श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ शब्द शब्द जपून ठेव..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रत्येक शब्दाचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अर्थ, रंग आणि भाव यामधील वैविध्य..! शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा तर शब्दार्थाइतकाच भावार्थही महत्त्वाचा ठरतो. शब्दाच्या एकाच अर्थालाही विविध रंगछटा असतात.

शब्द हे मनातील भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम. त्यामुळे शब्द जाणीवपूर्वक,योग्य पद्धतीने आणि अचूकपणे वापरले गेले तरच त्याचे अर्थ, त्यातील भाव आणि रंगासहित योग्य रितीने ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोचतात. एरवी वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दातील रंग उडून गेल्याने व भाव विरून गेल्याने भावार्थही लयाला गेलेला असतो. आणि उरतो तो शब्दाचा सातत्याने सरसकट सरधोपटपणे झालेल्या वापरामुळे ठळक झालेला फक्त रुढार्थ! याचे अतिशय चपखल उदाहरण म्हणजे ‘ धर्म ‘ हा शब्द. धर्म हा शब्द ‘ उपासना-प्रणाली, ईश्वर प्राप्तीचे मार्ग यासाठी आकाराला आलेले प्रचलित धर्म’ या अर्थानेच सर्रास वापरला आणि  स्वीकारलाही जातो.त्यामुळे धर्म या शब्द फक्त ‘RELIGION’ या एकाच अर्थाने सर्रास गृहित धरण्यात येतो.पण ‘धर्म’या शब्दाला हाच एक अर्थ अभिप्रेत नाहीय. धर्म या शब्दाला श्रद्धा- प्रणाली, उपासना-पद्धती, ईश्वरोपासना, परमेश्वरप्राप्तीचे मार्ग, नीतिशास्त्र,व्यवहारशास्त्र, जीवनमार्ग, तत्त्वप्रणाली असे विविध अर्थरंगी पैलू आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘धर्माची आराधना’ या विषयाचे विवेचन धर्म या शब्दाच्या अनुषंगाने करायचे तर या शब्दाच्या वर उल्लेख केलेल्या अर्थांपैकी कोणता अर्थ गृहीत धरणे योग्य होईल याचा विचार करायला हवा. मला स्वतःला त्यातील  ‘जीवनमार्ग’ या अर्थाच्या जवळ जाणारा ‘जीवनपद्धती’ हा अर्थ सर्वसमावेशक वाटतो.याला कारणही तसेच आहे. जीवन जगताना आपल्याला पार पाडाव्या लागणाऱ्या परस्पर वेगवेगळ्या अशा असंख्य भूमिका वठवत असताना आपला दृष्टिकोन नेमका कसा असावा हे विशद करणाऱ्या अनेक संकल्पनांना ‘धर्म’ हेच नामानिधान विचारपूर्वक जोडलेले असल्याचे लक्षात येते. उदा.- स्वभावधर्म,गृहस्थधर्म, पुत्रधर्म, मैत्रीधर्म,शेजारधर्म,सेवाधर्म राजधर्म आणि असेच अनेक.

जसा ‘धर्म’ तसाच ‘भक्ती’ हा शब्द.या शब्दाचेही विविध रंग आणि भाव ध्वनित करणारे तितकेच विविध अर्थ आहेत. भक्ती म्हणजे प्रार्थना.सेवा. उपासना. भक्ती म्हणजे नमन, पूजन,आळवणीच नाही फक्त तर अनुनय आणि मनधरणीही. निवेदन,विज्ञापन,मागणी, याचना, कळकळीने केलेली विनंती,असेही अर्थ ‘भक्ती’ या शब्दाच्या रंगछटांमधे लपलेले आहेत. यातील ‘कळकळीने केलेली विनंती ‘ या अर्थाची सावली असलेल्या प्रार्थना,नमन,पूजा इत्यादी अर्थांची नाळ थेट ईश्वराच्या आराधनेशी जोडलेली असते.

आराधना व भक्ती हे दोन्ही समानार्थी शब्द. त्यामुळे ‘आराधना’ या शब्दालाही प्रार्थना अनुनय,आळवणी,धावा हे सगळे अभिप्रेत आहेच.धर्म,भक्ती आणि आराधना या तीनही शब्दांचे हे विविध अर्थ,भावार्थ आणि त्यांचे विविधरंगी रूप लक्षात घेतले तर  ‘धर्माची व भक्तीची आराधना’   यावर ‘नेमके कसे व्यक्त व्हावे?’ हा मनात निर्माण होणारा प्रश्न कांहीसा संभ्रम निर्माण करणारा ठरतो.

दैनंदिन जीवनाच्या संदर्भात याचा विचार करायचा तर मूल्याधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारून भक्तीयुक्त अंतःकरणाने केलेली जीवनमूल्यांची आराधना हीच परमेश्वरापर्यंत तात्काळ पोचते हे लक्षात घ्यायला हवे.ईश्वर उपासनेच्या विविध प्रणालींचा अंगिकार आणि प्रसार करणाऱ्या विविध धर्मांनीही त्यांच्या शिकवणूकीमधे याच तत्वाचा स्विकार केलेला आहे. त्यामुळेच तात्त्विकदृष्ट्या विचार करायचा तर कोणताच धर्म ‘अधर्म ‘ शिकवत नाही. धर्माच्या ‘कट्टर’ अंगिकारातूनच ‘अधर्म’ जन्माला येत असतो.कोणत्याही धर्माचा धर्मतत्त्वांचे महत्त्व आणि अपरिहार्यता समजून घेऊन अंगिकार करणारेच ‘मानवधर्म’ असोशीने कृतीत उतरवू शकतात. धर्माचा असा ‘कृतिशील स्वीकार’ हीच खरी आराधना असे मला वाटते. धर्माचा कट्टर विचारांच्या अधीन होऊन अट्टाहासाने प्रचार व प्रसार करणारे त्यांच्याही नकळत आराधनेऐवजी अतिरेकाचा अंगीकार करुन स्वथर्मच भ्रष्ट करीत असतात. दैनंदिन जीवन आनंददायी करण्यासाठी मूल्याधिष्ठित भूमिकेतून धर्माचा केलेला स्विकार आणि त्यातून निर्माण होणारी प्रत्येक कृती सहृदयतेच्या  स्पर्शाने शुचिर्भूत झालेलीच असेल. तिथे अतिरेकाला थारा नसेल तर आराधनेला अभिप्रेत असलेला कळवळा असेल.

धर्म,भक्ती आणि आराधना हे तिन्ही शब्द म्हणूनच त्यांच्या विविध रंग,भाव न् अर्थासह मनोमन जपून ठेवणे अगत्याचे. हे झाले तर आपली आराधना सफल होण्यात प्रत्यवाय तो कोणता?

©️ अरविंद लिमये

दि.१४/०८/२०२१

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments