सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ शेअरिंग… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

इतरांसह एकत्रितपणे काहीतरी  वस्तू वापरणं किंवा त्याचा आनंद घेणं म्हणजेच आजकालच्या भाषेत शेअरिंग. शेअरिंग ही एक प्रोसेस आहे. शेअर करणं म्हणजेच थोडक्यात एखाद्याला सरळ सरळ गिफ्ट देणं. हे शेअरिंग जागा, वेळ, पुस्तक, खेळ, खाऊ अशा कोणत्याही गोष्टींचं असू शकतं. तसं पाहिलं तर हा आजकलचा की- वर्ड झाला आहे. फाईल शेअरिंग, स्क्रीन शेअरिंग, मेसेजेस, फोटोज्, माहिती, व्हिडिओज् इ. इ. . . आजच्या न्यू ऑप्टिक युगात किंबहुना इंटरनेट कल्चर मध्ये हा एक अनेक कामं सुसंगत पणे पार पाडण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटलेले आपण शेअरिंग शिवाय काम करूच शकत नाही. लॉकडाऊन च्या काळात; वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना तर  आंतरजालाच्या गुहेत संचार करण्यासाठी शेअरिंग खूपच महत्त्वाचं असतं. एवढंच नव्हे तर इंटरनेटचा वापर फारसा न करणारेही या आंतरजालात गुरफटलेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर. . बघा हं. . .  काशी विश्वेश्वराचं जिर्णोद्धारामुळे बदललेलं भक्तीरस जागृत करणारं  रुप आपल्याला घरात बसून बघता येतं. . . . त्याचं नेत्रसुख मिळवता येतं, भाविकांना काशी दर्शनाचा लाभ मिळतो. हे शक्य होतं ते काशी विश्वेश्वराचा व्हिडिओ सोशल मेडियावर शेअर केल्यामुळेच ना!

इंटरनेट वर माहिती शेअर करणं हे आता फारच सामान्य झालं आहे. पण मुळात शेअरिंग करणं, एकमेकांना देणं, या आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग असलेल्या संकल्पनेला विसरत चाललो आहोत. आपल्या मागच्या पिढ्या शेअरिंग च्या बळावर वाढल्या, मोठ्या झाल्या. घरात बहिण भावंडांच्या बरोबर वह्या- पुस्तकं, रंगपेट्या, पोस्टर कलर्स, कंपास बॉक्स इतकंच काय कपडे देखील शेअर करुन वाढल्या या पिढ्या! आठवीत शिकणाऱ्या भावाचा भूमितीचा तास झाला की तो कंपास बॉक्स सहावीतल्या बहिणीकडं सुपूर्द केला जाई. केवढी सोय! केवढी बचत!! मोठ्या बहिणीचे कपडे घालण्यात लहान बहिणीला अपमान वाटत नसे.

मधल्या सुट्टीत डबा खाताना डब्यातील भाजी एकमेकांना दिली जाई. खिशातून आणलेल्या शेंगदाणे, फुटाणे, गोळ्या बिस्कीटं यांची देवाणघेवाण  नेहमीच होई. चिमणीच्या दातांनी रावळगाव आणि लिमलेटच्या गोळ्यांचा गोडवा वाढवला जाई.

आजच्या युझ ऍन्ड थ्रो च्या जमान्यात  मुलांना शेअरिंग शिकवावं लागतं. तेही जाणीवपूर्वक. न्युक्लिअर फॅमिलीच्या प्रॉब्लेम्सना तोंड देत वाढणारी ही पिढी, कोरोना व्हायरसनं त्रस्त झाली आहे. रंग रुप बदलतं, जगभर संचार करणाऱ्या या व्हायरसचं सोवळं पाळायलाच पाहिजे. ऑनलाईन शाळेमुळं एकत्र एका वर्गात, एका बाकावर बसून शिकणं जिथं नाही तिथं आपल्या दप्तरातल्या वस्तूंचं, डब्यातल्या खाऊचं शेअरिंग  केवळ अशक्य. चूकुन ही चूक झालीच तर . .बापरे. . शांतम् पापम्!!. किंबहुना मुलांना सुरक्षिततेसाठी शेअरिंग नको हेच नाईलाजानं शिकवावं लागतं. अर्थात सगळं माझंच आहे, एकट्याचंच आहे ही वृत्ती बळावली तर नवल नाही. एक तीळ सात जणांनी राहू दे, पण दोघांनी वाटून खाणं देखील दुरापास्त होऊन बसलंय. शेअरिंगमुळं केअरिंग वाढतं. असं जरी असलं तरी सध्या शेअरिंगचं फारसं केअरिंग न करणंच योग्य ठरेल.

कोरोना लवकरच गोठून जाऊ दे,  ‘केअरिंग’ करणारं माणसातलं खरंखुरं ‘शेअरिंग’ शेअर करता येऊ दे. . . तोपर्यंत टेक केअर.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments