☆ विविधा ☆ शेती संस्कृती मधील स्त्रियांचा सहभाग ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆
मानव प्रगत झाला. गुहेमधून घरात राहू लागला. त्याही आधी तो जेव्हा गुहेत राहत होता. शिकारीला जात होता. अनेक दिवस शिकरीहून परत येणं होत ही नसेल. तेव्हा बाई आपल्या चिल्या पिल्यांना घेऊन कसे जगत असेल, त्यांना काय खाऊ पिऊ घालत असेल ? हा प्रश्न पडतो. तेव्हा वाटते बाईने का केली असेल शेतीला सुरुवात? कशी सुचली असेल तिला ही किमया? कुठून मिळाली असेल ही प्रेरणा?
फळे कंदमुळे .अनेक मुलांमुळे शोधणे हेही शक्य नसेल तर तिला वाटलेही असेल की ही फले कंदमुळे आपल्या आसपास जवळच असावीत, त्याचे बी लावावे… मनात आल्यावर कृती करायला काय वेळ लागणार… तिचेच राज्य. तिच्या मनात असं का आले असेल… ? बी लावल्यावर त्याचे झाड उगवून येते हे तिला कधी आणि कसे कळाले असेल? कसा असेल तो क्षण?
न्यूटन ला सफरचंद पडल्यावर अचानक लख्ख जाणवले आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला…. लहानपणापासून तो पडलेलं सफरचंद बघत असेलच की…. पण असा जाणिवेचा क्षण नेनिवेतून यायला तशी वेळही यावी लागत असेल…
कुठे तरी वाचल्याचे आठवते, खार किंवा खारोटी हिला एक सवय असते, बिया गोळा करायच्या आणि कुठे ना कुठे पुरायच्या. तिच्या या सवयीने जंगलं वाढतात म्हणे.
हेही बाईने बघितले असेलच. तिला अशी प्रेरणा मिळू शकली असेल. आणि बिया पेरणी कळत नकळत सुरू झाली. ही बाईच्या मनातली आदिम प्रेरणा मुळीच कमी झालेली नाही, अजूनही!
आजही शेती मध्ये अनेक अवजड यंत्रे आली, नांगरणी पेरणी यंत्रे करू लागली तरी पेरणीच्या वेळी घरातल्या गृह लक्ष्मीच्या हाताने मुठभर धने पेरले जातातच. हा पिढ्यान् पिढ्या चालत आलेला शेती संस्कृती मधील संस्कार किंवा, रुढी परंपरा म्हणा अजूनही आहे. तिने शेतीला सुरावत केली याची आठवण म्हणून , तिचा सन्मान म्हणून ही पद्धत अजूनही कायम आहे. पुरुष सत्ता क पद्धतीमध्ये अनेक बदल झाले असले तरी या सत्तेने स्त्रीच्या निर्मिती क्षमतेची जाणिव ठेवली आहे म्हणायचे.
आजही मुख्य पीक पुरुष ठरवत असेल , पण बांधावर, मधल्या सरीत काय माळवं लावायचे हे बाईच ठरवते.
त्याची निगुतीने काळजी घेते. मिरच्या, धने, लसूण काही ओली तरकारी म्हणजे, वांगी, गवार, दोडकी, घेवडा यावर फक्त तिचीच सत्ता असते. ते विकायचे की वाटायचे हे तीच ठरवते. त्या पैशावर हक्क नावापुरता तरी तिचाच असतो.( नंतर गोड बोलून काढून घेतले जातात ती गोष्ट वेगळी. )
पेरणी करणे आणि पाणी पाजणे एवढे पुरुष करतो. पण बाकीच्या उगनिगी बाईच करते. पीक पोत्यात भरेपर्यंत तिची कितीतरी कामे असतात. भांगलान, खुरपणी दोनतीन वेळा करावी लागते. हे घरातील स्त्रीच करून घेते. कापणी, खुडणी आहेच. तिच्याशिवाय कोण करणार …
मातेरे, सरवा , काशा वेचने या सर्वांना बाईचाच हात पाहिजे. ही हलकी कामे पुरुष थोडाच करतो. वाळवणं सारख्या गोष्टींना तर बाई शिवाय कुणाचा हात लागणार … भरलेली पोती उचलायला फक्त बाप्या येणार… धान्याला कीड लागतेय का कधी चाळायचे, वाळवायचे हे तीच बघणार… कडधान्यांचा भुंगा कीड लागू नये, बियांनासाठी टिकवून ठेवण्यासाठी ते राखेत ठेवायचे काम तिचेच. मग चुलीतली राख वर्षभर साठवायची. नंतर चालून त्यात कडधान्य मिसळून छोटी कणगी किंवा पत्र्याचे डबे मिळवून त्यात ठेवायचे. यासाठी खूप बारकावा लागतो, सायास लागतात. हे सगळे काम बाई बिनबोभाट, आनंदाने करत असते. एक ना दोन शेतकऱ्याची बाई आणि शेती वेगळी होऊ शकेल काय…
शेती बाई शिवाय शक्य तरी आहे का..
© सौ. सावित्री जगदाळे
१४/२/१९
१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈