कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
विविधा
☆ शांता शेळके..एक शब्द-झरा! – भाग 3 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
शांताई म्हणजे काव्याचा सतत वहाणारा एक झरा!
शब्द पाण्याच्या थेंबासारखे ओघळत येणारे प्रवाही! असं कुठलं गाण्यातलं क्षेत्र नव्हतं जिथे त्यांच्या शब्दांचा ओघ वाहिला नाही! भक्तीगीते, भावगीते, भजन, देशभक्तीपर गीतं सगळ्या क्षेत्रात ही गंगा वहात राहिली! स्वभावाने अतिशय नम्र तरीही हुशारी चे तेज त्यांच्या काव्य रचनेत लपत नव्हते!’ भस्म विलेपित रूप साजिरे… ‘ सारखे भक्तीगीत असो वा ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे…’ सारखे विरहगीत असो तितक्याच ताकदीने त्यातील भाव उभे करण्याचे कसब त्यांच्या गीतात होते. बाबूजींकडे त्यांनी चित्रपटांसाठी अनेक गाणी लिहिली. आणि ‘तोच चंद्रमा नभात..’ सारखे अजरामर गाणे आपल्याला मिळाले.लहानपणापासून संस्कृत श्लोक, ‘काव्य प्रकाश’ चे वाचन, मनन, चिंतन केले होते, त्यांचा सुसंस्कार त्यांच्या गीतातून दिसून येतो. ‘शालू हिरवा, पाचू न् मरवा, वेणीत पेडी घाल आता..’ गाण्यातून दिसणारा आनंद व्यक्त होतो तर ‘रेशमाच्या तारांनी, लाल काळया धाग्यांनी कर्नाटकी कशिदा…’ हे गाणं लिहिताना त्यांचा लावणीचा बाजही तितकाच उत्कट तेथे दिसून येतो. भालजी पेंढारकर यांनी शांताबाई ना कोल्हापूर ला बोलावून घेतले आणि काव्य लिहून घेतले. अनेक संगितकारांनी शांताबाईंच्या गीतांना चाली लावून अजरामर गाणी मराठी सिनेमा ना दिली. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांनी त्यांच्या गीतांना योग्य न्याय मिळवून दिला!
शांताबाई या मागच्या पिढीतील अतिशय सुसंस्कृत, हुशार, चतुरस्त्र लेखन करणार्या कवयित्री होत्या.बहिणाबाई चौधरी, सरोजिनी बाबर, शांता शेळके या सारख्या कवयित्री नी आपल्या मराठी भाषेला जे लेणं दिलं आहे, ज्याचे मोल करता येणं अशक्यच आहे !
शांताबाईंच्या स्मृतीला मन:पूर्वक अभिवादन!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈