डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 66 – उत्तरार्ध – रामकृष्ण संघाची स्थापना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामी विवेकानंद कलकत्त्यात होते, बंगालमध्ये उत्साहाचे वातावरण होते, योगायोगाने श्रीरामकृष्णांचा जन्मदिवस ७ मार्च ला होता. पश्चिमेकडून विवेकानंद नुकतेच आल्यामुळे हा दिवस मोठ्या प्रमाणात दक्षिणेश्वरच्या कालीमंदिरात साजरा करण्यात आला, प्रचंड गर्दी. गुरुबंधु बरोबर विवेकानंद कालीमातेचे दर्शन घेऊन  श्रीरामकृष्णांच्या खोलीकडे वळले, ते ११ वर्षानी या खोलीत पाऊल ठेवत होते. मनात विचारांचा कल्लोळ होता. १६ वर्षांपूर्वी येथे प्रथम आल्यापासून ते आज पर्यन्त गुरु श्रीरामकृष्णांबरोबर चे दिवस, घडलेल्या अनेक घटना, प्रसंग आणि मिळालेली प्रेरणा- ते, हिंदू धर्माची पताका जगात फडकवून मायदेशी परतलेला नरेंद्र आज त्याच खोलीत उभा होता. त्यांच्या डोळ्यांसमोरून या कालावधीचा चित्रपटच सरकून गेला.

या वास्तव्यात विवेकानंद यांना अनेकजण भेटायला येत होते. काही जण फक्त दर्शन घ्यायला येत. काहीजण प्रश्न विचारात, काही संवाद साधत. तर कोणी त्यांचा तत्वज्ञानावरचा अधिकार पारखून घ्यायला येत. एव्हढे सगळे घडत होते मात्र स्वामी विवेकानंद यांना आता खूप शीण झाला होता. थकले होते ते.परदेशातील अखंडपणे चाललेले काम आणि प्रवास ,धावपळ, तर भारतात आल्यावरही आगमनाचे सोहळे, भेटी, आनंद लोकांशी सतत बोलणे यामुळे स्वामीजींची प्रकृती थोडी ढासळली . त्याचा परिणाम म्हणजे मधुमेय विकार जडला. आता त्यांचे सर्व पुढचे कार्यक्रम रद्द केले. आणि केवळ विश्रांति साठी दार्जिलिंग येथे वास्तव्य झाले.   

त्यांना खरे तर विश्रांतीची गरज होती पण डोळ्यासमोरचे ध्येय गप्प बसू देत नव्हते. कडक पथ्यपाणी सांभाळले, शारीरिक विश्रांति मिळाली, पण मेंदूला विश्रांति नव्हतीच, त्यांच्या डोळ्यासमोर ठरवलेले नव्या स्वरूपाचे प्रचंड काम कोणावर सोपवून देणे शक्य नव्हते.

मात्र हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात साग, देवदारचे सुमारे दीडशे फुट उंचीचे वृक्ष, खोल दर्‍या, समोर दिसणारी बर्फाच्छादित २५ हजारांहून अधिक उंचीच्या डोंगरांची रांग, २८ हजार फुटांपेक्षा जास्त ऊंच असलेले कांचनगंगा शिखर, वातावरणातील नीरव शांतता, क्षणाक्षणाला बदलणारी आकाशातली लाल निळ्या जांभळ्या रंगांची उधळण, अशा मन उल्हसित आणि प्रसन्न करणार्‍या निसर्गाच्या सान्निध्यात स्वामीजी राहिल्यामुळे त्यांना मन:शान्ती मिळाली, आनंद मिळाला, बदल ही पण एक विश्रांतीच होती. एरव्ही पण आपण सामान्यपणे, “फार विचार करू नकोस, शांत रहा”, असे वाक्य एखाद्या त्रासलेल्याला समजवताना नेहमी म्हणतो. पण ही मनातल्या विचारांची प्रक्रिया थांबवणे शक्य नसते. शिवाय स्वामीजींसारख्या एखाद्या ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तिला कुणीही थांबवू शकत नाही. त्यात स्वामीजींचे कार्य अजून कार्यान्वित व्हायचे होते. त्याचे चिंतन करण्यात त्यांनी मागची अनेक वर्षे घालवली होती. आता ते काम उभे करण्याची वेळ आली होती.

संस्था! एक नवी संस्था, ब्रम्हानंद आणि इतर दोन गुरुबंधु यांच्या बरोबर स्वामीजी संबंधीत विचार करून तपशील ठरवण्याच्या कामी लागले होते. येथे दार्जिलिंगच्या वास्तव्यात आपल्या संस्थेचे स्वरूप कसे असावे याचा आराखडा केला गेला. युगप्रवर्तक विवेकानंदांना आजच्या काळाला सुसंगत ठरणारी सेवाभावी, ज्ञानतत्पर, समाजहित वर्धक, शिस्त आणि अनुशासन असणारी अशी संन्याशांची संस्था नव्हे, ऑर्गनायझेशन बांधायची होती. त्याची योजना व विचार सतत त्यांच्या डोक्यात होते. ही एक क्रांतीच होती, कारण भारताला संन्यासाची हजारो वर्षांची परंपरा होती. आध्यात्मिक जीवनाचे आणि सर्वसंगपरित्याग करणार्‍या संन्याशाचे स्वरूप विवेकानंद यांना बदलून टाकायचे होते.

दार्जिलिंगहून १ मे १८९७ रोजी स्वामीजी कलकत्त्याला आले. तेथे त्यांनी श्रीरामकृष्णांचे संन्यासी शिष्य आणि गृहस्थाश्रमी भक्त यांची बैठक बोलवून संस्था उभी करण्याचा विचार सांगितला. पाश्चात्य देशातील संस्थांची माहिती व रचना सांगितली. आपण सर्व ज्यांच्या प्रेरणेने हे काम करीत आहोत त्या श्रीरामकृष्णांचे नाव संस्थेला असावे असा विचार मांडला. श्रीरामकृष्ण यांच्या महासमाधीला दहा वर्षे होऊन गेली होती. या काम करणार्‍या संस्थेचे नाव रामकृष्ण मिशन असे ठेवावे, आपण सारे याचे अनुयायी आहोत. हा त्यांचा विचार एकमताने सर्वांनी संमत केला.

पुढे संस्थेचे उद्दिष्ट्य, ध्येयधोरण ठरविण्यात आले.आवश्यक ते ठराव करण्यात आले, श्री रामकृष्णांनी आपल्या जीवनात ज्या मूल्यांचे आचरण केले, आणि मानव जातीच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणचा जो मार्ग दाखविला त्याचा प्रसार करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय निश्चित करण्यात आले. संस्थेचे ध्येय व कार्यपद्धती आणि व्याप्ती निश्चित केल्यावर पदाधिकारी निवडण्यात आले. विवेकानंद,रामकृष्ण संघाचे पहिले अध्यक्ष निवडले गेले.आध्यात्मिक पायावर उभी असलेली एवभावी आणस्था म्हणून १९०९ मध्ये रीतसर कायद्याने नोंदणी केली गेली. विश्वस्त मंडळ स्थापन झाले. खूप काम वाढले, शाखा वाढल्या, शिक्षण, रुग्णसेवा ही कामे वाढली, १२ वर्षे काळ लोटला. आता थोडी रचना बदलण्यात आली. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी ती ‘रामकृष्ण मठ’ आणि सेवाकार्य करणारी ती संस्था ‘रामकृष्ण मिशन’ अशी विभागणी झाली. या कामात तरुण संन्याशी बघून अनेक तरुण या कामाकडे आकर्षित होत होते, पण अजूनही तरुण कार्यकर्ते संन्यासी कामात येणे आवश्यक होते. नवे तरुण स्वामीजी घडवत होते. या संस्थेतील संन्याशाचा धर्म, आचरण, दिनचर्या, नियम, ध्यान धारणा, व्यायाम,शास्त्र ग्रंथाचे वाचन, त्या ग्रंथाचे रोज परीक्षण समाजवून सांगणे, तंबाखू किंवा कुठलाही मादक पदार्थ मठात आणू नये. अशा नियमांची सूची व बंधने घालण्यात आली. त्या शिवाय प्रार्थना, वर्षिक उत्सव, विविध कार्यक्रमांची योजना ,अशा सर्व नियमांची आजही काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.     

स्वामी विवेकानंद यांच्या या संस्थेचे बोधवाक्य होते

|| ‘आत्मनो मोक्षार्थ जगद्धिताय च’ ||

आज शंभर वर्षे  आणि वर १४ वर्षे अशी ११४ वर्षे हे काम अखंडपणे सुरू आहे.  

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments