सुश्री वर्षा बालगोपाल
विविधा
☆ वेळ… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
“शब्दकळा लावती लळा”
आजचा शब्द आहे = वेळ =
वेळ एक फ्री हिट
कोणतीही स्पर्धा आपण त्या स्पर्धेसाठी वेळ काढून बघत असतो आणि काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या फरकाने कोणीतरी विजेता होतो. तेव्हा आपल्यालाही वेळेचे महत्व पटते .पण ती जिंकणार्याची जिंकण्याची वेळ असते तीच वेळ हरणार्याची हरण्याची वेळ असते. मग लक्षात येते की वेळ एकच असली तरी प्रत्येकाची वेळ वेगळी वेगळी असते.
मग वेळ लावून केलेल्या कामाला वेळ लागला म्हणायचं का वेळेत केले म्हणायचंअसं वेळेच्या बाबतीत वेळोवेळी काहीतरी वेगळेच मनात आले आणि मन वेळे बाबत विचार करू लागले.
वेळ शब्दाचा अर्थ २४ तासातील काही भाग असे म्हणता येईल. पण किती गंमत आहे पहा या वेळेची••••
वेळेच्या आधी क्रियापद लागून त्याची वेळ म्हटले तर अर्थ एक पण तेच क्रियापद नंतर लावले तर अर्थ वेगळा••••
बघा••• भरतीची वेळ,ओहोटीची वेळ,झोपेची वेळ, खायची वेळ, घ्यायची वेळ, द्यायची वेळ पण हेच उलटे केले तर?
वेळ भरली, वेळ ओसरली, वेळ झोपली, वेळ दिली/दिला ,वेळ घेतली/घेतला••••
मग विचार करताना असे लक्षात आले वेळेचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिला तर डॉक्टरेट तर मिळेलच पण तरी सगळ्या प्रकारचा सगळ्या विषयाचा वेळ , यासाठी वेळच पुरणार नाही.
आपल्या मराठी भाषेत अनेक गमतीशीर शब्द आहेत त्यापैकी सगळ्यात मजेदार शब्द मला वेळ वाटतो.
कारण तुम्ही जसे फिराल तसा वेळ फिरत राहील तुम्हाला फिरवत ठेवील आणि तुम्ही त्याला शेकडो क्रियापदे जोडू शकता असा सर्वव्यापी सर्वसमावेशक असा शब्द आहे वेळ.
या वेळेला कितीही क्रियापदे लावून वाक्प्रचार केले ना तरी सगळे वाक्प्रचार वापरले असे म्हणताच येणार नाही. थोडे शब्द फिरवून त्या वेळेची छटा बदलता येऊ शकते.
वेळ••••• असते,नसते,पळते,पाळते,देते,घेते,येत,जाते,बघते,ओळखते,बदलते,घालवते,टळते,गाजवते,रेंगाळते,झोपते,साधते,बाधते काहीही करू शकते.
वेळ••••
पहाटेची, झुंजुमुंजूची, सकाळची, मध्यान्हाची, दुपारची, संध्याकाळची, रात्रीची, एकांताची, कातरवेळ, झांझरवेळ, साजणवेळा, धुंदवेळ, वाईट वेळ, चांगली वेळ, शिळोप्याची वेळ, अंतिमवेळ किंवा•••
उठायची, बसायची, नाष्त्याची, चहाची, विधी करण्याची, जेवायची, फिरायची, विश्रांतीची ऑफिसला जायची, झोपायची अशी कोणतीही असू शकते.
वेळापूरच्या वृद्धाश्रमात रहायची वेळ आलेले वेळापुरे आजी आजोबा बोलत होते, आपले लग्न वेळेवर झाले म्हणून लेकरं बाळं वेळेत झाली. तेव्हा वेळेची तमा न बाळगता काम केले. वेळात वेळ काढून मजा केली वेळेवर उठण्यापासून ते वेळेवर झोपण्यापर्यंत वेळेचे वेळापत्रक आखून वेळेचे नियोजन केले. म्हणूनच वेळेचे गणित बसून आपण सगळीकडे वेळेवर हजर होत होतो. वेळेची चालढकल केलेली तुम्हाला चालायचीच नाही.वेळेचे पक्के होतात. तुमच्या हुषारीने कामाने तुम्ही कितीतरी वेळा ऑफिसची वेळ गाजवली होती.
आजोबा पण म्हटले हो ना तू पण मी रागवायची वेळ येऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करून वेळेचे भान ठेवत माझी एकही वेळ चुकवू द्यायची नाहीस. वेळ महत्वाची असते आणि वेळेचे महत्व तुला होते त्यामुळे सगळे सहज सोपे वाटत होते.
वेळ वाया न घालवता तू सतत कामात वेळ घालवायचीस.खूप कष्टातही हसून तू म्हणायचीस अहो वेळ सांगून येत नसते. ही पण वेळ निघून जाईलच आणि वेळ बदलून चांगली वेळ येईल. या तुझ्या सकारात्मकतेने संसाराचा वेळ कापरासारखा उडून गेला.
खरचं वेळीच मुलांना शिक्षण दिले वेळेची कदर करीत मुलांनाही वेळेचा वेळेवर तुकडा पाडायचे भान दिले. वेळेचा अपव्यय न करता वेळेचा सदुपयोग करायला शिकवले. त्यामुळे आपल्या सुखी संसाराची वेळ जमून आली होती.
तसेच वेळ आल्यावर बघू अशा बेफिकिर वृत्तीत न रहाता वेळेची मर्यादा पाळून वेळकाढूपणा न करता वेळ कोणासाठी थांबत नसते हे जाणून वेळेनुसार दिलेली वेळ पाळत वेळेच्या बंधनात राहून एकमेकांना सांभाळलं म्हणून या साथीत ५० वर्षाचा वेळ कसा गेला हे कळलच नाही.
वेळ वखत पाहून वागलं म्हणजे वेळ गेल्यावर हळहळावे नाही लागत. पण बाई वैर्यावर पण अशी वेळ येऊ नये. पण वेळ सांगून येत नाही.
अगदी खरे आहे हो. आता बघा ना एवढा वेळ मेहेरबान असताना आपल्यावर अशी वृद्धाश्रमात रहायची वेळ येईल असे वाटले तरी होते का?
आपली दोन्ही पोरं मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत म्हणून आपण भारावलो होतो. अचानक थोरल्याच्या मनात फॉरेनला जायचं खूळ आलं. नुकतीच तुमची रिटायरमेंट झाली होती. सुदैवाने मुबलक पैसा हाती होता. पण थोरल्याला लगेच फॉरेनला जायचे होते म्हणून त्याने वेळ साधून पैशाची मागणी केली. वेळ न दवडता त्याला मदत करणे वेळेत जमवायला पाहिजे होते. म्हणून वेळोवेळी केलेली गुंतवणूक , मिळालेले पैसे हे सगळे वेळेचा अभाव असल्याने हातची संधी जाउ नये वेळ गेला असे होउ नये म्हणून मी वेळीच घातलेल्या लगामाकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्याला दिली.
ते बघून धाकट्याला झोंबलं. त्यानेही तोच मार्ग धरला आणि यावेळी थोडी वेळ निराळी आहे कारण वेगळ आहे पण पैशाची नड असल्याने तुम्ही दादाला दिले तर मलाही पाहिजेत म्हणून हट्टच धरला. त्याने वेळ पाहून खेळ मांडलेला मला कळत होतं . मी काही कारणे सांगून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण त्यावेळी तुम्ही वेळ वखत पाहून नाही वागला. थोरल्याला दिले म्हणून राहिलेले धाकल्याला देऊन मोकळे झालात. तुम्ही वेळ बदलेल या विश्वासाने यावेळी आपण मदत केली तर पुढच्यावेळी ते आपली मदत करतील या भ्रमात होता.
ते किती चुकीचे होते हे उशीरा कळले पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. आपले होणारे हाल पाहून एका सद्गृहस्थाने आपल्याला या वृद्धाश्रमात आणले आणि आपल्याला डोक्याला हात लावून बसायची वेळ आली.
आजोबा म्हटले खरं आहे तुझं. वेळेमुळे कशाचे काय होईल काही सांगता येत नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आता तर आपल्याकडे वेळच वेळ आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून आपण रिटायर्ड होणार्यांना सतर्क करण्याचे काम करू. त्यामुळे आपला वेळही सत्कारणी लागेल शिवाय कालची वेळ आज नसते हे शहाणपण आपणही घेऊन याच वृद्धाश्रमातील गरजूंची आपण मदत करूया. आता तर फक्त आपल्या दोघांसाठीच आपण जगणार असल्याने एकमेकांना भरपूर वेळ देऊ या. वेळ न वखत बसली खोकत अशी गत करून तेच तेच दु:ख उगाळत बसू नको. चल दोघांनी मिळून नवी सुरूवात करू. मागच्या वेळेची अनुभूती नकोच . वेळेचे गुलाम होणेही नको. आपण आपल्या वेळेनुसार वेळेला आपल्यापुढे वाकायला शिकवू. शेवटी वेळच आपला गुरू असल्याने त्याची विद्या त्यालाच देऊ. आणि हो , आता परत उदास सूर लावण्याची वेळ नको म्हणून वेळेची एक गंमत सांगतो.
तुला सांगतो हा वेळ आहे ना एक जादूगार आहे. केव्हा काय कोणत्याक्षणी बदलेल हे सांगता येत नाही.
आता हेच बघ ना पूर्वी क्रिकेट ५- ५ दिवस टेस्ट मॅचेस मधे खेळायचे. तेवढा वेळ बघणार्याकडे असायचा. मग नंतर ३ दिवसीय मॅचवर आला कारण लोकांचा वेळ कमी झाला. तो वेळ अजून कमी झाला आणि वन डे मॅच आली. आता २०-२० म्हणजे फक्त काही तासच.
पण मजा तेवढीच उत्सुकता तेवढीच आणि कौतूकही तेवढेच. वेळ कमी आहे म्हणून माणसाने आपली करमणूक नाही कमी केली.
अगं आता आपल्या जीवनातील ५० गेली अन ५ राहिली अशी गत असताना चल आपण वेळेशीच २०- २० खेळू.
आमच्यावेळी ५ दिवसाची होती तरी आमच्यावेळीच २०-२० पण आहे. यावेळी आपण जरा वेगळी मजा घेऊ. वेळेचे चेंडू वेळेवर फ़टकावू, वेळेवर अडवू, वेळेवर झेलू . वेळेवर विकेट जाणारच आहे हे ध्यानात ठेऊन प्रत्येक वेळी मागच्या वेळपेक्षा वेगळ्या खेळाचे प्रदर्शन करू. वेळेला केळ आणि न्याहारीला सिताफळ खात
कोणत्याही वेळी टपकणारा वेळेचा चेंडू अवेळी विकेट न जाऊ देता चौकार षट्कार यांनी टोलवत राहू. वेळ बदलून क्षेत्ररक्षण करायचे तेव्हा दरवेळी चेंडू न आडवता फलंदाजालाच खेळते ठेऊ. वाटले तर तेथे थोडा वेळखाऊपणा पण करू. आपले मस्त वेळ घालवणे पाहून वेळेला रेंगाळायला लावू. आपल्याकडे थोडा वेळ आहे पण मॅच जिंकायचीच आहे म्हणून वेळेचे भान ठेवत ही वेळ पुन्हा येणार नाही म्हणून एक उनाडवेळ पुन्हा जगू या. वेळेचे भान हरपून आपण वेळेला चकवू या. वाढवेळ खेळात नसतो कधीतरी वेळ संपल्याचे वेळ सांगेलच पण त्यावेळी वेळेलाच नो बॉल म्हणून परत बॉल टाकायला लावू आणि मग त्या वेळेच्या चेंडूला फ्री हिट समजून सीमापार करू आणि नॉट आऊट राहून सामना जिंकू.
खरच वेळ एक फ्री हिट आहे त्याचा लाभ घेऊ.
हे पचवायला जरा वेळ लागेल पण वेळ बदलणे वेळेच्या हातात नाही तर तुमच्या हातात आहे हे पटवून देऊ. चल आपण वेळीच हा पायंडा पाडू.
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈