डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 58 – ग्रीनएकर ची रिलीजस कॉन्फरन्स ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नव्या सूर्याच्या चैतन्याने विवेकानंद पुन्हा ताजेतवाने झाले. उदात्त जीवनाकडे घेऊन जाणारे विचार व्याख्यानातून ते मांडतच होते. परिचित व्यक्तींच्या आग्रहाखातर त्यांचे वेगवेगळ्या व्यक्तींकडे वास्तव्य होत होते. शिकागोहून ते आता ग्युएर्न्सी यांच्याकडे न्यूयॉर्कला आले. एव्हढ्या या विचारांच्या लढाईत विवेकानंद यांना आपल्या हिंदू धर्माबद्दल कुणी काहीही चांगले लिहिलेले कुठे दिसले, तर ते अत्यंत आनंदी होत असत. त्यांच्या वाचनात एक ख्रिस्त धर्मीय व्यासंगी, संस्कृत भाषेचा अभ्यास असलेले डॉ.मोनियर विल्यम्स यांना हिंदू धर्म कसा दिसतो ते वाचायला मिळाले. ते त्यांनी पत्रातून मिसेस हेल यांना कळविले आहे. त्यात आहे, “हिंदूधर्माचा विशेष असा आहे की त्याला कोणाही परधर्मीयाला आपल्या धर्मात आणण्याची गरज वाटत नाही आणि तसा कोणताही प्रयत्न तो करीत नाही, हिंदू धर्म सर्वांचा स्वीकार करणारा, सर्वांना जवळ घेणारा आणि सर्व आपल्या ठायी सामावून घेण्याइतका व्यापक आहे. सर्व प्रकारच्या मन:प्रवृत्तीच्या माणसांना मानवेल असे काहीतरी देण्यासारखे या हिंदू धर्माजवळ आहे. मानवी मन, त्याचे स्वरूप आणि प्रवृत्ती यामध्ये जी अमर्याद विविधता आढळते तिच्याशी जुळवून घेण्याची तेव्हढीच अमर्याद अशी जी क्षमता आहे ते त्याचे खरे खुरे सामर्थ्य आहे”. विल्यम पुढे म्हणतात, “नेमके बोलायचे झाले तर, स्पिनोझाचा (डच फिलॉसॉफर,जन्म १६३२ मृत्यू १६७७) जन्म होण्याआधी दोन हजार वर्षे हे हिंदू, स्पिनोझाच्या विचारांचे पुरस्कर्ते होते. डार्विनच्या(जन्म १८०९ मृत्यू १८८२, इव्होल्यूशन सिद्धांत मांडला) जन्माआधी अनेक शतके त्याच्या सिद्धांताचा स्वीकार करणारे होते आणि आताच्या आपल्या काळातील हक्सले (बायोलोजिस्ट -जन्म-१८२५ मृत्यू-१८९५) यांचे विचार मान्य करणार्‍यांच्या शेकडो वर्षे आधी हे हिंदू, उत्क्रांतीवादी होऊन गेले होते किंवा त्यांनी तसे केले त्यावेळी उत्क्रांती या शब्दातील अर्थ व्यक्त करणारा शब्द देखील जगातील कोणत्याही भाषेत नव्हता”. असे सगळे वर्णन वाचून विवेकानंद यांना डॉ. मोनियर विल्यम्स यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे कौतुक वाटले. कारण एका प्रज्ञावंताचे ते निरीक्षण होते. हा आनंद झाला म्हणूनच त्यांनी हेल यांना हे पत्र लिहून कळवलं.

आता विवेकानंद न्यू यॉर्क जवळच्याच फिशिकल येथील हडसन नदीच्या काठावर असलेल्या ग्युएर्न्सी यांच्या निवासस्थानी राहायला आले होते. इथे त्यांना मन:शान्ती मिळाली होती. याच काळात एक दखल घेण्यासारखी घटना घडली. आपले गाव सोडून आपण परक्या शहरात किंवा गावात गेलो असू आणि तिथे कुणी आपल्या गावचे भेटले तर आपल्याला जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. त्याच्या बद्दल आपल्याला आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो. सर्वधर्म परिषदेत विवेकानंद यांना एक नरसिंहाचारी म्हणून भारतीय तरुण भेटला होता. तिथे तो वाईट संगतीत राहून भरकटला होता. अधून मधून तो विवेकानंद यांना भेटत असे आणि काही मदत मागत असे. पण हे सर्व बघून विवेकानंद फार दुखी झाले. त्याला आपल्या देशात- भारतात- परत पाठवणे योग्य आहे असा विचार स्वामीजींनी केला. मग त्यांनी अलसिंगा यांना पत्र लिहून कळवले आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी करायला सांगितली. त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याची घरी जाण्याची व्यवस्था केली. तो भारतात सुखरूप पोहोचला, हे सर्व श्रेय विवेकानंद यांचेच. एक भारतीय तरुण परदेशात भुकेला आणि अनाथ राहू नये असे विवेकानंद यांना वाटले होते.

विवेकानंद यांची पुढची भेट इंग्लंडला व्हावी असे एकाने सुचविले होते पण जगन्मातेचा आदेश आल्याशिवाय स्वामीजी थोडेच जाणार? पण सर्वत्र व्याख्याने दौरे, संभाषणे चर्चा मुलाखती असे भरपूर होत होते. आता विवेकानंद यांना वाटत होतं की, प्रत्यक्ष काहीतरी काम इथे सुरू व्हायला हवे. न्यूयॉर्क संस्थानात मिस फिलिप्स यांची कुठेतरी रम्य अशी जागा आहे, असे त्यांना कळले होते आणि तिथे आपण हिमालय उभा करू आणि आश्रमाची स्थापना करू असा विचारही त्यांच्या मनात आला होता. मनात असा विषय येणं ही सकारात्मकता निर्माण झाली होती ती मनस्थिती ठीक झाल्यामुळेच .

याच दरम्यान  ग्रीनएकर इथले एक आमंत्रण मिळाले. एक वेगळ्या प्रकारचा मेळावा आयोजित केला गेला होता. २७ जुलैला  विवेकानंद ग्रीनएकर इथे मेळाव्यासाठी पोहोचले. दोन दिवस आधी मनात जी आश्रमाची कल्पना आली होती तसाच रम्य परिसर इथे योगायोगाने होता. फार्मर यांच्या मालकीची ग्रीन एकर मेन संस्थानात इलीयटजवळ खूप मोठी जमीन होती.  

इथे असे नव्या नव्या कल्पना त्यांना पाहायला आणि अनुभवायला मिळत होत्या. सर्व धर्म परिषद असो, कोलंबियन औद्योगिक प्रदर्शन कल्पना असो, आता हा ग्रीनएकरचा मेळावा सुद्धा एक वेगळीच संकल्पना होती. एखादी कल्पना मनात आली की ती प्रत्यक्षात यशस्वी करण्यासाठी आवश्यक कष्ट घेऊन नियोजन करणे हे पाश्चात्यांचं वैशिष्ट्य स्वामीजींना फार फार भावल होतं. सर्वधर्म परिषदेच्या धर्तीवर वर्षभरातच हा मेळावा आयोजित केला होता. ही कल्पना होती मिस सारा जे.फार्मर यांची. सर्व धर्म परिषद ही औपचारिक होती. तिथे व्याख्याने देऊन सर्व जण आपापल्या स्थानी परत गेले होते. पण आता तसे नव्हते. धर्माची निरनिराळी मते असणार्‍या सर्व व्यक्तींनी पंधरा दिवस एकत्र राहावे, कुठलीही कार्यक्रमाची चौकट असू नये. मुक्त संवाद व्हावा, मोकळेपणाने संभाषण व्हावे आणि सर्वांना मुक्त प्रवेश. सारा फार्मर यांची अशी अभिनव कल्पना स्वामीजींना आवडलीच.

फार्मर यांच्या मालकीची मोठी जागा होती तिथे हिरवेगार शेत, जवळच वाहणारी नदी, सुसज्ज विश्रामगृह, छोटी छोटी स्वतंत्र निवासस्थाने, बाजूलाच पाईन वृक्षाचे जंगल असा शांत आणि निसर्गरम्य परिसर . शिवाय परिसरात तंबू, त्याला नाव होते हॉल ऑफ पीस /शांतिमंदिरउभे केलेले. कोणी कुठेही रहा, इथे कुठलीही मूर्तिपूजा नव्हती फक्त वैचारिक कार्यक्रम होणार होता. परस्परांना समजून घ्यावे, एकमेकांशी बोलावे, सामूहिक चर्चा करावी, गप्पा गोष्टी माराव्यात, इच्छा असेल तर शांत व निवांत बसावे, असा एकूण विषय होता. सतत औपचारिक व्याख्याने देऊन स्वामी विवेकानंद कंटाळले असताना अशी निसर्गात शांत राहण्याची संधी मिळाली म्हणून ते प्रसन्न झाले होते. इथे ग्रीनएकर मध्ये ख्रिस्त धर्मातील विविध पंथाचे प्रतिनिधी, बुद्धिमंत व विचारवंत सहभागी झाले होते.

डॉ. एडवर्ड एव्हरेट हेल, मिस जोसेफाईन लॉक, अर्नेस्ट  एफ.फेनोलेसा, फ्रॅंकलिन बी. सॅनबोर्न, मिसेस आर्थर स्मिथ, मिसेस ओली बुल, गायिका मिस एम्मा थर्स्बी, हे उपस्थित होते. रोज सकाळचे प्रमुख भाषण झाले की जो तो आपल्याला हव्या त्या विषयाकडे वळे, वक्ता आणि श्रोता यांच्यात अनौपचारिक नाते असे. पाईन वृक्षाखाली व्याख्याने चालत. विवेकानंद याच्या भोवती खूप जण गोळा होत आणि त्यांचे आध्यात्मिक विचार तन्मयतेने ऐकत असत. इथे श्रोत्यांना वेदान्त विचारांचा लाभ होत असे. सर्व धर्म सामावून घेणारा धर्मनिरपेक्ष हिंदू धर्म ते सांगत असत. त्यासाठी ते उपनिषद, भगवतगीता, अवधूतगीता, भतृहरी, संत मीराबाई, शंकराचार्यांचे निर्वाणषटक यातील दाखले देत असत. सर्व श्रोते एकरूप होऊन जात आणि विवेकानंद त्यांच्याकडून चिदानंदरूप: शिवोहम!  शिवोहम!  हे चरण आळवून घेत, हे म्हणत म्हणतच श्रोते आपल्या स्थानी परतत असत. जिथे बसून पाईन वृक्षाखाली विवेकानंद यांनी व्याख्यान दिले होते तो पाईन वृक्ष पुढे विवेकानंद यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. हा ग्रीन एकरचा उपक्रम पुढे काही वर्ष चालू होता. नंतर याच वृक्षाखाली बसून सारदानंद आणि अभेदानंद यांनी तिथे प्रवचन दिले होते.

‘हॉल ऑफ पीस’ मध्ये म्हणजे तंबू मध्ये विवेकानंद यांचे स्वतंत्र व्याख्यान झाले होते. त्याला मिसेस बुल उपस्थित होत्या. विवेकानंद यांनी मुख्य धडा दिला की, “सर्व धर्माच्या प्रेषितांचा आपण मान ठेवला पाहिजे. त्यांच्या शिकवणुकीचा आदरपूर्वक अभ्यास केला पाहिजे, त्या त्या धर्माच्या अनुयायांनी हे जपले पाहिजे की, आपल्या वर्तनामुळे,आपल्या महापुरुषांनी दाखवून दिलेल्या ईश्वर प्राप्तीच्या मार्गात कोणतेही किल्मिष मिसळले जाऊ नये. प्रत्येक धर्मातील दोष उणिवा आणि काही ठिकाणी भयानक असलेले भाग आपल्याला आढळतील ते भाग बाजूला ठेवावेत आणि मानवाच्या आत्मिक विकासासाठी पोषक असणारे असे एक ईश्वर, आत्म्याचे अमरत्व, सारे प्रेषित आदरार्ह आणि सारे धर्म विचारात घेण्यासारखे आहेत. या गोष्टींवर भर द्यावा. जसे एखाद्या कुटुंबात प्रत्येकाला कामे वाटून दिलेली असतात, तसेच मानव जातीच्या या कुटुंबात प्रत्येक धर्माकडे काही कामगिरी सोपविली आहे. सर्व मानवांना देण्यासारखा सत्याचा काही अंश प्रत्येक धर्माजवळ आहे त्याचा स्वीकार करा आणि तशी दृष्टी धारण करा. हीच सर्वधर्म समन्वयाची दिशा ठरेल. तिचा खरा उपयोग आहे”. अशी स्पष्ट आणि रेखीव मांडणी विवेकानंद यांनी केली असल्याचा बुल यांनी म्हटलं आहे.

ग्रीनएकरला स्वामी विवेकानंद सात-सात, आठ-आठ तास बोलत असत. असे नवे नवे आयाम विवेकानंद यांना कळत जात होते तस तसे त्यांना अमेरिकेतल्या पुढच्या कार्याची दिशा ठरवायला मदत होत होती. अशा प्रकारे ग्रीनएकरचा  कार्यक्रम छान पार पडला. आता विवेकानंद १३ ऑगस्टला ग्रीनएकरहून प्लायमाउथ आले, तिथे फ्री रिलीजस असोसिएशनच्या वार्षिक कार्यक्रमासाठी कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिन्सन यांनी निमंत्रण दिले होते. केव्हढी मानाची गोष्ट होती की, अशा वार्षिक कार्यक्रमांना प्रमुख अतिथि म्हणून स्वामीजींना बोलवले जात होते. एव्हढा लौकिक त्यांना मिळाला होता. रामकृष्ण परमहंस यांनी महासामद्धी घेऊन आता आठ वर्षांचा काळ लोटला होता. त्यांनी सांगितलेल्या कामाच्या शोधात स्वामीजी भारतात फिरल्या नंतर आता ते अमेरिकेत आले होते. त्यांनी इथवरच्या प्रवासात अनेक अनुभव घेतले, अनेक घटना घडल्या, पण त्यांचे अंतर्मन नव्या दिशेचा शोध घेतच होते. ग्रीनएकरचा त्यांचा अनुभव खूप चांगला होता. याचवेळी त्यांना, आपण आपल्या धर्माबद्दल काही लिहावे असे वाटले होते. त्यासाठी  शांतता हवी आणि वेळ सुद्धा. असे त्यांनी अलसिंगा यांना पत्रात म्हटले आहे की, “ ज्या दिवसात व्याख्याने नसतात तेंव्हा हातात लेखणी घ्यावी असे मनात आहे”. हेच त्यांनी मिसेस स्मिथ यांनाही पत्रात कळवले आणि ते सारा बुल यांच्या कानावर गेले आणि त्यांनी विवेकानंद यांना लगेच आपल्या घरी केंब्रिजला बोलावले. त्याप्रमाणे ते ऑक्टोबर मध्ये सारा बुल यांच्याकडे गेले. सारा बुल यांचे घर असलेले केंब्रिज अतिशय शांत, गर्दी नाही असे होते. तिथे त्यांनी विवेकानंद यांना स्वस्थपणे राहता येईल अशी व्यवस्था केली. सारा चॅपमन बुल. कोण होत्या त्या?… 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments