सौ. दीपा नारायण पुजारी
☆ विविधा ☆ शोध शांततेचा ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
अलीकडं घरी आम्ही दोघेच असतो.हे सकाळी दवाखान्यात जातात. त्यानंतर साधारणपणे मी एकटीच असते.त्यामुळे माझ्या दुपारवर कोणाचाही हक्क नसतो. आजही मी एकटीच दिवाणवर लोळत पडले होते. दाराची बेल वाजली. कोण बाई एवढ्या ऊन्हाचं? असं म्हणत मी दार उघडलं. दारात एक तरुणी उभी होती.
‘हाय’ ती घुसलीच घरात.
माझ्या कपाळावरील आठ्या बघून सुध्दा ती हसत हसत गळ्यातच पडली.
‘कोण तू?’ मी घुश्शातच विचारलं. (खरंतर अगोचर म्हणायचं होतं. पण जीभ आवरली.)
तोपर्यंत ती बया हातपाय पसरुन सोफ्यावर पसरलीही!
मोठ्यानं हसून म्हणाली, ‘बघ, विसरलीस ना मला?’
‘छे बाई, काय ते गडगडाटी हसणं? असं का हसतं कुणी?’
आत्तापर्यंत माझं निरीक्षण पूर्ण झालं होतं.
उंच, शेलाटी, जाड- जाड दोन लांब वेण्या; त्याही पुढं घेतलेल्या! बॉटल ग्रीन बेलबॉटम, डबल कॉलरचा लाईट पिस्ता कलरचा थोडा ढगळा टॉप,
कानात छोटे छोटे स्पिनर्सवाल्या डुलणाऱ्या रिंग्ज. . . . . . अं . . . अं. . . . अं. . ही तर. .
‘बरोब्बर अगं मी तूच. . ती. . ती कॉलेजमधली दीपा’.
टाळीसाठी लहानसा हात पुढं आला. मीही टाळी दिली.
‘काय हा अवतार दीपा? साडी, टिकली, बांगड्या,.. . ‘
या वाक्याकडं दुर्लक्ष करून स्वयंपाकघरात जाता जाता मी विचारलं. . . ‘कॉफी?’
‘पळ्ळेल. . . ‘
आता मी ही हसत हसत आत वळले.
ती केंव्हाच ओट्यावर चढून पाय हलवत बसली.
‘हे काय नेसकॅफे? ब्र्यू नाही? ‘
‘नाही गं, ह्यांना ब्र्यू नाही आवडत.’
‘हो क्का? ‘
मग ओट्यावर बसूनच कॉफी चे घुटके घेत भरपूर गप्पा झाल्या.
कॉलेजच्या दीपाला मी निरखत राहिले. मला ती न्याहाळत होती. अल्लड, अवखळ, निरागस, दीपा. ठाम पण शांत दीपा. साधी, सरळ तरीही मैत्रिणींच्या घोळक्यात राहणारी, डोळ्यात सुंदर, निरामय, साधीशी स्वप्नं. . .
तेव्हढ्यात करकचून ब्रेक लागल्याचा आवाज आला. लोकांचा गलका ऐकू येऊ लागला. आरडाओरडा, गाड्यांच्या हॉर्नचे कानठळ्या बसवणारे आवाज. . . . दोघींनीही कानावर हात ठेवले. ती तर कपाळावर आठ्यांच जाळं घेऊन, हातात डोकं खुपसून बसली.काही वेळानंतर आवाज थोडे कमी झाले.
‘काय ग, असल्या कोलाहलात कुठं घेतलंस घर?’
‘विसरलीस तुला हवं होतं शांत, रमणीय परिसरात छोटंसं घर. कुठं आलीस तू? ‘
‘हं. हे डॉक्टर आहेत ना! मध्यवर्ती ठिकाणी बरं पडत त्यांच्या व्यवसायासाठी.’ मी पुटपुटले.
‘एवढ्या कलकाटात! बापरे!!. कल्पनाच करवत नाही.
‘सोप्पं जातं त्यांना. खाली दवाखाना वर घर.मुलांनाही शाळा-कॉलेज जवळ. भाजी मार्केट दोन मिनिटांवर.’
‘काय म्हणतेयस ऐकूही येत नाही नीट.’
‘असू दे ग.’
‘काय? क्क क्क काय….? रस्त्यावरचे आवाज पुन्हा वाढले बघ. धन्य आहेस बाई तू. तूच बैस इथं तुझं घर सांभाळत. मी कलटी घेते.’ बाय बाय. करत ती निघूनही गेली. मी दीपा.. दीssपा.. अशा हाका मारत राहिले.
पण ती कधीच जीना उतरुन पळाली.
मी मात्र सोफ्यात विचार करत बसले. बरोब्बर बोलली ती. तेच तर स्वप्न होतं. लहान असलं तरी चालेल, घर हवं शांत वसाहतीत, गर्दी पासून दूर.. खरंच राहूनच गेलं…
कितीदा बोलूनही दाखवलं ह्यांना की एखाद्या कमी वर्दळीच्या जागी घर होतं मनात माझं, स्वप्नातलं, इवलंसं. इथला रस्ता सकाळी सहा वाजल्यापासूनच बोलू लागतो. गाड्यांची खडखड, हॉर्न ची पीं पीं, सायलेन्सर काढलेल्या बाईक्सचा कर्णकर्कश आवाज. या सगळ्यात पक्ष्यांची किलबिल ऐकू येतच नाही. हलक्याशा झुळूकीनं डोलणाऱ्या पानांची सळसळ वाऱ्यावर विरुन जाते. रेडिओ टीव्ही मोठ्या आवाजात कोकलत असतील तरच कान वेधतात. हा वर्दळीचा रस्ता रात्री बारा वाजेपर्यंत वहात असतो. कर्णकटू सूरात वेडेवाकडे आलाप? गात असतो. ओरडत असतो. मनातलं शांतता वाटणारं घर दूर राहिलंय. हरवून गेलंय. बांधायचंच राहून गेलं… राहूनच गेलं.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
मो.नं. ९६६५६६९१४८
Email: [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈