सौ. सावित्री जगदाळे
☆ विविधा ☆ शेती मुळे स्त्रिया होतात आत्मनिर्भर ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆
गावाकडे शेतात काम करणाऱ्या स्त्रिया या आत्मनिर्भर असतात. शेतातील जवळ जवळ ऐंशी टक्के कामे स्त्रियाच करतात. पेरणी टॅक्टरने केली तरी काही ठिकाणी हाताने रोपे लावणे, बी टोकणे यासाठी स्त्रियाच लागतात. नंतर खुरपणी, भांगलन आहेच. साधारण एका पिकाला दोन तीन वेळा भांगलन करावेच लागते. त्यातून स्त्रियांना रोजगार उपलब्ध होतो. या कामासाठी शिक्षणाची अट नसते. शिकण्यासाठी एखादा दिवस पुरतो. त्यामुळे तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला गरज असेल तर कुणीही शेतीत काम करून रोजगार मिळवू शकतो.
भांगलन झाल्यानंतर काढणी, मळणी असते. मळणी यंत्रावर असली तरी मदतीला स्त्रिया लागतात. बरं या कामाची शेतकर्याला तातडीची गरज असतेच. सुगीमध्ये अगदी जास्त रोज देऊन बायकांना बोलावले जाते.
शेतीची कामे बारमाही चालतात. त्यामुळे रोजगार सतत उपलब्ध असतो. शेतात काम केल्यामुळे मोकळी ताजी हवा मिळते. आपोआप व्यायाम होत असल्यामुळे आरोग्य चांगले राहते.
कुठे ना कुठे भाजी, तरकारी पिकवली जाते. येताना कुणीही भाजीचा वानवळा देतात. नाहीतर अगदी कमी दरात ताजी भाजी मिळते.
कित्येक बायका शेतात जाताना दोन तीन शेळ्या चरायला नेतात. जिथं भांगलन वगैरे चालू असेल तिथेच बांधावर झुड्पाला शेळ्या बांधायच्या. गळ्यातलं दावं जरा लांब सोडायचे. त्यांचं त्या चरतात. येताना जळण, गवत डोक्यावरून आणतात. शेळीचं औषधी ताजं दूध मिळते. बोकड असेल तर तो विकून बरेच पैसे मिळतात. यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नसते. फारसा खर्चही येत नाही. फक्त कष्ट करायची तयारी हवी. आणि खेडयातील स्त्रिया ते करतात. असे समुहाने काम केल्यामुळे त्यांचा मैत्रभाव वाढीस लागतो. एकमेकांना मदत करणे. लग्न कार्याला एकत्र काम करणे, मोठ्यांचा सल्ला मिळणे यासाठी खर्चही कमी किंवा जवळ जवळ नसतोच. कर्जबाजारी होण्याची वेळ येत नाही.
आपल्याच माणसात काम करणामुळे आत्मविश्वास, निर्भयता येते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. त्यामुळे झोपडीतही ती फार दुःखी नसते.
आता बचत गट खेड्यातही असतात. त्यामुळे पैशाचा योग्य विनियोग त्या करू शकतात.
शेतातील सुगीच्या दिवसात मूग, उडीद, चवळी, घेवडा, हरभरा ही कडधान्ये आपल्या शेतात नसतील तर शेजारणी कडून घेऊन त्यांना राख, किटकनाशक पावडर लावून वर्षभराची साठवण करतात. या कडध्यान्याच्या डाळी करून साठवतात. गहू, ज्वारी यांची वर्षभरासाठी साठवण करता येते. सुगी मध्ये धान्य स्वस्त मिळते. खेड्यात भुईमुगाच्या शेंगाही अशाप्रकारे साठवूण ठेवतात.
घरात जर असे वर्षभर पुरेल एवढे धान्य असेल तर ती गृहिणी केवढी तणावमुक्त राहू शकते.
एखादीचा नवरा मुलगा दारुडा , जुगारी असतो तेव्हा तिला त्रास होतो. पण ती एकटी पडत नाही. तिच्या साठी मदतीचे हात सदैव तत्पर असतात.
© सौ. सावित्री जगदाळे
१७/२/१९
संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈