☆ विविधा ☆ शब्दवेडी – शब्दकोडी ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

शब्दकोडी सोडविणे हा छंद म्हणा, आवड म्हणा, सवय म्हणा किंवा वेड म्हणा, काही असले तरी त्याचे फायदेच आहेत. कित्तीतरी  फायदे. वेळ छान जातो, डोक्याला चालना मिळते, नवीन शब्द कळतात, वयाच्या पन्नाशीनंतर आत्मविश्वास वाढायला मदत होते.

मला तर शब्दकोडी सोडविणे हा छंद,सवय, आवड, आणि वेड सगळंच आहे. काही वर्षांपूर्वी मुद्दाम वेळ काढत असे. आवड असली कि सवड मिळतेच. वर्तमानपत्रातली छोटी छोटी शब्दकोडी पट्कन सुटतात. आता तर काय दुपारचा एक तास दोन मोठी म्हणजे 75- 80 शब्दांची कोडी सोडवता येतात. ते आता इतकं सवयीचं झालं आहे की दुपारी वर्तमानपत्र आणि पेन माझी वाट बघत असतात.

हो! डोक्याला चालना मिळते. आडव्या उभ्या शब्दांची एकमेकांशी सांगड घालताना शब्दांची वीण जमू लागली की एक सुंदर चित्र  तयार होते. पण कधी कधी एखादा शब्द इतका खट आणि हट्टी असतो, काही केल्या आठवत नाही. तेव्हा त्याला तिथेच सोडते आणि दुस-या शब्दाकडे जाते. अचानक तो हट्टी शब्द पटकन उतरतो.

काय गंमत असते बघा! एक बंदिस्त चौकोन, त्यात अनेक घरे, प्रत्येक घरात एक शब्द आणि त्यांचं नातं फक्त आडवं किंवा उभं. दोन शब्दांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

जबाबदारी या शब्दापासून कामचुकारपणा शब्दापर्यंत, सभ्य, सालस या शब्दापासून कृतघ्न,हलकट, नीच, नराधम शब्दापर्यंत,  नाटककाराचे लांबलचक नाव ते एकांडे शब्द,  उदा. ख,ब्र,भ्रु, व, ठो, शी अशा वैविध्यपूर्ण शब्दापर्यंत, एक म्हण उभी 10 अक्षरांची तर आडवा वाक्प्रचार 12 अक्षरांचा. यापेक्षा ही अधिक range असलेली कोडी म्हणजे एक challenge असते.

हल्ली तर सणवारांप्रमाणे कोडी असतात.श्रावणातले सण, प्रत्येक दिवसाचे महत्त्व उलगडणारी कोडी, गणेशोत्सवात गणपतीच्या नावांची आणि स्थानांची, तसेच नवरात्रीची देवीच्या नावांची कोडी, तर चक्क राजकपूरच्या सिनेमांची, बच्चनच्या सिनेमातल्या त्यांच्या character च्या नावांची सुद्धा कोडी असतात.

मला ही शब्दकोडी बनविणा-यांच्या बुद्धीचं खरंच कौतुक वाटतं. अफाट बुध्दी वापरून करतात हे काम ही मंडळी. शब्दकोडी सोडवताना नवीन शब्दांची भर पडते आपल्या डिक्सनरीत. उदा. वस्तूंची यादी याला ‘ रकमाला’ हा शब्द,  खाट किंवा बाज ला नवार,  शिकलगार, वेठबिगार असे कालबाह्य झालेले शब्द परत समोर येतात.

पन्नाशीनंतर जेव्हा थोडासा विसरभोळेपणा हा गुण वर यायला लागला कि स्वतःवरच ओशाळायला होतं. तेव्हा जर शब्दकोडी सोडविणे हा नियम केला तर कोडी सोडवता सोडवता हा गुण/अवगुण कमी होऊन आत्मविश्वास वाढायला मदत होते. करून बघा!

‘ शब्दकोडी ‘, ‘ करमणूक’,    मनोरंजन अशी तीन मासिके उपलब्ध आहेत बरं का! त्यात 25 ते 50 कोडी असतात, एका कोड्यात 100 शब्द असलेली.

शब्दांचा हा उपलब्ध असलेला खजिना आणि आपला वेळ यांची आडवी – उभी सांगड घाला आणि सोडवा शब्दकोडी.  बघा किती मज्जा येईल.

मस्त रहा..स्वस्थ रहा….

 

© सौ. अमृता देशपांडे

9822176170

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments