डाॅ. मीना श्रीवास्तव

🌸 विविधा 🌸

☆ शाळा सुटता, पुस्तक मिटता, सुट्टी लागता… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

आपल्यापैकी खास करून आई, बाबा, आजी, आजोबा अन इतर सर्वाना प्रेमळ प्रणिपात, नमन, आणखीन खूप खूप शुभेच्छा, बस आत्ता इतकच! (आणखीन एक नम्र निवेदन, तुमच्या घरातल्या छोट्या मंडळींना साष्टांग नमस्कार, विचारा का? हा लेख शेवटपर्यंत वाचा, म्हणजे आपोआपच कळेल!)

शाळकरी मुलांची कुठलीही सुट्टी, म्हणजे पालक किंवा तत्सम मंडळींचा बहुदा घातवार असा अलिखित नियम असावा! त्यात सर्वात मोट्ठी सुट्टी म्हणजे उन्हाळी सुट्टी, खरे पाहिले तर ही सरकारी योजना असून, ती नेहमीप्रमाणे फेल का होत नाही, हा प्रश्न अत्यंत वाजवी आणि समयोचित आहे! पण त्याची अंमलबजावणी करायला शाळेचे प्रिन्सिपॉल आणि शिक्षक तत्पर असतातच. शाळेतील शिक्षकांना देखील ब्रेक हवा, त्यांना पण घरची कामे असू शकतात, हे लक्ष्यात घ्याल की नाही! ती मंडळी या निमित्याने त्यांच्या मुलांच्या सुट्टीचे व्यवस्थापन करणार की! म्हणून एरवी शाळेत धुमाकूळ घालणाऱ्या मुलांच्या समस्त घराला सुट्टीत मुलांचा ब्रेथलेस परफॉर्मन्स बघणे हे क्रमप्राप्तच!

शाळेत नियोजनबद्ध गोष्टींसाठी नियत अवधी असतो, मात्र शाळा नसेल तर मग आपल्या घरात असे सुसंवाद घडत असतीलच! 

“आई, उद्या सकाळी उठवू नकोस प्लीज़, मी उठेन तेव्हा उठेन (म्हणजे कदाचित दुपार होईल)”

“आई, आज ऑफिसला जाऊ नकोस! घरीच मस्त वेळ घालवू (म्हणजे तू मस्त काही बाही कुकिंग कर अन मी खाईन)” 

“आई, आज जरा घर नीट आवरून ठेव, अन मस्त स्नॅक्स, कोल्ड-ड्रिंकचे प्रिपरेशन कर (माझे फ्रेंड्स येणार आहेत अन आम्ही एन्जॉय करणार आहोत)”

“आई, आत्ता कुठे सुट्टी लागली, अभ्यास करून कंटाळा आलाय, मी आधीच सांगतो/सांगते, मी जरा रिलॅक्स होणार आहे( घरची कुठलीच कामे करणार नाहीये)”

“आई, आज तू दमली असशील ना, आज किचनला सुट्टी! कित्ती करतेस ग आमच्यासाठी, आज तू आराम कर बरं! (आज मस्त बाहेरच लंच, डिनर करायचं)”

दृश्य १९५५ आणि पुढचा उन्हाळी काळ- स्थळ नागपूर, पहाटे ५ वाजता, आमच्या वडिलांची एकच हाक, अन काही मिनिटं जाता जाता आम्ही तयार, घरापासून २.५ मैल अंतर कापायला, अंबाझरी तलावाची सैर करायला! तिथले तलावा काठीचे भटकणे, बागेत फिरणे, अन झुल्यावर झुलणे, तहान लागली तर तिथल्याच नळाचे पाणी पिणे. परत येतांना रस्त्याच्या काठी माठातली नीरा मिळायची. सकाळी ७ पर्यंत परत येणे, हा ठराविक कार्यक्रम असायचा.  

आता पर्याय भरपूर आहेत, मुलांना सकाळी उठवण्याचा कार्यक्रम जमला की पुढचे सगळे सोप्पे असते! फक्त स्वच्छ स्वछंद हवा, हिरवीगार झाडे, मोकळी मैदाने, स्वच्छ पाणी, हे शोधायचा अवकाश की सुट्टीचे प्लानिंग झालेच समजा! 

सुट्टीचे दिवसागणिक, आठवड्यागणिक अन महिन्यागणिक नियोजन करणे, म्हणजे तारेवरची कसरत! यात (किमान) दोन प्रकार असू शकतात. एक, मुलांच्या सोबत बसून प्लानिंग करा किंवा मुलांना वगळून ते (शांतपणे) करा! अर्थात हे सर्व मुलांकरता असल्यामुळे त्यांचा सहभाग असावा, हे मान्य, पण त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीपुढे पालक किती टिकणार हे दोन्ही पक्ष् किती ताकदीचे बाहुबली आहेत त्यावर वैयक्तिकपणे ठरवावे. या व्यतिरिक्त वेळेवर येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्लॅन बी ते प्लॅन झेड ठरवावा. (कांही काळापूर्वी कोरोना आला आणि आपले कित्येक प्लॅन धुळीला मिळाले!)  

आता आपण मुलांसाठी सुट्टीत बहुसंख्य वेळा कशा-कशाचे नियोजन करतो ते बघू. यात मुलांना हे आवडेल हे गृहीत धरलेलेच आहे, शिवाय गुगल आणि इतर वेबसाइट्स आहेतच मदतीला! पिझ्झा पार्टी, पाजामा पार्टी, थीम पार्टी, उन्हाळी शिबीरे (यांचे विषय अनंत!), मॉलला भेट, मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमे बघणे, वॉटर पार्क, अम्युझमेंट पार्कला भेटी देणे हे सर्वांचे सर्वकालीन सर्वप्रिय कार्यक्रम!

वरील सफरीं व्यतिरिक्त मी इथे काही पर्यायांचा विचार मांडते, बघा तुम्हाला आवडताहेत का?

*आपल्या शहरातील संग्रहालय, तारांगण, ऐतिहासिक वास्तू , गड, किल्ले  आणि जंगले यांना भेटी, तसेच निसर्गाच्या सानिध्यात  पक्षी, प्राणी, झाडे, वृक्ष आणि वेलींचे निरीक्षण करणे: या  जागांना भेट देण्याआधी जर इंटरनेट आणि इतर स्त्रोतातून माहिती गोळा केली तर निरीक्षण आणखी चांगले करता येईल. तिथे गेल्यानंतर माहितीपुस्तिका देखील वाचता येईल. भेट दिल्यानंतर माहितीत भर घालून आपले सामान्य ज्ञान समृद्ध करावे! घरच्या वडीलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन असेल तर अत्युत्तम! याने मुलांची निरीक्षण शक्ती, जिज्ञासा आणि अभ्यासू वृत्ती वाढेल! तसेच हे मुलांनी लिहिले अन तेही मातृभाषेत, तर खूपच मजा येईल

*जवळपासच्या गावात राहून ग्राम्य जीवनाचा आनंद घेणे: नदीकाठी फिरणे आणि गावातील मुलांशी संवाद साधणे, तिथल्या जेवणाचा आस्वाद घेणे, सूर्योदय, सूर्यास्त आणि रात्री निरभ्र आकाशात चंद्र, ताऱ्यांचे निरीक्षण करणे, गावांत प्रदूषण बरेच कमी असल्याने हे जास्त आनंददायी असते. हे गाव मामाचे असेल तर आनंदाला काय तोटा?  

*अनाथाश्रमाला आणि वृद्धाश्रमाला भेटी देणे, जमेल तसे दान करणे आणि तिथे वेळ देणे:  मला वाटते सद्य परिस्थितीची जाणीव होण्याकरता, तसेच आपण किती सुस्थितीत आहोत याची मुलांना जाणीव व्हावी याकरता पालकांनी मुलांबरोबर या भेटी अवश्य द्याव्यात. 

* बालनाट्य बघणे, लहान मुलांसाठी असलेले चित्रपट बघणे (मला असे वाटते की, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये तयार होणाऱ्या नाटकांना बालप्रेक्षकांनी आणि त्यांच्या पालकांनी भरघोस प्रतिसाद देणे आवश्यक आहे).

याच संदर्भात कांही मोजक्या आठवणी परत जाग्या करते!

साधारण १९५७-१९५८ चा काळ: स्थळ नागपूर मधील एक सिनेमागृह:  बालप्रेक्षक आणि अति बालप्रेक्षकांच्या पालकांनी ते तुडुंब भरलय. सकाळी ९ ची वेळ! सिनेमा आहे “शामची आई”. पुस्तक वाचले होते, पण ती कहाणी रजतपटावर बघतांना कधी नव्हे इतके प्रेक्षक भावविवश झाले होते. मी तर आजवर इतर कुठलाही चित्रपट बघितल्यावर इतके रडल्याचे मला आठवत नाही. घरी आल्यावर देखील त्या सिनेमाचा आफ्टर इफेक्ट जाण्यासाठी खूप दिवस जावे लागले!

साधारण १९९८ चा काळ: तेच दृश्य, नागपूर मधील एक सिनेमागृह बालप्रेक्षक आणि पालकांनी तुडुंब भरलय. सकाळी ९ ची वेळ. सिनेमा आहे छोटा चेतन (३D) व त्याकरता खास रंगीत चष्मा घेण्याकरता लागलेली लांब रांग! सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली! मी पण मुलांसोबत मुद्दाम सिनेमा बघायला आलेय, मित्रांनो अशा वेळेस सिनेमाच्या व्यतिरिक्त बालप्रेक्षकांचा प्रतिसाद बघण्याचा आनंद काही वेगळाच! 

साधारण २०१८ चा मे महिना:  आता मी ठाण्यात नातीबरोबर आलेय, एक सुपर हिट नाटक अर्थातच “अलबत्या गलबत्या” बघायला! चिंची चेटकिणीची वाट बघता-बघता आली एकदाची!!! तिचे मंत्र-तंत्र, तिचे घाबरवणे अन तिचा ऍक्शनने भरगच्च भरलेला अन भारून टाकणारा फेमस डायलॉग “किती ग बाई मी हुश्शार, किती ग बाई मी हुश्शार!” इतकी गोड, लव्हेबल अन गुणाची (?) चेटकीण! मीच काय सर्वच तिच्या प्रेमात पडलेत! आधी वैभव मांगले अन आता निलेश गोपनारायण, तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा!!! हे चेटकिणीचे लोभस आऊटफिट अन अभिनयाचं आव्हान लीलया स्वीकारलेय तुम्ही अन विलक्षण ताकदीने पेलले!  

मित्रांनो! काळ कुठलाही असू द्या, सिनेमा अन नाटकांना बालप्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद जवळपास सारखाच! बडबड, गप्पा आरडाओरडा, धमाल, कधी घाबरणारे अन कधी आनंदाचे चीत्कार, हसणे खिदळणे, वाहवा!

मोहोरून टाकणाऱ्या फुलांचे ताटवे, रंगीबेरंगी फुलपाखरांचे बागडणे, मोराचा मोरपंखी नाच, मनमोहक हास्याची दिलखुलास कारंजी अन मधुर, निरागस व लोभस बालपणाचे नयनरम्य दर्शन एकाच ठिकाणी हवे आहे का?  मग कोणत्याही भाषेत बालनाट्य सुरु असलेल्या एखाद्या रंगमंदिराला जरूर भेट द्या, अँड don’t worry! भावनेला भाषेचा अडसर कधीच भासत नाही!!! 

चला तर मंडळी, सुट्टीत धम्माल मज्जा करू या!!!

तूर्तास तुमची रजा घेते, एका बालनाटकाचे अर्जंट बुकिंग करायचे आहे!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
3.5 6 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
RAJENDRA CHUNODKAR

Took me back to my childhood summer holidays and all the games and trips we used to do with friends.