सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ शब्देवीण संवादू… 🤔 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काही  दिवसांपूर्वी मेघालयातल्या whistling village विषयी ऐकलं. या  Kongthong village मध्ये एकमेकांना बोलवायला शिट्ट्यांचा वापर करतात. इथं संवाद साधायला शब्द वापरले जात नाहीत. शिट्टी घालून संवाद साधला जातो. किती छान! बोलण्यासाठी जवळपास असणं गरजेचं नाही. काही अंतरावरुन देखील; आधुनिक तंत्रज्ञान न वापरता संपर्क साधता येतो….. पण हो याकरिता शिट्टी घालता यायला हवी हं.

माणसाला बोलायला आवडतं. वेगवेगळ्या विषयांवर बोलता येणं ही एक कला आहे. ही कला तुम्हाला बहुश्रृत बनवते. समाजप्रिय बनवते. गप्पा मारणारी माणसं साळढाळ असतात. सहजपणानं कोणत्याही प्रकारच्या लोकांमध्ये मिसळून जातात. मनातलं सगळं सांगून टाकलं की कसं मोकळं मोकळं वाटतं. आपल्याला भावना, विचार व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.मनातलं सगळं बकबक करुन सांगितल्या शिवाय चैनही पडत नाही आपल्याला. नुसत्या शिट्टीतून या माणसांना राग, लोभ, प्रेम कसं बरं व्यक्त करता येत असेल.शब्दाविना एकमेकांना समजून घेणं ही कला मात्र या लोकांना साधली असेल.  योग्य शब्द शोधून बोलायचा प्रयत्न केला तरी गैरसमज होऊ शकतात. Whistling village मध्ये अशा गैरसमजांना थाराच मिळत नसेल. दुधारी हत्यारासारखे शब्दच न वापरल्यानं हे व्हिलेज खऱ्या अर्थानं स्वर्ग तर ठरत नसावं?

आजकाल आपण न बोलता ही खूप बोलतो. मोबाईलवर येणाऱ्या मेसेजेस ना उत्तर देताना शब्द वापरायचे टाळतो. इमोजी. . . स्मायलीज पाठवून रिस्पाॅन्स देतो. या स्मायलीज आहेतही खूप गोडुल्या. सर्व भाव भावना व्यक्त करण्यास समर्थ आहेत. राग, द्वेष, आनंद अशा मनतरंगा बरोबर त्या थंडी, उष्णता, पाऊस असे हवेतील बदलही त्या दाखवतात. न शिंकता सर्दी – खोकल्याची वर्दी देतात. शाब्बासकी, सहमती, नाराजी,इ. सांगतात. केक, बूके, फूलं पाठवून स्पेशल डेज देखील आपण लांबूनच साजरे करु शकतो. स्टीकर्स पाठवून जास्त आपुलकी दाखवू शकतो. GIF द्वारा गंमतीदार, हलके-फुलके संदेश पाठवू शकतो. नुसते हसरे ईमोजी सुध्दा किती प्रकारचे आहेत. फक्त हसरा चेहरा पाठवून खुषी व्यक्त करता येते. हसरा चेहरा, हसरे डोळे आणि गुलाबी गाल आनंदाबरोबर किंचित लाजरा भाव

व्यक्त करतात. डोक्यावर गोलाकार मुकुट मिरवणारा इमोजी एखाद्या विषयी असलेला अभिमान सांगतो.

हे सगळे चेहरे न बोलता खूप काही बोलतात. कमी वेळात योग्य भावना सांगणारं हे अनोखं तंत्रज्ञान आज जास्तीत जास्त वापरलं जातं. आपल्याजवळ सांगण्यासारखं खूप असतं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आकलनक्षमतेनुसार आलेल्या अनुभवांची अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे करता येते. भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थही स्वतः च्या क्षमतेनुसार, संवेदनशीलतेनुसार लावता येतो. त्यासाठी कथा, कविता, कादंबरी असे साहित्य प्रकार हाताळले जातात. काळ बदलला. भावविश्व उलगडून दाखवणारी नवीन साधनं आली. नवीन पिढीची व्यक्त होण्याची साधनं बदलली. भाषा बदलली. सुपरफास्ट जमान्यात सुपरफास्ट पध्दतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. त्यासाठी भाषेची गरज राहिली नाही. इमोजी हे काम अधिक सुलभ आणि सुपरडुपर फास्ट करतात. शब्दातून सांगितल्या जाणाऱ्या अर्थापेक्षा ही चित्रलिपी वेगवेगळे अर्थ प्रतीत करु शकते. जो हवा तो अर्थ घ्यावा. भाषेची अडचण नाही. भाषा येत नसल्याचा न्युनगंड नाही. कमी वेळात जास्त तसंच योग्य विचार मांडता येतो. पाल्हाळ न लावता मुद्दा सांगता येतो. लिहिणाऱ्याचा आणि वाचणाऱ्याचा दोघांचाही वेळ वाचतो. आता हे शब्दाविना व्यक्त होणाऱ्या पिढीचं जग झालंय.

म्हणजे आपण पुन्हा भाषा नव्हती त्या काळात चाललो आहोत की काय? . . आपण पुन्हा इमोजीतून. . . चित्रलिपीतून . . . भाषेचा शोध लागण्याच्या आधीच्या काळात जाऊन पोहोचणार आहोत की काय?

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments