात केवळ पैशाचा संग्रह करत बसण्यापेक्षा मोलाचं असं काहीतरी आहे, संपत्ती हा माणसाच्या हातात असलेला केवळ एक विश्वस्त निधि आहे त्याचा त्याचा अयोग्य पद्धतीने वापर करणे हे पाप आहे. जीवनात अखेरच्या क्षणाला उत्तम प्रकारे सामोरं जाण्याची तयारी करणं म्हणजेच सतत दुसर्‍यासाठी जगत राहणं होय आणि ते मी करतो आहे”. हाच होता स्वामीजींच्या संपर्काचा प्रभाव.

रॉकफेलर घराण्याने वैद्यक, शिक्षण, कला, सांस्कृतिक घडामोडी इत्यादी क्षेत्रांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक साह्य देऊन मानवजातीचे कल्याण व विकास अव्याहत होत राहील यासाठी प्रतिष्ठाने व विविध निधी उभारून दानशूरतेचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे.

असे अनेक लोक स्वामीजींना भेटत होते. परिषद संपल्यानंतर पावणेदोन महीने आसपासच्या गावांमध्ये त्यांची व्याख्याने पण झाली. त्यांनी व्याख्यानांसाठी एक करार केला होता. स्लेटन लायसियम ब्यूरो या संस्थेशी तीन वर्षांचं करार केला की त्यांनी व्याख्याने द्यायची त्या बदल्यात स्वामीजींना पैसे दिले जातील. असे केल्यास पैसा जमवून तो भारतातल्या कामासाठी उपयोगी पडेल असे स्वामीजींना पटवण्यात आले होते. दौर्‍यातील पहिले व्याख्यान झाल्यावर स्वामीजींना 100 डॉलर्स देण्यात आले. त्यामुळे असा कार्यक्रम सुरू झाल्याने स्वामीजींची धावपळ, सतत प्रवास, मुक्काम सुरू झाले. दमछाक झाली. करार झाल्यामुळे तो एक व्यापार झाला होता ते अनुषंगुन  काम करणे भाग होते आणि हे आपल्याला शक्य नाही असे अनुभव घेतल्यानंतर स्वामीजींच्या लक्षात आले.

दौरा ठरविणारी ब्यूरो व्यवसाय म्हणून त्याकडे बघत असते. जाहिरात, वृत्तपत्रे प्रसिद्धी, व्याख्यानांचे भित्तिपत्रके असा दिनक्रम स्वामीजींना नकोसा झाला. यावेळी मेंफिस इथं आठवडयाभरचा मुक्काम झाला आणि स्वामीजी सुखावले.१३ ते २२ जानेवारी १८९४ मध्ये ते मेंफिसला थांबले.हयू एल ब्रिंकले यांचे पाहुणे म्हणून ते मिस व्हर्जिनिया मून यांच्या निवासगृहात उतरले होते. त्या नुसते निवासगृह चालवीत नव्हत्या तर गोरगरिबांना सढळ हाताने मदत करणे हे ही काम करत. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे त्या मेंफिस मध्ये प्रसिद्ध होत्या. इथे त्यांची दोन व्याख्याने झाली. मेंफिसला जरा त्यांना शांतता लाभली. इथे पत्रकारांनी वृत्तपत्रासाठी  मुलाखती घेतल्या, वेगवेगळ्या लोकांच्या घरी भेटी,परिचय, चर्चा झाल्या.  स्वामीजींच्या विचारांनी पत्रकार सुद्धा भारावून गेले होते.

वुमेन्स कौन्सिल मध्ये १६ जानेवारीला मानवाची नियती या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यात ते म्हणाले, “ परमेश्वराची भीती वाटणे हा धर्माचा प्रारंभ आहे. तर त्याच्याविषयी प्रेम वाटणे ही धर्माची परिणती आहे. मानवाचं मूलभूत पाप या सिद्धांतात वाहून जाऊ नका. जेंव्हा अॅडमचा अध:पात झाला, तेंव्हा तो पवित्रतेपासून झाला. त्याच्या पावित्र्याला ढळ पोहोचला,हे पतनाचे कारण. तेंव्हा मूळ आहे ते पावित्र्य. पतन नंतरचं आहे”. हे त्यांचे उद्गार श्रोत्यांची मने हेलावून गेले.मेंफिस च्या आठ दिवसाच्या मुक्कामात कळत नकळत स्वामीजींनी लोकांच्या मनात अध्यात्मिकतेच्या विचारांचे बीज पेरले होते. सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन मेंफिसहून स्वामीजी शिकागोला परत आले . तीन आठवडे राहिल्यानंतर, तिथून ते  डेट्रॉईटला आले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments